scorecardresearch

‘फ्युचर’सोबतच्या करारातून ‘रिलायन्स’ची माघार

रिलायन्स समूहाची साहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडून फ्युचर समूहाचा किराणा आणि अन्य घाऊक व्यवसाय संपादित करण्याचा सुमारे २४,७१३ कोटी रुपयांचा करार रद्द करत असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून शनिवारी मुंबई शेअर बाजाराला कळविण्यात आले.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : रिलायन्स समूहाची साहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडून फ्युचर समूहाचा किराणा आणि अन्य घाऊक व्यवसाय संपादित करण्याचा सुमारे २४,७१३ कोटी रुपयांचा करार रद्द करत असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून शनिवारी मुंबई शेअर बाजाराला कळविण्यात आले.

फ्युचर समूहाच्या बहुतांश मोठय़ा कर्जदारांनी या प्रस्तावित कराराच्या विरोधात मतदान केले आहे. त्या परिणामी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून हा करार रद्द करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. रिलायन्सने ऑगस्ट २०२० मध्ये बिग बाजार, ईझीडे आणि एफबीबीसारख्या नाममुद्रांच्या देशातील ४२० शहरांमध्ये पसरलेल्या १८०० हून अधिक दालने असणाऱ्या फ्युचर रिटेलच्या व्यवसायाचे २४,७१३ कोटींना खरेदीचा करार केला होता.

फ्युचर रिटेल, फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स आणि इतर समूहातील कंपन्यांच्या भागधारक आणि असुरक्षित कर्जदारांनी (अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स) रिलायन्स रिटेलसह एकत्रीकरणाच्या योजनेच्या बाजूने मतदान केले होते. मात्र फ्युचर कंपन्यांच्या पाचपैकी चार सिक्युअर्ड क्रेडिटर्सने रिलायन्स समूहाला किरकोळ (रिटेल) आणि घाऊक व्यवसाय विकण्याच्या विरोधात मतदान केले. आता रिलायन्स फ्युचरसोबतच्या करारातून माघार घेत असल्यामुळे फ्युचर समूह दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे.

अमेरिकेची ई-व्यापार क्षेत्रातील महाकाय कंपनी अ‍ॅमेझॉननेदेखील रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत करार केल्याने फ्युचर समूहाला कायदेशीर नोटीस बजावली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजशी २४,७१३ कोटी रुपयांच्या व्यवसाय विक्रीचा व्यवहार करून फ्युचर समूहाने अमेरिकी कंपनीबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा दावा अ‍ॅमेझॉनकडून याआधी करण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात फ्युचर समूहाच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसोबतच्या व्यवहाराला भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने मंजुरीची मोहोर उमटवली होती.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reliance withdraws from deal with future cancel the contract ysh

ताज्या बातम्या