पर्ल्सच्या मालमत्तांवर छापे

तीन वर्षांत दुप्पट रक्कम तसेच रकमेच्या बदल्यात जमिनीचे आमिष दाखवून सहा कोटी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या पीएसीएल अर्थात पर्ल्स कंपनीशी संबंधित प्रकरणातील मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी मुंबईसह अनेक शहरांत छापे घातले.

गुंतवणूकदारांकडून गेल्या तीन दशकांत ६०,००० कोटी रुपये जमा करणाऱ्या पर्ल्स कंपनी तसेच तिचे प्रवर्तक, संचालक यांच्या मालकीच्या या मालमत्ता असल्याचे सांगण्यात येते. मुंबईबरोबरच दिल्ली, जयपूर, मोहाली, चंदीगड येथील १० मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले.

ऑगस्ट २०१४ मध्ये सेबीने पर्ल्स कंपनीवर र्निबध घातल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने या वर्षांच्या सुरुवातीलाच गुन्हे नोंदविले. भांडवली बाजार नियामक सेबीने नुकतीच मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते. नव्या कारवाईत कंपनीशी संबंधित संस्था तसेच अधिकाऱ्यांबाबतची माहितीही तपास यंत्रणेने मिळविली आहे.

पर्ल्स संचालकाची लवादाकडे धाव

मुंबई: सेबीबरोबरच तपास यंत्रणांच्या कारवाईचे फास आवळल्यानंतर पीएसीएल अर्थात पर्ल्सच्या एका संचालकाने रोखे अपील लवादाकडे धाव घेतली आहे. पर्ल्सचा निर्मल सिंग याने सेबीविरुद्धच्या गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळविण्याच्या कारवाईला याद्वारे आव्हान दिले आहे. गेल्या तीन दशकांपासून गुंतवणूकदारांकडून कोटय़वधींची रक्कम जमा करून फसवणूक करणारे पर्ल्सचे मुख्य चार-सहा संचालक असून ते उत्तर भारतस्थित असल्याचा आरोप पर्ल्स गुंतवणूकदार संघटनेचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी केला होता.