बिकट आर्थिक स्थितीपोटी जमिनीवर केवळ लोळण घेणेच शिल्लक राहिलेल्या स्पाइसजेटमधून अखेर सन समूह बाहेर पडला आहे. ही घडामोड होताच कंपनीचे सहसंस्थापक अजय सिंह यांनी लगेच सरकारला स्पाइसजेटचा पंचवार्षिक पुनर्उभारणी आराखडा सरकारला सादर केला.

खासगी हवाई प्रवासी सेवा पुरविणाऱ्या स्पाइसजेटमध्ये माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील सन समूहाद्वारे दयानिधी मारन यांनी ५३ टक्के हिस्सा राखला होता. मात्र देशांतर्गत स्वस्तातील हवाई प्रवास घडवून आणणाऱ्या या कंपनीसाठी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच तेल व विमानतळ कंपन्यांचे देणे-देणे अवघड बनले. भारतीय हवाई क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा विस्तारल्यानंतर अमेरिकास्थित वित्तीय कंपनी जेपी मॉर्गनकडून कंपनीत रस दाखविला जाऊ लागला. असे असताना अचानक मारन यांनी माघार घेतली असून त्यांनी आपल्याकडील सर्व हिस्सा अजय सिंह यांना विकला आहे. त्याचबरोबर काल एअरवेजमार्फत असलेली भागीदारीही सिंह यांच्याकडे आली आहे. हा व्यवहार पार पडताच सिंह यांनी सरकारला कंपनीचा येत्या पाच वर्षांसाठीचा पुनर्उभारणी आराखडाच सादर केला. यामध्ये कंपनीतील हिस्सा फेरबदलाबरोबरच पुनर्बाधणी आराखडाही सादर करण्यात आल्याची माहिती सिंह यांनी दिली. याअंतर्गत कंपनी आगामी कालावधीत छोटय़ा विमानांद्वारेच प्रवासी सुविधा देणार असून स्पाइसजेटमध्ये सध्या ५,००० हून अधिक कर्मचारी आहेत. कंपनीच्या पुनर्उभारीसाठी १,५०० कोटी रुपयांच्या भांडवलाची गरज भासणार आहे. अजय सिंह यांनी स्पाइसजेटही २००५ मध्ये स्थापना केली. लंडनस्थित कंसग्रा कुटुंबीयांचाही कंपनीत काही हिस्सा आहे. तर अमेरिकेचे गुंतवणूकदार विल्बर रॉस यांनी आपल्याकडील सर्व हिस्सा मारन यांना २०१० मध्येच विकला होता.