स्टेट बँकेच्या अध्यक्षांचे तपास यंत्रणांना आवाहन

मुंबई : सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि अन्य तपास यंत्रणांनी, नादारी आणि दिवाळखोरी प्रक्रिया सुरू असलेल्या कंपन्यांच्या प्रवर्तकांच्या व्यक्तिगत मालमत्तांपुरती कारवाई मर्यादित ठेवावी, कंपन्यांच्या मालमत्तांवर जप्ती आणण्याचे पाऊल टाकू नये, असे आवाहन स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी केले.

मोठा कर्जभार असणाऱ्या नादारी आणि दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू असलेल्या कंपन्यांची प्रकरणे निकाली निघावीत, यासाठी पुढे येणारा उत्सुक नवा खरेदीदार हा पूर्णत: जोखमीने गुंतवणूक करीत असतो, असे स्पष्ट करत कुमार यांनी अशा नव्या कंपनीला कोणत्याही तपास यंत्रणेकडून नसती छळणूक आणि मनस्ताप व्हायला नको असतो, असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण अपिल लवादाने सोमवारीच भूषण पॉवर अँड स्टीलच्या मालमत्तांवरील जप्ती नाहीशी करण्याचे आदेश दिले होते.  सक्तवसुली संचालनालय या प्रकरणी भूषण स्टीलच्या प्रवर्तकांच्या कोटय़वधींच्या अपहाराचा तपास करीत आहे. तथापि ईडीने केलेली मालमत्ता जप्ती या संकटग्रस्त कंपनीत रस दाखविणाऱ्या जेएसडब्ल्यू स्टीलच्या हिताला बाधा आणणारी ठरली असल्याने, तिने या कारवाईला आव्हान देणारी याचिका केली.

विविध व्यापारी बँकांचे कर्ज थकविणाऱ्या भूषण पॉवर अँड स्टील खरेदीची प्रक्रिया जेएसडब्ल्यू स्टीलकडून सुरू आहे. जेएसडब्ल्यू स्टील १९,७०० कोटी रुपयांमध्ये भूषण स्टील अँड पॉवर कंपनी खरेदी करत आहे.  सक्तवसुली संचालनालयाने गेल्याच आठवडय़ात भूषण पॉवर अँड स्टील कंपनीच्या प्रवर्तकांच्या ४,०२५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या विरोधात नवीन खरेदीदार जेएसडब्ल्यू स्टीलने अपिल लवादाकडे धाव घेतल्यानंतर तपास यंत्रणेला मालमत्तेवरील जप्ती रद्द करण्याचे आदेश दिले.