डॉलरच्या तुलनेत सावरणाऱ्या रुपयाने शुक्रवारी गेल्या नऊ महिन्यांतील सर्वाधिक पैशांची भर टाकली. परकी चलन व्यासपीठावर स्थानिक चलन कालच्या तुलनेत ८० पैशांनी उंचावत ६० च्या वर, ५९.३९ पर्यंत भक्कम झाले. विदेशी निधीचा ओघ काढून घेण्याच्या गुंतवणूकदारांच्या धोरणामुळे भांडवली बाजारासह चलन व्यवहारातही रुपयावर दबाव निर्माण झाला होता. परिणामी बुधवारीच रुपयाने ६०.७२ असा सार्वकालिक तळ गाठला होता. गुरुवारप्रमाणेच त्यात शुक्रवारीही सुधार दिसून आला. आजची त्याची दिवसातील भर तर २१ सप्टेंबर २०१२ नंतरची सर्वात मोठी ठरली.
दरम्यान भांडवली बाजाराकडे गुंतवणूकदार पुन्हा वळल्याने सराफा बाजारातील घसरण रुंदावलेली दिसली.  मुंबईत सोन्याचे दर तोळ्यामागे आता थेट २५ हजार रुपयांवर आले आहेत. शुक्रवारी एका दिवसाच्या व्यवहारात सोन्याचे भाव ८८० रुपयांनी खाली आले. तर चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदली गेली. चांदीचा किलोचा भाव शुक्रवारी २६० रुपयांनी कमी होऊन ४०,१९० रुपयांवर आला आहे. हे भाव जवळपास गेल्या दोन वर्षांच्या नीचांकावर आले आहेत.