जीव वाचवण्यासाठी उदय कोटक यांचे उद्योगांना आवाहन

मुंबई : देशातील जनतेचे आयुष्य करोनाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचवायचे असेल तर सर्व अनावश्यक आर्थिक कृती तातडीने बंद करायला हव्यात अशा शब्दांत देशव्यापी टाळेबंदीची मात्रा लागू करण्याचे आघाडीचे उद्योजक, बँकर उदय कोटक यांनी सुचविले आहे. याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

देशातील करोनाचा नव्याने वाढता प्रसार लक्षात घेता माणसांच्या तसेच उद्योगांच्या हालचालींवर मर्यादा येणे गरजेचे असून दोन आठवडय़ांसाठी आपण तसे करू शकलो तर वैश्विक महासाथीचे आव्हान काही प्रमाणात कमी होईल, असे ‘भारतीय उद्योग महासंघ’ अर्थात ‘सीआयआय’चे अध्यक्ष उदय कोटक यांनी म्हटले आहे.

करोनावर विजय मिळवल्याची घाईच

करोनावर विजय मिळवल्याचे आपण उन्मादात आणि अतिघाईने जाहीर करून घाई झाली, अशा शब्दांत या साथ प्रसाराबाबतचे भाष्य कोटक यांनी केले. करोनावर आपण नियंत्रण मिळविल्याची पाठ थोपटवून घेतली; मात्र तसे करणे खूपच घाईचे झाले, असे ते म्हणाले.

परिणामी आपण निर्धास्त राहिलो आणि पुन्हा मुक्त संचार होऊ लागला, असे नमूद करत आता करोनाची दुसरी लाट थोपवायची असेल तर काही कालावधीसाठी कठोर निर्बंध आवश्यक असल्याचेही कोटक यांनी सांगितले. त्यासाठी कमी मनुष्यबळात कमी काम, कमी वावर आणि संपर्क अशी उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी उद्योगांना केले.

लसीकरण झालेल्यांनाच प्रवास परवानगी हवी-फिक्की

नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवरील प्रवास निर्बंध लागू करून लसीकरण झालेल्यांनाच प्रवासासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता देशव्यापी औद्योगिक संघटना ‘फिक्की’ने मांडली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संजीवा कुमार यांना लिहिलेल्या पत्रात संघटनेने, असे केल्याने चाचणी व्यवस्थेवरील ताण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

जलद लसीकरणासह अत्यावश्यक औषधांचा सुरळीत पुरवठा यावर सरकारने भर देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. करोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात प्रवेश मिळावा यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन पद्धती विकसित करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. तसेच रेमडेसिविरसारख्या औषधांचा पुरेसा साठा सरकारने करण्याची आवश्यकता मांडण्यात आली आहे.

भारतातील आरोग्यस्थिती हृदयद्रावक – आदित्य मित्तल

नवी दिल्ली : करोनाविरोधातील देशाचा लढा अद्यापही सुरू असून भारतातील सद्य आरोग्यस्थिती हृदयद्रावक असल्याचे मत अर्सेलरमित्तलचे मुख्याधिकारी आदित्य मित्तल यांनी व्यक्त केले आहे. भारतीय उद्योगपती लक्ष्मी निवास मित्तल यांचे पुत्र आदित्य हे लन्झेंबर्गस्थित जगातील सर्वात मोठय़ा स्टील उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

मित्तल यांनी म्हटले आहे की, भारतातील आरोग्यस्थिती आव्हानात्मक असून सर्व जगाचे लक्ष या देशाकडे लागले आहे. देशवासीय म्हणून आम्हीही भारतासाठी आरोग्य क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वेगवान साहाय्य करत आहोत. देशांतर्गत स्थानिक वैद्यकीय सुविधांना आम्ही प्राणवायूचा पुरवठा करत असून गुजराजमधील हाजिरा येथे सरकारी २५० खाटांच्या रुग्णालयासाठी आमची भागीदारी आहे.