मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ३० सप्टेंबरअखेर समाप्त आर्थिक वर्षांच्या सहामाहीत ४०२ कोटींचा आजवरच्या सर्वाधिक निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. मागील वर्षांतील याच सहामाहीच्या तुलनेत नफ्यातील वाढ ही तब्बल १३६ टक्के इतकी भरीव आहे.

केवळ विक्रमी नफाच नव्हे, तर सप्टेंबरअखेर नक्त मालमत्तेत ३,००० कोटींचा टप्पा गाठणारी देशातील एकमेव राज्य बँक म्हणून मान महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मिळविला आहे, असे या कामगिरीवर भाष्य करताना बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. ३० सप्टेंबर २०२१ अखेर बँकेची नक्त मालमत्ता ३,०६७ कोटी रुपये इतकी आहे. बँकेचा स्वनिधी ५,५९२ कोटी रुपयांवर गेला आहे. सहामाहीत बँकेचे निव्वळ व्याजापोटी उत्पन्न ४९५ कोटी रुपये असून, त्यात मागील वर्षांच्या तुलनेत १३५ टक्क्यांची वाढ झाली आहे, असे अनास्कर यांनी स्पष्ट केले. बँकेने २०२१-२२ च्या सप्टेंबरअखेर सहामाहीत सर्वच निकषांवर भरीव प्रगती केली आहे. सहामाहीअखेर बँकेचा एकूण व्यवसाय ३४,९७७ कोटी रुपये नोंदला गेला आहे. त्यात ठेवी १६,३७० कोटी रुपये, तर कर्जाचे प्रमाण १८,६०७ कोटी रुपये आहे. बँकेचे मालमत्तांवर परताव्याचे प्रमाण (रिटर्न ऑन अ‍ॅसेट्स) हे गतवर्षांतील १.६७ टक्के पातळीवरून यंदा सप्टेंबरअखेर २.७० टक्के झाले आहे. बँकेने संरक्षक तरतुदीचे गुणोत्तर (प्रोव्हिजन कव्हरेज रेशो) ९१ टक्के अशा सशक्त पातळीवर राखले आहे.