निफ्टीतही सलग दुसऱ्या सत्रात वाढ

सलग दुसऱ्या सत्रात तेजी नोंदविताना मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने बुधवारी २६ हजारांचा टप्पा पार केला. ९१.०३ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २६,०,५१.८१ वर पोहोचला. तर ३१ अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,०३३.३० पर्यंत स्थिरावला.

भांडवली बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत. तत्पूर्वी खरेदीचे धोरण कायम ठेवताना गुंतवणूकदारांनी बुधवारी स्थावर मालमत्ता, पोलाद, आरोग्यनिगासारख्या क्षेत्रातील समभागांकरिता मागणी नोंदविली.

गेल्या दोन सत्रांतील मिळून सेन्सेक्सची वाढ २८६.६७ अंशांची नोंदली गेली आहे. मुंबई शेअर बाजाराची बुधवारची सुरुवात २६,१०१.३३ या वरच्या टप्प्यावर झाली. सत्रात सेन्सेक्स २६,१३०.४९ पर्यंत झेपावला. तर त्याचा व्यवहारातील तळ २६ हजारांच्या खाली, २५,८७७.१६ राहिला.

जागतिक भांडवली बाजारातही बुधवारी वाढ नोंदली गेली. भारतात निश्चलनीकरणामुळे उर्वरित अर्ध वित्त वर्षांत विपरीत परिणाम जाणवेल तसेच वस्तू व सेवा कर परिषदेची बैठक डिसेंबपर्यंत पुढे गेल्याचा काहीसा तणाव बाजारावर मध्यांतरातील व्यवहारांवर दिसला.

सेन्सेक्समधील ३० पैकी २० समभागांचे मूल्य वाढले. तर १० समभागांचे मूल्य रोडावले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.२२ व १.५४ टक्क्यांनी वाढले. सेन्सेक्समधील ल्युपिनचे मूल्य सर्वाधिक ५.२२ टक्क्यांनी वाढले, तर एशियन पेंट्स, टाटा स्ीटल, एनटीपीसी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, टाटा मोटर्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, अदानी पोर्ट्स, टीसीएस यांचे मूल्य ३.८७ टक्क्यांपर्यंत वाढले. घसरलेल्या समभागांमध्ये महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, एचडीएफसी, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक यांचा क्रम राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, पोलाद, आरोग्यनिगा, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू आदी निर्देशांक ३.४१ टक्क्यांपर्यंत वाढले.