रुपयात आणखी ४७ पैसे घसरण

मुंबई : डॉलरच्या तुलनेतील रुपयाची घसरण मंगळवारी ७३च्या वेशीवर पोहोचणारी ठरली. स्थानिक चलन एकाच व्यवहारात तब्बल ४७ पैशांनी आपटले. परिणामी परकीय चलन विनिमय मंचावर ते सत्रअखेर ७२.९८ वर स्थिरावले. रुपयाचा हा ऐतिहासिक तळ ठरला.

रुपयाने यापूर्वी १२ सप्टेंबर रोजी व्यवहारात ७२.९१ या विक्रमी घसरणीची नोंद केली आहे. यानंतरही रुपयाचा विक्रमी तळातील प्रवास दिवसागणिक सुरू होता. दरम्यान, रिझव्‍‌र्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे एखाद-दुसऱ्या सत्रात रुपया भक्कम बनला होता.

सोमवारच्या ७१.५१ या बंदअखेर रुपयाच्या मंगळवारच्या प्रवासाची सुरुवात काहीशी भक्कम झाली होती. दिवसअखेर मात्र त्यावर दबाव निर्माण झाला. रुपया वर्षभरात १३ टक्क्यांनी घसरला आहे. निर्यातदार आणि बँकांमार्फत अमेरिकी चलनाची विक्री गेल्या काही सत्रांपासून कायम आहे.

रुपयातील ‘वास्तविक’ घसरण  ६-७ टक्केच – आयएमएफ

वॉशिंग्टन : रुपयाच्या मूल्यातील वास्तविक घसरण ही चलनवाढीचा घटक लक्षात घेतल्यास अवघी ६-७ टक्के इतकीच आहे, असे मत व्यक्त करीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब नसल्याचा अभिप्राय दिला आहे.

चालू वर्षांत जानेवारीपासून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया १३ टक्क्य़ांहून अधिक घसरला आहे; परंतु चलनवाढ अर्थात महागाई दरात वाढीचा प्रभाव वजा केल्यास ही चलनातील घसरण आटोपशीर असल्याचे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही यापूर्वी व्यक्त केले आहे. आयएमएफचे प्रवक्ते गॅरी राइस यांनी रुपयाच्या मूल्यासंबंधी भाष्य करताना, डिसेंबर २०१७ च्या तुलनेत रुपयातील वास्तविक घसरण ही सहा ते सात टक्क्य़ांच्या घरातच असल्याचे सांगितले. शिवाय उदयोन्मुख बाजारपेठा आणि भारताच्या व्यापार भागीदार असलेल्या देशांच्या चलनांमध्येही अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तितकीच घसरण झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मात्र रुपयात यापुढेही पडझड सुरू राहिल्यास, त्यातून तेल आणि पेट्रोलियम पदार्थासारख्या आयात वस्तू महागतील आणि परिणामी चलनवाढीवर आणखीच ताण वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला.