डॉलरपुढे निरंतर सुरू असलेल्या शरणागती रुपयाला गुरुवारी ६५च्या  तळात घेऊन गेली. सलग सातव्या व्यवहारात रुपया आणखी ३२ पैशांनी नरमताना ६५.१० पर्यंत खचला.  चलनाची ही गेल्या दोन वर्षांतील तळचा स्तर आहे.
चिनी युआनचे अवमूल्यन सलग दोन दिवस सुरू राहिल्यानंतर त्याचा  रुपयाच्या मूल्यावरही दबाव दिसून आला. यापूर्वी ६ सप्टेंबर २०१३ रोजी रुपयाने आजच्या समकक्ष म्हणजे डॉलरमागे ६५.२४ रुपये असा विनिमय दरातील नीचांक स्तर दाखविला होता.
गुरुवारच्या सत्राची ६४.७२ स्तरावरून सुरुवात करणारा रुपया व्यवहारात ६५.२३ पर्यंत घसरला.  दरम्यान तो ६४.६३ पर्यंतच वाढू शकला. या आधीच्या आठवडय़ाच्या सुरुवातीपासून रुपया सातत्याने घसरत आहे. ४ ऑगस्टला ६३.७४ या टप्प्यावरून सुरू झालेली घसरण आता ६५ च्याही खाली येऊन ठेपली आहे.
केंद्रीय अर्थ सचिव राजीव मेहरिषी यांनी एका खासगी इंग्रजी वित्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, चलनावर सरकार नियंत्रण राखू शकत नाही, असे स्पष्ट केले. परकीय चलन व्यासपीठावर रुपयाचे मूल्य बाजारच ठरवील, असे नमूद करीत मेहरिषी यांनी विद्यमान स्थितीत हस्तक्षेपाची अपेक्षा धुडकावून लावली. सरकारकडून रुपयाचा कोणताही स्तर निश्चित केला गेलेला नसल्याचे स्पष्ट केले. स्थानिक चलनाचा प्रवास हा देशाची निर्यात स्थिती तसेच महागाई दर आदी बाबींवर निर्भर असल्याचे ते म्हणाले.
घसरण रोखली; अस्वस्थता कायम!
मुंबई: दोन दिवस अवमूल्यन सुरू असलेल्या चिनी युआन आणखी खाली आणला जाणार नाही, हा दिलासा भारतीय भांडवली बाजाराला किरकोळ वाढ नोंदविण्यास पुरेसा ठरला. परिणामी बाजारातील या माध्यमातून गेल्या चार व्यवहारातील घसरण रोखली गेली, पण धास्तीयुक्त अस्वस्थता मात्र दिवसभरातील चढ-उतारांतून दिसून आली. व्यवहारात २७,६३५.२५च्या उच्चांकापर्यंत मजल मारणारा सेन्सेक्स दिवसअखेर माफक ३७.२७ अंश वाढीसह २७,५४९.५३ वर स्थिरावला. तर ६.४० अंश वाढीसह निफ्टी केवळ ८,३५५.८५ वर पोहोचला. ६५ पर्यंत घसरणाऱ्या रुपयाच्या चिंतेने निर्देशांकाच्या वाढीला पायबंद घातला. महागाई व औद्योगिक उत्पादनाबाबत समाधानकारक आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये २०० अंशांच्या वाढीने दिवसाची सुरुवात केली होती.
युआनच्या उतरंडीचे ‘रुपया’वर आणखी आघात शक्य : सिटीग्रुप
नवी दिल्ली: चिनी चलनाच्या घसरणीने भारताच्या अर्थव्यवस्था थेट बाधित होण्याची शक्यता तुलनेने कमी असली तर भारताचे चलन रुपयाला कमजोर करणारे चटके मात्र अर्थव्यवस्थेला सोसावे लागतील, असे सिटीग्रुपने प्रसिद्ध केलेल्या अहवालाचे निरीक्षण आहे.
युआनच्या अवमूल्यनातून निर्माण झालेल्या घबराटीने, भारताच्या भांडवली बाजारात गुंतलेला निधी काढून घेणारे पाऊल काही बडे विदेशी गुंतवणूकदारांना टाकणे भाग पडेल. याचा थेट परिणाम म्हणून रुपया प्रमुख आंतरराष्ट्रीय चलन डॉलरच्या तुलनेत आणखी कमजोर बनेल, असा या जागतिक वित्तीय सेवा समूहाचा कयास आहे. भारताच्या रुपयाप्रमाणेच अन्य उभरत्या बाजारपेठांच्या चलनांवर असाच जाच सहन करावा लागेल, असेही सिटीग्रुपने स्पष्ट केले आहे. गेल्या तीन दिवसांत चिनी चलन युआन डॉलरच्या तुलनेत चार टक्क्यांहून अधिक गडगडला आहे. चिनी चलनातील ही घसरण लक्षात घेता, भारतीय चलनाची न्याय्य मूल्य पातळी ही प्रति डॉलर ६४-६५ दरम्यान राहील, असाही अहवालाचा निष्कर्ष आहे. तथापि युआन अधिक घसरत राहिल्यास, रुपयाची कमजोरीही वाढेल, असा या अहवालाचा इशारा आहे. तथापि, चीनमधून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, यंत्रसामग्री, पोलाद, खते, दूरसंचार उपकरणे यांची स्वस्त आयात भारताला औद्योगिक क्षेत्रातील मरगळ दूर करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. युआनची मूल्यकपात भारताच्य पथ्यावर पडणारीही ठरू शकेल, असा अंदाज या अहवालाने मांडला आहे.