25 February 2021

News Flash

कर नियोजनाचे पंचक 

गुंतवणुकीचा कल लार्ज कॅप आणि वृद्धीक्षम समभागांत असलेला हा ईएलएसएस फंड आहे

वसंत माधव कुळकर्णी shreeyachebaba@gmail.com

कर नियोजन आणि विशेषत: प्राप्तिकराचे नियोजन ही दरवर्षी करायची गोष्ट आहे. वर्षांच्या सुरुवातीला करनियोजन केले नाही तर शेवटी करवजावटीसाठी जे पर्याय उपलब्ध आहेत त्या साधनाचा उपयोग करावा लागतो. कर वजावटीस पात्र मुदत ठेवी आणि जीवन विम्यातील गुंतवणुकीत स्थैर्य असल्याने परताव्याच्या दराकडे डोळेझाक करून कर बचतीसाठी या साधनांना पंसती दिली जाते. स्थैर्याव्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या संपत्ती-निर्मितीची गरज भागविण्यास ही साधने असमर्थ ठरतात. म्हणूनच, पारंपारिक निश्चित उत्पन्न देणाऱ्या करबचत साधनांपेक्षा समभाग संलग्न कर-बचत (ईएलएसएस) साधनांची वित्तीय नियोजनात निवड केल्यास दीर्घ कालावधीत कर नियोजानासोबत संपत्ती निर्मिती असा दुहेरी फायदा होतो. अर्थशिक्षित करदात्यांमध्ये समभागसंलग्न कर-बचत (ईएलएसएस) साधने वेगाने लोकप्रिय होण्यास संपत्ती निर्मिती हे कारण ठरले. म्युच्युअल फंडांद्वारे उपलब्ध असलेले इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) हे साधन आयकर कायद्याच्या कलम ८० (सी) अंतर्गत एकाच वेळी कर बचत करताना वैयक्तिक करदात्यांना समभागसंलग्न गुंतवणूक करण्याची उत्तम संधी देणाऱ्या पाच फंडांची आज शिफारस करीत आहे.

आदित्य बिर्ला सन लाईफ टॅक्स रिलीफ ९६ फंड :

वाजवी जोखीम स्वीकारत त्यांच्या बदल्यात गुंतवणूकदारांच्या पदरात समाधानकारक परतावा देणाऱ्या फंडात हा फंड अग्रस्थानी आहे. या फंडाचा मानदंड एस अँड पी बीएसई २०० टीआरआय असून फंडाने एक, तीन, पाच किंवा दहा वर्षांच्या कालावधीत मानदंडापेक्षा सरस कामगिरी केली आहे. फंडाचे गुंतवणूक धोरण मल्टीकॅप फंडासारखे आहे. अजय गर्ग हे आदित्य बिर्ला फंड घराण्याचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत हनीवेल (९.९५%), रिलायन्स इंडस्ट्रीज (८.२६%) एचडीएफसी (७.६१%) फायझर (७.१२%) बायर कॉर्पसायन्स (५.३९%) या पाच आघाडीच्या गुंतवणुका असून गुंतवणुकीत समभागांचे ध्रुवीकरण झालेले पाहायला मिळते.

अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड :

गुंतवणुकीचा कल लार्ज कॅप आणि वृद्धीक्षम समभागांत असलेला हा ईएलएसएस फंड आहे. शिफारस केलेल्या तीन फंडांपैकी सर्वाधिक समभागांचे ध्रुवीकरण असलेला हा फंड आहे. तीन वर्षे आणि पाच वर्षे कालावधीत एक वर्षांच्या चलत सरासरीने सर्वाधिक वेळा चांगली कामगिरी केलेला हा फंड आहे. जिनेश गोपानी हे अ‍ॅक्सिस लाँगटर्म इक्विटीचे निधी व्यवस्थापक आहेत. या फंड गटातील सर्वाधिक व्यवस्थापनाखालील मालमत्ता असलेला हा फंड आहे. निधी व्यवस्थापक मुख्यत्वे ३ ते ५ वर्षांत भांडवली लाभ मिळण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांच्या शोधात असतात. व्यवस्थापकांनी वाजवी मूल्यांकन असलेल्या लार्ज-कॅप कंपन्यांतून पोर्टफोलिओच्या ५० ते ७० टक्क्यांदरम्यान गुंतवणूक केली आहे. ‘एस अँड पी बीएसई २०० टीआरआय’ हा मानदंड असून गुंतवणुकीत २५ ते ३० समभाग मानदंडाबाहेरील आहेत. मूल्यांकन दृष्टीकोनातून, महाग परंतु उच्च व्यवस्थापन आणि अनुपालन दर्जा असलेल्या कंपन्यांची निवड करण्याकडे निधी व्यवस्थापकांचा कल आहे. निवडलेल्या फंडांपैकी मागील महिन्याभरातील पडझडीची सर्वात कमी झळ बसलेला हा फंड आहे.

