scorecardresearch

व्होडाफोन-आयडियाकडून ४,५०० कोटींची निधी उभारणी

चालू महिन्यात कंपनीने १४,५०० कोटी रुपयांच्या निधी उभारणीची घोषणा केली होती.

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपनी व्होडा-आयडियाच्या संचालक मंडळाने गुरुवारी प्रवर्तक समूहातील कंपन्यांना प्राधान्याने समभाग विकून ४,५०० कोटी रुपयांचा निधी उभारणीला मान्यता दिली. कंपनीकडून तीन प्रवर्तक समूह कंपन्यांना दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या व्होडा-आयडियाचे प्रत्येकी १३.३० रुपये किमतीप्रमाणे ३३८.३ कोटी समभाग देण्यात येणार आहेत.

चालू महिन्यात कंपनीने १४,५०० कोटी रुपयांच्या निधी उभारणीची घोषणा केली होती. आता व्होडा-आयडियाच्या प्रवर्तक कंपन्या असलेल्या युरो पॅसिफिक सिक्युरिटीज, प्राइम मेटल्स आणि ओरियाना इन्व्हेस्टमेंट या तीन कंपन्यांकडून मिळणारा ४,५०० कोटी रुपयांचा निधी त्यामध्ये समाविष्ट करण्यात येईल. उर्वरित निधी १०,००० कोटी रुपयांचा निधी समभाग किंवा रोखे विक्रीच्या माध्यमातून एक किंवा अधिक टप्प्यात उभारला जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

देशात लवकरच ५ जी ध्वनिलहरींशी संबंधित किंमत, त्यांची मात्रा आणि इतर अटींसह ध्वनिलहरींच्या लिलावाच्या पद्धतींबाबत शिफारशी जाहीर केल्या जाणार आहेत. या लिलावात सहभागासाठी तयारी म्हणून व्होडा-आयडियाकडून मोठी निधी उभारणी केली जात आहे. व्होडा-आयडियाने आधीच्या थकबाकीचे समभागांमध्ये रूपांतरणाला मान्यता दिल्यामुळे केंद्र सरकारची व्होडा-आयडियामध्ये सर्वाधिक भागीदारी आहे. त्यापाठोपाठ व्होडाफोन समूहाकडे सुमारे ४४ टक्के आणि आदित्य बिर्लासमूहाकडे सुमारे २७ टक्के हिस्सेदारी आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vodafone idea raises rs 4500 crore zws

ताज्या बातम्या