विदेशी गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या पार्टिसिपेटरी-नोट्स (पी-नोट्स) सारख्या अप्रत्यक्ष मार्गाऐवजी बाजारात थेट व प्रत्यक्ष शिरकाव करण्याचा सल्ला ‘सेबी’ने दिला. बाजाराकरिता जोखीम ठरेल अशा सूट-सवलती या वर्गाला देण्याचा आपला विचार नसल्याचेही सेबीप्रमुख यू. के. सिन्हा यांनी स्पष्ट केले.
पी-नोट्सवरील सेबीद्वारे प्रस्तावित कठोर नियमांमुळे भांडवली बाजारात गेल्या काही सत्रांमध्ये घसरणीच्या रूपात प्रतिक्रिया उमटली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी याचा धसका घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सेबी अध्यक्ष सिन्हा यांनीही पी-नोट्सच्या माध्यमातून भांडवली बाजारात होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाल्याचे मान्य केले आहे.

‘म्युच्युअल फंडांचीही थेट विक्री व्हावी’
ल्ल कंपन्यांचे प्रतिनिधी अथवा अन्य सल्लागार/विक्रेते यांच्याऐवजी म्युच्युअल फंडांची गुंतवणूकदारांना थेट विक्री करण्याचा आग्रह सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी धरला आहे. कंपन्यांना थेट विक्रीकरता येणारे आणि गुतवणूकदारांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय फंड योजना खरेदी करता येणारे ऑनलाइन व्यासपीठ लवकरच उपलब्ध करून दिले जाईल, असेही सिन्हा यांनी सांगितले. फंड घराण्यांकडून मिळणाऱ्या मानधनाच्या (कमिशन) प्रमाणात वितरक तसेच आर्थिक सल्लागार हे संबंधित योजनांवर अधिक भर देताना दिसतात, असे निरीक्षणही सिन्हा यांनी नोंदविले.