बीओआय अ‍ॅक्सा टॅक्स सेव्हर फंड :

मागील एका वर्षांत सर्वाधिक चांगली कामगिरी असलेला हा फंड आहे. निवडलेल्या पाच फंडांपैकी सर्वाधिक जोखीम घेणारा हा फंड असून या जोखीमेचे पुरेपूर माप गुंतवणूकदारांच्या परादात टाकण्यात निधी व्यास्थापक यशस्वी झाले आहे. व्यापारचक्राचा सूर गवसलेल्या निधी व्यवस्थापकांनी २०१८ मध्ये खरेदी केलेल्या अ‍ॅबट इंडिया, पीआय इंडस्ट्रीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसव्‍‌र्ह सारख्या कंपन्यांनी फंडाच्या परताव्यात आपापली कामगिरी चोख बजावली. आठव्या नवव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन शतक झळकवणाऱ्या फलंदाजासारखी कामगिरी असलेला हा फंड आहे. पाच फंडांपैकी सर्वात कमी मालमत्ता असूनही सर्वात चांगली कामगिरी या फंडाने बजावली आहे. वरचा जोखीमांक असलेल्या गुंतवणूकदरांसाठी हा आदर्श फंड आहे.

एलआयसी एमएफ टॅक्स प्लान :

मिडकॅप गुंतवणुकीवर भिस्त असल्याने गुंतवणुकीत पाच पैकी सर्वाधिक जोखीम असलेला हा फंड आहे. तीन वर्षांच्या ‘रिस्क रिवॉर्ड स्कॅटर प्लॉट’ (आलेख क्रमांक २) मध्ये या फंडाचे स्थान अन्य फंडांच्या थोडे दूर आहे. साहजिकच निवडलेल्या फंडांपैकी मागील महिन्याभरातील पडझडीची सर्वाधिक झळ या फंडाला बसल्याचे उघड आहे. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही शतक झळकावण्याची क्षमता असलेला परंतु निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधू शकलेल्या खेळाडूसारखी या फंडाची गत झाली आहे. मिडकॅप समभागांना सुगीचे दिवस येतील तेव्हा निधी व्यवस्थापक सचिन रेळेकर यांच्या गत कामगिरीचा विचार करता, ते आपल्या कौशल्यावर या फंडाची कामगिरी नक्कीच सुधारतील अशी आशा वाटते.

मिरॅ अ‍ॅसेट टॅक्स सेव्हर फंड :

लार्ज-कॅप केंद्रित गुंतवणूक असलेला हा फंड आहे. एखाद्या उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक मानदंडातील त्या उद्योग क्षेत्राच्या असलेल्या प्रभावापेक्षा फंडाची विशिष्ट उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक कमी अधिक करत गुंतवणुकीचे सक्रिय व्यवस्थापन करणारा हा फंड आहे. निवडलेल्या पाच फंडांपैकी सर्वाधिक जोखीम-समायोजित परतावा असलेला हा फंड आहे. तेजीत अधिक परताव्याचे माप असेलला अपसाइड कॅप्चर रेशो आणि मंदीत भांडवलाची सुरक्षिततेचे माप असलेला डाऊन साईड कॅप्चर रेशो हे फंड गटातील सरासरीपेक्षा उजवे आहेत. मागील तीन वर्षांसाठी फंडाचा एक वर्षांचा दैनंदिन चलत परतावा अभ्यासला असता फंड गटातील सरासरीपेक्षा सरस कामगिरी करण्याची टक्केवारी ८४ टक्के आहे. कर-बचत पर्यायाच्या फंडाच्या शोधात असलेल्या मध्यम जोखमीच्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

ईएलएसएस फंड गटात ४० फंड असून २९ फेब्रुवारी रोजी हे फंड ९६,२७४ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करीत होते. निवडलेले पाच फंड एकूूण मालमत्तेच्या ३७ टक्के मालमत्तेचे प्रतिनिधित्व करतात (आलेख क्रमांक-१ पाहा). मायबाप सरकारने मागील आर्थिक वर्षांत कर वजावटीसाठी गुंतवणूक करायची राहून गेल्यास ३० जूनपर्यंत अशा गुंतवणुका करण्याची मुभा दिली आहे. ज्यांची गुंतवणूक राहून गेली आहे त्यांच्यासाठी मागील वर्षांच्या कर वजावटीस पात्र होण्यासाठी आणि आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला जे करदाते गुंतवणूक करतात त्यांनी त्यांच्या जोखीमांकनानुसार  नवीन वर्षांतील गुंतवणुकीसाठी यापैकी एका किंवा अधिक फंडाची निवड करावी.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 1:12 am

Web Title: all articles about tax planning tax planning tips zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : अखेर तेजी क्षणीकच ठरली!
2 कर बोध : नवीन आर्थिक वर्षांरंभ… करदात्यांसाठी काही बदलांचे अनुपालन गरजेचे
3 क.. कमॉडिटीचा : करोना कहरात धोरण लवचीकतेची गरज
Just Now!
X