राजकीय घडामोडी आणि नफेखोरी असा संमिश्र प्रतिसाद देणाऱ्या प्रमुख भांडवली बाजारात तीन सत्रांतील तेजीनंतर घसरण नोंदली गेली. १९५.३३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,५०६.४६ वर येऊन ठेपला, तर ५७ अंश घसरणीमुळे निफ्टी ८,३०० चा स्तर सोडत ८,२६७ वर स्थिरावला. बुधवारनंतर बाजारात ख्रिसमसनिमित्ताने गुरुवार, २५ डिसेंबर रोजी व्यवहार होणार नाहीत.
मुंबई शेअर बाजारात गेल्या सलग तीन व्यवहारांतील तेजीमुळे जवळपास १,००० अंश भर पडली होती. मंगळवारी मात्र जम्मू आणि काश्मीर तसेच झारखंड राज्यांच्या मतदानाचे आकडे जाहीर होण्यावर गुंतवणूकदारांची नजर होती. येथे फारसे उत्साहवर्धक चित्र न दिसल्याने गुंतवणूकदारांनी अखेर नफेखोरी अवलंबत निर्देशांकाला घसरण नोंदविण्यास भाग पाडले.
सेन्सेक्समध्ये ३.१५ टक्क्यांसह सेसा स्टरलाइट सर्वात नुकसानकारक समभाग ठरला. टाटा पॉवर, टाटा स्टील, एचडीएफसी, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो यांच्या मूल्यातही ३.०९ टक्क्यांपर्यंतची घसरण झाली. कोल इंडिया, हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, भेल, ओएनजीसी, इन्फोसिस हेही घसरणीत सहभागी झाले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.८९ टक्क्यांसह पोलाद निर्देशांक आघाडीवर राहिला. भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू, बँक, स्थावर मालमत्ता आदी निर्देशांकही घसरले.

शेअर बाजारात गेल्या सलग तीन व्यवहारांतील तेजीमुळे सेन्सेक्समध्ये जवळपास १,००० अंश भर पडली होती.

सोने दोन आठवडय़ांच्या तळात
मुंबई : मौल्यवान धातू दरांमध्ये मंगळवारी मोठा उतार पाहायला मिळाला. स्टॅण्डर्ड प्रकारच्या सोन्याचे १० ग्रॅमचे दर ३२५ रुपयांनी कमी होत २६,५१० रुपयांवर आले, तर शुद्ध सोन्याचाही दर तोळ्यामागे याच प्रमाणात कमी होऊन २६,६६० रुपयांवर आला. स्थानिक बाजारात सोने आता गेल्या दोन महिन्यांच्या नीचांकावर येऊन ठेपले आहेत. चांदीच्या दरात तर किलोमागे थेट ६८० रुपयांची नरमाई अनुभवली गेली. त्यामुळे चांदी आता ३७ हजार रुपयांच्या आत विसावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर १.४ टक्क्यांनी खाली आले आहेत.

कच्चे तेल दर पुन्हा घसरणीचा दबाव
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा घसरणीला आले आहेत. प्रामुख्याने अमेरिकेद्वारे जारी होणाऱ्या अर्थविकासाबाबतच्या आकडेवारीवर नजर ठेवत तेल खरेदीदारांनी फारसा उत्साह न दाखविल्याने तेलाच्या किमती मंगळवारी प्रति पिंप १.३० टक्क्यांनी घसरल्या.
तेलाचे दर आता ६०.२९ डॉलर प्रति पिंपवर आले आहेत. अमेरिकी अर्थव्यवस्था भक्कम वेगाने प्रगती करू लागल्यास हे दर वाढू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कच्च्या तेलाबाबत अमेरिका गेल्या काही दिवसांपासून स्वयंपूर्ण होऊ पाहत असताना सहा महिन्यांतच दर निम्म्यावर आले आहेत.