नवी दिल्ली : सरलेल्या सप्टेंबरमध्ये किरकोळ किमतींवर आधारित महागाई दरातील घसरणीनंतर आता घाऊ क महागाई दराच्या गुरुवारी जाहीर झालेल्या आकडय़ानेही दिलासा दिला आहे. मागील सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचत हा महागाई दर १०.६६ टक्क्यांवर नोंदविला गेल्याचे केंद्रीय सांख्यिकी कार्यालय अर्थात ‘एनएसओ’ने जाहीर केले.

इंधनच्या दरात सतत वाढ होत असली तरी अन्नधान्याच्या किमती नियंत्रित राहिल्याने घाऊ क महागाई दरात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत घसरण झाल्याचे ‘एनएसओ’ने म्हटले आहे. मात्र सलग सहाव्या महिन्यात घाऊक महागाई दर दुहेरी अंकात राहिला असून ऑगस्टमध्ये तो ११.३९ टक्के होता. तर गेल्या वर्षी याच महिन्यात त्याचे प्रमाण अवघे १.३२ टक्के होते. चालू वर्षांत मार्चमध्ये महागाई दर ७.८९ टक्के नोंदला गेला होता, त्यानंतरचा सप्टेंबरचा गुरुवारी जाहीर झालेला दर सर्वात निम्न पातळीवर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमध्ये प्रामुख्याने खाद्यतेल, मूलभूत धातू, अखाद्य पदार्थ, खाद्यपदार्थ, तेल आणि नैसर्गिक वायू, रसायने आणि रासायनिक उत्पादनांच्या किमती वाढल्यामुळे  महागाईच्या दराचे प्रमाण उच्च राहिले, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्या उलट भाज्यांच्या दरात घसरण झाल्याने सलग पाचव्या महिन्यात अन्नपदार्थाच्या महागाई दरात घट नोंदविली गेली आहे. परिणामी ऑगस्टमध्ये उणे १.२९ टक्क्यांवर असलेला दर कमी होत सप्टेंबरमध्ये उणे ४.६९ टक्क्यांवर पोहोचला. भाज्यांमध्ये हे प्रमाण उणे ३२.४५ टक्के, कांदा उणे १.९१ टक्के आणि बटाटा उणे ४८.९५ टक्के असे होते.