ग्राहकाला १ जानेवारीपासून प्रति कॉल एक रुपया भरपाई
दूरसंचार सेवा पुरवठादारांनी १ जानेवारी २०१६ पासून दिवसाला तीन कॉल ड्रॉप झाले, तर त्या प्रत्येक कॉल ड्रॉपसाठी ग्राहकांना एक रुपया भरपाई देणे अनिवार्य ठरेल, असे फर्मान भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ने शुक्रवारी दिले. मोबाइल सेवा कंपन्यांनी या फर्मानाविरुद्ध ओरड सुरू केली असून, दीडशे कोटींचा दणका त्यांना यातून बसू शकेल. ग्राहकाला मात्र यातून दिवसाला कमाल तीन कॉल ड्रॉपपर्यंत प्रत्येकी एक रुपया भरपाई मिळविता येणार आहे.

दूरसंचार सेवा क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या ट्रायच्या या निर्णयाचे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्वागत केले आहे. निदान दंड रक्कम भरावी लागू नये म्हणून तरी कंपन्यांना आपल्या सेवेचा दर्जा सुधारण्याचे सुचेल, असा त्यांनी टोला लगावला. कॉल ड्रॉपवर अलीकडेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका दूरसंचार कंपनीच्या भारतातील प्रमुख अधिकाऱ्याची खरडपट्टी काढताना, ‘आपण १९९५ मध्ये राहत असल्याची आठवण या कंपन्या करून देत आहेत,’ असे टीकात्मक भाष्यही केले होते. त्यानंतर रविशंकर प्रसाद यांनीही या अधिकाऱ्यास या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते.

नवीन नियमानुसार तीन कॉल ड्रॉप दिवसभरात झाले, तर कंपन्यांना ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल, असे ट्रायने सूचित केले आहे. मोबाइल फोन सेवा पुरवठादार कंपन्यांना एखाद्या ग्राहकाचे असे कॉल ड्रॉप झाल्यास चार तासांत ग्राहकाला एसएमएस किंवा यूएसएसडी संदेश पाठवून त्याच्या खात्यात जमा केलेल्या रकमेचा तपशील द्यायचा आहे. पोस्ट पेड ग्राहकांसाठी हे परताव्याचे पैसे पुढील बिलात जमा करून द्यायचे आहेत. नियामक आयोगाने म्हटले आहे, की या व्यवस्थेमुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून सेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. रविशंकर प्रसाद यांनी सांगितले, की दूरसंचार कायद्यानुसार दंडाचा दर काय ठेवायचा याबाबत अंतिम अधिकार ट्रायकडे आहे. हा कायदा मोबाइल सेवा पुरवठादार व सरकारवर बंधनकारक राहील. कॉल ड्रॉपचा प्रश्न सर्व सेवा पुरवठादारांनी गांभीर्याने घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. व्होडाफोनचे प्रमुख आले होते, त्यांना आपण या बाबत संवेदनशील राहण्यास सांगितले. दूरसंचार सचिवही कंपन्यांच्या प्रवर्तकांशी बोलले आहेत. आपले कार्यालय या समस्येवर लक्ष ठेवून आहे. यापुढे कॉल ड्रॉप कमी होतील अशी आशा आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.

निर्णयाला अपील लवादापुढे आव्हान : सीओएआय
या निर्णयामुळे कंपन्यांना रोज १५० कोटी रुपयांचा फटका बसेल, असा अंदाज सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. संघटनेचे महासंचालक राजन मॅथ्यू यांनी सांगितले, की अनेक तरतुदीत सेवा पुरवठादारांकडे दुर्लक्ष झाले आहे. फोनधारकाच्या यंत्रणेत बिघाड असेल, तर त्यात कंपनीचा काही दोष नाही, आम्हाला हा विनाकारण भरुदड आहे. ट्रायच्या या निर्णयाला अपील लवादापुढे आव्हान दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आयडिया, एअरटेल समभाग गडगडले!
कॉल ड्रॉपसंबंधी दंड आकारण्याच्या ट्रायचा निर्णय आल्यानंतर, भांडवली बाजारात आयडिया सेल्युलर आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या समभागांना विक्रीचा दणका बसला. परिणामी दोन्ही समभागांमध्ये ३.५ टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. सेवा गुणवत्तेचा दंडक न पाळल्यास, मोबाइल सेवा पुरवठादारांना दररोज दोन लाखांची भरपाई ग्राहकांना द्यावी लागेल. विविध दूरसंचार परिमंडळात तिमाही दूरभाष वर्दळीत कॉल ड्रॉप्सचे प्रमाण सरासरी २ टक्के इतके असल्याचे अंदाजण्यात आले आहे. विशेषत: मुंबई आणि दिल्ली या महानगरांमध्ये हे प्रमाण सरासरीहून अधिक असून, एअरटेल, व्होडाफोन, एअरसेल यांच्या सेवांबाबत सर्वाधिक प्रश्नचिन्ह आहेत.