रिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग दहाव्या बैठकीत व्याजदर स्थिर

मुंबई : करोनाच्या उद्रेकामुळे अर्थव्यवस्थेपुढे उभे राहिलेले अनिश्चिततेचे आव्हान अजूनही टळलेले नाही, रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी व्याजाचे दर खालच्या स्तरावर टिकवून ठेवून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘समावेशी’ भूमिकाही कायम राखणारे पतधोरण गुरुवारी जाहीर केले. 

सहा सदस्य असणाऱ्या पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) तीन दिवस चाललेल्या द्विमासिक आढावा बैठकीचा समारोप गुरुवारी झाला. समितीने पाच विरुद्ध एक अशा बहुमताने रेपो दर ४ टक्के पातळीवर कायम ठेवताना, रिव्हर्स रेपो दरही त्यामुळे ३.३५ टक्के पातळीवर स्थिर ठेवण्याच्या बाजूने कौल दिला.

करोनाच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था अजून पूर्णपणे सावरलेली नाही. करोनाचा नवीन अवतार असलेल्या ओमयक्रॉनचा वाढता प्रसार आणि त्यामुळे जगभरात निर्माण झालेली अनिश्चितता पाहता, अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल भूमिका कायम ठेवण्यात येणार आहे आणि जोवर अर्थव्यवस्था सुस्थितीत येत नाही तोवर परिस्थितीजन्य लवचीक व समावेशी धोरण पवित्रा कायम राहील, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.

आर्थिक वर्ष २०२२-२३ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीची ही पहिलीच बैठक होती. दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीने सलग दहाव्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दराबाबत यथास्थिती अपेक्षित असताना, काही अर्थतज्ज्ञांनी बाजारातील तरलता कमी करण्यासाठी रिव्हर्स रेपो दरामध्ये वाढीची अपेक्षा व्यक्त केली होती.

अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेत जलद गतीने सुधारणा होण्यासाठी भांडवली खर्चात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून मोठय़ा प्रमाणावर करण्यात येणारा भांडवली खर्च आणि निर्यात केंद्रित उपाययोजनांमुळे उत्पादन क्षमता वाढेल आणि एकूण मागणी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे खासगी गुंतवणुकीतही वाढ होण्याची शक्यता आहे, असा विश्वास दास यांनी व्यक्त केला.

आगामी आर्थिक वर्षांसाठी (२०२२-२३) सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचे ७.८ टक्क्यांचे रिझव्‍‌र्ह बँकेचे अनुमान आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ते ९.२ टक्के राहील या पूर्वी व्यक्त केलेल्या कयासावरही ती कायम आहे. मात्र जागतिक पातळीवर करोनाचा वाढत प्रसार आणि त्यामुळे जगभर वस्तूंच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यात कपात करण्यात आली आहे.

महागाईत उतार शक्य

किरकोळ महागाई दर चालू वर्षांतील ५.३ टक्क्यांवरून पुढील आर्थिक वर्षांसाठी महागाईचा अंदाज कमी करत ४.५ टक्क्यांवर आणला. किरकोळ महागाईचा दर डिसेंबरमध्ये ५.५९ टक्क्यांच्या पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, तर घाऊक किमतीवर आधारित महागाई दर १३.५६ टक्क्यांपर्यंत खाली आला, मात्र सलग नऊ महिने ती दुहेरी अंकात कायम आहे.