महागाई निर्देशांकाच्या चढत्या पाऱ्यावर रिझव्‍‌र्ह बँकेचे बारीक लक्ष असून, तथापि सरकारने कृषी मालाच्या व्यवस्थापनावर लक्ष दिल्यास अन्नधान्याच्या किमती उतरू शकतील, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रतिपादन आहे.
गेल्या सलग दोन महिन्यांत किंमतवाढीच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले. तथापि या प्रश्नावर उत्तर म्हणून सरकारकडून खाद्यान्नांचे सुयोग्य व्यवस्थापन व्हायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांकाने मे महिन्यात प्रामुख्याने अन्नधान्य व इंधनाच्या किमती महागल्याने ६.०१ टक्के अशी पाच महिन्यांच्या उच्चांकावर उडी घेणे चिंताजनक असल्याचे आणि सरकार व रिझव्‍‌र्ह बँकही या प्रश्नावर सजग असल्याचे त्यांनी सांगितले.
स्टेट बँकेद्वारे आयोजित कार्यक्रमाला आले असता, राजन यांनी इराणमधील ताज्या संकटापायी कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती भडकण्यासह, रुपयाच्या मूल्यावरही विपरीत परिणाम करणेही शोचनीय असल्याचे राजन यांनी कबूल केले. ते म्हणाले, ‘‘इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धाने सर्वानाच विचारात टाकले आहे. लक्षणीय म्हणजे हे युद्ध संपून परिस्थिती केव्हा निवळेल याबद्दलची अनिश्चितता आणखीच गंभीर आहे.’’ तथापि इराकमधील प्रमुख तेलसाठे दक्षिणेकडच्या भागात आहेत आणि तेथे या युद्धाचा थेट प्रभाव नसल्याचेही त्यांनी सांगितले.
चालू खात्यावरील तुटीला बसलेली कात्री आणि देशाच्या परकीय चलन गंगाजळीतील बळकटीने बाह्य़ स्थितीच्या प्रतिकूलतेबाबत चिंता बव्हंशी घटली आहे. गेल्या वर्षी याच काळात असलेल्या परिस्थितीच्या तुलनेत बाह्य़ आघाडीवर आपली स्थिती खूपच सुधारली असल्याचे आणि काळजीचे कारण नसल्याचे राजन यांनी सांगितले.