scorecardresearch

भांडवली बाजार घायाळ ; विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या माऱ्याने

दिवसअखेर सेन्सेक्स ६३४.२० अंशांच्या घसरणीसह ५९,४६४.६२ पातळीवर बंद झाला.

मुंबई : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पाय काढता घेतल्याने, भांडवली बाजारावरील मंदीवाल्यांची पकड अधिक मजबूत केली असून, गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकामध्ये एक टक्क्याहून मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक योगदान राखणाऱ्या टीसीएस, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा झाल्याने मुंबई शेअर बाजाराच्या या निर्देशांकाने ६०,००० ची पातळीही सोडली.

भारतीय भांडवली बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीचे निर्गमन सुरूच असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. बुधवारच्या सत्रातही परदेशी गुंतवणूकदारांनी २,७०४.७७ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. उल्लेखनीय चीन आणि बरोबरीने आशियाई बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण असताना, स्थानिक बाजारात निर्देशांक गटांगळय़ा खाताना गुरुवारी दिसले.

दिवसअखेर सेन्सेक्स ६३४.२० अंशांच्या घसरणीसह ५९,४६४.६२ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८१.४० अंशांची घसरणी झाली आणि तो १७,७५७ पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये बजाज फिनसव्‍‌र्हच्या समभाग सर्वाधिक ४.५७ टक्के घसरणीसह बंद झाला. इन्फोसिस, टीसीएस, सन फार्मा, एचसीएल टेक, एचयूएल, डॉ रेड्डीज, एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागातही मोठी घसरण झाली.

तीन दिवसांत सेन्सेक्सने १,८४४ अंश गमावले!

सलग तीन दिवसातील आपटीने ‘सेन्सेक्स’ने तब्बल १,८४४ अंश गमावले आहेत, तर गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत सुमारे ६.८० लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. सप्ताहारंभी सोमवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारातील सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवलाचे मूल्य हे २,८०,०२,४३७ कोटी रुपये असे सार्वकालिक उच्चांकाला होते. पुढे जागतिक घडामोडींमधील प्रतिकूलतेपायी समभाग विक्रीचा मारा आणि नफावसुलीचे सत्र सलग तीन दिवस सुरू राहिले. परिणामी गुरुवारच्या व्यवहाराअंती बाजार भांडवलाचे मूल्य २,७३,२१,९९६.७१ कोटी रुपयांवर रोडावलेले आढळून आले. या तिन्ही सत्रात मिळून परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी जवळपास ५,००० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बाजार घसरणीकडे कसे पाहाल?

अमेरिकी रोख्यांवरील परताव्याचा वाढता दर हा फेडरल रिझव्‍‌र्हची व्याजदर वाढीबाबतची भूमिका अधिक ठळकपणे अधोरेखित करणारा आहे. त्याचेच पडसाद भारतीय भांडवली बाजारात उमटले असून गुंतवणूकदार चिंताक्रांत झाले आहेत. याचबरोबर खनिज तेलाच्या वाढत्या किमती सात वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातीतील तेल सुविधा केंद्रांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे आधीच अपुऱ्या असलेल्या तेलाच्या पुरवठय़ातील अडचणी वाढल्या आहेत, असे निरीक्षण मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे यांनी नोंदविले.

* देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले आहे. आगामी अर्थसंकल्प आणि विविध राज्यांच्या निवडणुकांसारख्या महत्त्वाच्या घटनांमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन पोर्टफोलिओसाठी दर्जेदार कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याची संधी म्हणून बाजारातील घसरणीकडे पाहावे, असा सल्ला मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस लि. संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी दिला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex falls 634 points nifty ends at 17757 zws

ताज्या बातम्या