केंद्रीय अर्थसंकल्पाचे भांडवली बाजारातील स्वागत गुंतवणूकदारांनी नव्या सप्ताहारंभीही केले. भांडवली बाजारातील सलग सहाव्या व्यवहारातील उसळीने  निर्देशांकांनी सोमवारी त्यांचे ऐतिहासिक टप्पे गाठले.

कंपन्यांचे तिमाही वित्तीय निष्कर्ष तसेच विदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू राहिलेला निधी याची जोड मिळाल्याने आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात ६१७.१४ अंशांची भर पडून सेन्सेक्स इतिहासात प्रथमच ५१,३४८.७७ वर झेपावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १९१.५५ अंश वाढीने  पहिल्यांदाच पंधरा हजारापुढे १५,११५.८० वर जाऊन स्थिरावला.

दिवसभराच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ५१,५२३.३८ व १५,१५९.९० पर्यंत उंचावले. दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत त्यातील वाढ जवळपास सव्वा टक्क्क्य़ांहून अधिक राहिली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकाच सत्रात २.५० लाख कोटी रुपयांची भर पडली.

येत्या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या, २०२१-२२ वित्त वर्षांचा अर्थसंकल्प गेल्या आठवडय़ात – १ फेब्रुवारीला संसदेत सादर झाल्यापासून भांडवली बाजारात तेजी कायम आहे. गेल्या सहा व्यवहारातील तेजीमुळे निर्देशांकात या दरम्यान जवळपास ११ टक्के भर पडली आहे.

सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्र सर्वाधिक, ७.२३ टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर बजाज फिनसव्‍‌र्ह, भारती एअरटेल, पॉवरग्रिड, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँकही वाढले. तर तेजीच्या बाजारातही हिंदुस्थान यूनिलिव्हर, कोटक महिंद्र बँक, बजाज फायनान्स, आयटीसी, बजाज ऑटो, सन फार्मा १.४३ टक्क्यापर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, पोलाद, दूरसंचार, बहुपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान ३ टक्क्यांपर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप १.५० टक्क्यापर्यंत वाढले.

गुंतवणूकदारांना १६.७० लाख कोटींचा धनलाभ

अर्थसंकल्पपश्चात गेल्या सलग सहा व्यवहारातील निर्देशांक तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती या दरम्यान १६.७० लाख कोटी रुपयांनी वाढली. सोमवारअखेर शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २०२.८२ लाख कोटी रुपये झाले. बाजार भांडवलाने १०० लाख कोटी रुपयांचा टप्पा २८ नोव्हेंबर २०१४ मध्ये ओलांडला होता.

विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ

भांडवली बाजाराच्या तेजीत सिंहाचा वाटा राखणाऱ्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांची समभाग धारणा ही मागील पाच वर्षांतील सर्वाधिक स्तर गाठणारी ठरली आहे. डिसेंबरअखेर त्यांची राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘एनएसई’वर सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागातील गुंतवणूक २२.७४ टक्क्यांनी झेपावत ४१.८३ लाख कोटी रुपये झाली आहे. तिमाहीगणिक म्हणजे सप्टेंबर २०२० अखेरच्या तुलनेत ती २१.५१ टक्क्यांनी म्हणजेच १.४२ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.