स्टेट बँकेच्या नफ्याला ६२ टक्क्य़ांनी कात्री
गेल्या काही दिवसांत वाढत्या बुडीत कर्जाच्या समस्येने ग्रस्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात लक्षणीय घसरणीच्या निराशाजनक तिमाही कामगिरीचा सपाटा सुरू असताना, गुरुवारी जाहीर झालेल्या बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँकेच्या तिमाही निकालांनी त्यात आणखी भर घातली. स्टेट बँकेच्या ऑक्टोबर-डिसेंबर २०१५ तिमाही नफ्याला बुडीत कर्जासाठी कराव्या लागलेल्या वाढीव तरतुदीमुळे तब्बल ६१.६ टक्क्य़ांनी कात्री लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
साचत गेलेली बुडीत कर्जामध्ये उत्तरोत्तर वाढ एकीकडे सुरू आहे, तर प्रतिकूल आर्थिक स्थितीमुळे उद्योग क्षेत्रातून नव्याने कर्ज मागणीही नसल्याने सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांची अवस्था बिकट बनली आहे. याची झळ त्यांच्या नफाक्षमतेला बसली असल्याचे चालू आठवडय़ातील बँकांच्या तिमाही निकालातून स्पष्टपणे दिसून येते. स्टेट बँकेचा गेल्या वर्षी डिसेंबर तिमाहीत २,९१०.०६ कोटी रुपये असलेला निव्वळ नफा यंदा ६१.६ टक्क्य़ांनी घटून १,११५.३४ कोटी रुपयांवर उतरला असल्याचे बँकेचे वित्तीय निकाल दर्शवितात.
स्टेट बँकेचे डिसेंबर तिमाहीतील एकूण उत्पन्न (मागील वर्षांच्या तिमाहीतील ४३,७८४ कोटी रुपयांच्या तुलनेत) ४६,७३१ कोटी रुपयांपर्यंत वाढले असल्याचे दिसून येते. तथापि अनुत्पादित कर्जासाठी (एनपीए) बंधनकारक तरतूदही मागील वर्षांच्या याच तिमाहीतील ५,३२७.५१ कोटींच्या तुलनेत यंदा ७,६४४.५२ कोटी रुपये अशी लक्षणीय वाढली आहे. निव्वळ नफ्यात मोठय़ा घसरणीसाठी हीच बाब कारणीभूत ठरली आहे. स्टेट बँकेच्या ढोबळ बुडीत कर्जाचे प्रमाण गेल्या वर्षी डिसेंबरअखेर असलेल्या ६१,९९१.४५ कोटी रुपयांवरून डिसेंबर २०१५ अखेर ७२,७९१.७३ कोटी रुपयांवर गेले आहे. बँकेच्या एकूण कर्ज वितरणाच्या तुलनेत हे प्रमाण ५.१० टक्के इतक्या चिंताजनक पातळीवर गेले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांचे ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे (एनपीए) प्रमाण डिसेंबर २०१४ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत लक्षणीय वाढले असून, काहींबाबत ते एकूण वितरित कर्जाच्या १० टक्के पातळीपर्यंत पोहोचले आहे. त्या परिणामी करावी लागलेल्या वाढीव तरतुदीने या बँकांच्या नफ्याचा घास घेतला आहे. विशेषत: थकलेल्या कर्जाच्या पुनर्रचनेवर रिझव्‍‌र्ह बँकेने आणलेली बंधने आणि मार्च २०१७ पर्यंत ताळेबंद स्वच्छ करण्याचाही बँकांच्या ताळेबंदावर दबाव दिसून येतो. प्रमुख बँकांनी तिमाहीत नफ्यात मोठी घसरण करण्याबरोबरच बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, अलाहाबाद बँक यांनी मोठय़ा तिमाही तोटय़ाची नोंद केली आहे. केवळ बँक ऑफ महाराष्ट्रने तिमाही नफा कमावून या प्रवाहात अपवादात्मक कामगिरी करून दाखविली आहे.

Untitled-3

महाराष्ट्र बँकेची उजवी कामगिरी
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र (महाबँक) सरलेल्या डिसेंबर तिमाहीत ५५.५९ टक्के नफा कमावणारी कामगिरी करून बँकांच्या तिमाही कामगिरीतील निराशेला फाटा दिला आहे. महाबँकेचा निव्वळ नफा गतवर्षीच्या डिसेंबरअखेर असलेल्या ५७.२४ कोटींच्या तुलनेत यंदा ७२.०३ कोटी रुपये झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे बँकेच्या बुडीत कर्जाचे (नेट एनपीए) प्रमाण किंचित घसरून ५.५२ टक्क्य़ांवर स्थिरावले आहे. बँकेच्या ढोबळ एनपीएचे प्रमाण डिसेंबर २०१५ अखेर ७.९७ टक्के पातळीवर आहे. प्रतिकूल आर्थिक स्थिती असतानाही बँकेची ही कामगिरी निश्चित उजवी ठरली असल्याचे मत महाबँकेचे अध्यक्ष सुशील मुनोत यांनी व्यक्त केले.