जरी भारतातील ताज्या प्रवाहानुसार, देशांतर्गत पर्यटनापेक्षा, विदेशात फिरायला जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक असले, तरी यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीच्या हंगामात मौजमजेसह जवळच्या नातलगांना भेटीगाठीच्या रूपात पर्यटनात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. चालू वर्षांत चांगल्या पाऊसपाण्याच्या पाश्र्वभूमीवर उच्च दोन अंकी दरात वाढ अपेक्षिली जात आहे.

गेल्या वर्षी निश्चलनीकरणाच्या तडाख्यानंतर देशांतर्गत पर्यटन उद्योगात १० टक्क्यांचा वृद्धी दर साधला. ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या पर्यटन हंगामात एकंदर १०० कोटींच्या घरात सहली झाल्याचा अंदाज आहे. यंदाही हे प्रमाण ११० ते ११५ कोटी सहलीपर्यंत वाढेल, असा ‘ट्रॅव्हल टुरिझम फेअर (टीटीएफ)चे आयोजक फेअरफेस्ट मीडिया लि.चे अध्यक्ष व मुख्याधिकारी संजीव अगरवाल यांनी मत व्यक्त केले.

वरळीस्थित नेहरू सेंटरमध्ये १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान आयोजित टीटीएफ प्रदर्शनाच्या २७व्या पर्वाला मिळालेल्या दमदार प्रतिसादाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे भाकीत केले.

यंदाच्या या टीटीएफ प्रदर्शनात देशातील विविध २१ राज्यांतील पर्यटन महामंडळे, सहल आयोजक, ट्रॅव्हल एजंट, हॉटेल चालक तसेच वाहतूक कंपन्या अशा २२० प्रदर्शकांनी सहभाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून नेपाळ, मालदीव, कॅनडा आणि भूतानसह पाच देशांचे प्रदर्शनात प्रतिनिधित्व आहे.

दिवाळीतील सुट्टय़ांचे नियोजन भारतीय कुटुंबात खूप आधीपासून केले जाते आणि संभाव्य पर्यटकांसाठी असे प्रदर्शन खूपच उपयुक्त ठरते, असा आपला अनुभव असल्याचे अगरवाल यांनी सांगितले. म्हणूनच मुंबईसह देशातील नऊ शहरांमध्ये दरसाल हे प्रदर्शन भरत असते. मुंबईनंतर पुण्यात येत्या २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान हे प्रदर्शन होत आहे,