तेल विपणन कंपन्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या दरवाढीने, पेट्रोल-डिझेल इंधनाच्या किमतीने मुंबईत अनुक्रमे प्रति लिटर ९४ रुपये १२ पैसे आणि ८४ रुपये ६३ पैसे असा विक्रमी स्तर गाठला. केंद्र आणि राज्याचा कराचा मोठा भार असलेल्या या इंधनाच्या किमती, करोना काळापासून निरंतर वाढत असून, गत वर्षांतील मार्चच्या मध्यापासून पेट्रोल प्रति लिटर १८.०१ रुपयांनी तर डिझेल १५.४४ रुपयांनी महागले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी प्रसृत केलेल्या अधिसूचनेनुसार, बुधवारी पेट्रोलची किंमत प्रति लिटर ३० पैशांनी वाढली, तर डिझेल लिटरमागे २५ पैशांनी महागले. मंगळवारीही पेट्रोल-डिझेलच्या किमती लिटरमागे प्रत्येकी ३५ पैशांनी वाढविल्या गेल्या आहेत. विद्यमान २०२१ सालातच या इंधनाच्या किमती अनुक्रमे तीन रुपये ८९ पैसे आणि तीन रुपये ८६ पैसे अशा वाढल्या आहेत.

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्य़ांत बुधवारी पेट्रोल ९५ रुपयांच्या घरात पोहोचले आहे. डिझेलच्या किमतीनेही लिटरमागे ८५ रुपयांच्या घरातील सार्वकालिक उच्चांक नोंदविला आहे. सप्टेंबर २०१८ नंतरचा हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा उच्चांकी स्तर आहे. राज्यात परभणीमध्ये पेट्रोल सर्वाधिक ९६.५८ रुपये दराने, तर डिझेल ८५.७२ रुपये दराने बुधवारी विकले गेले. त्या खालोखाल नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेलच्या प्रति लिटर किमती अनुक्रमे ९६ रुपये १३ पैसे आणि ८५ रुपये ३० पैसे अशा होत्या. दरवाढीची तीव्रता व निरंतरता पाहता पेट्रोलची किंमत चालू महिन्यातच शंभरी गाठणे अवघड दिसून येत नाही.

तेलाच्या भडक्यामागील अर्थकारण

*  आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती वर्षभरानंतर पुन्हा प्रति पिंप ६१ डॉलरवर गेल्या आहेत.

*  पेट्रोल-डिझेलच्या विक्री किमतीत राज्य व केंद्राच्या करांचा भार अनुक्रमे ६१ टक्के व ५६ टक्क्य़ांचा आहे.

*   वस्तू व सेवा करातून वगळण्यात आलेल्या इंधनावर, राज्यांच्या मूल्यवर्धित कर (व्हॅट), उपकर, मालवाहतूक शुल्क व स्थानिक कराचा अतिरिक्त बोजा.

*  अर्थसंकल्पाने पेट्रोल-डिझेलवर अनुक्रमे १.४ रुपये आणि १.८ रुपये प्रतिलिटर उत्पादन शुल्क कपात केली असली तरी अनुक्रमे २.५ रुपये व चार रुपये नवीन कृषी अधिभार आणला आहे.

*  पेट्रोल-डिझेलवरील करभार कमी करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय तेलमंत्र्यांकडून नुकतेच स्पष्टीकरण.