News Flash

माझा पोर्टफोलियो :  मूर्ती लहान, परताव्याची शक्यता महान!

मार्च २०२१ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर झाले असून इतर सिमेंट कंपन्याप्रमाणेच अंजनीनेदेखील उत्तम कामगिरी बजावली आहे

अजय वाळिंबे

अंजनी पोर्टलँड सिमेंट ही दक्षिण भारतातील एक छोटी सिमेंट कंपनी. १९९९ मध्ये स्थापित तेलंगणा राज्यात स्थापन झालेली ही कंपनी सुरुवातीला केवळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांत सीमित होती. २० वर्षांपूर्वी कंपनीची उत्पादन क्षमता वार्षिक केवळ तीन लाख टन होती. मात्र नंतर केवळ १० वर्षांत कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानसह दुसरा प्रकल्प सुरू करून आपली उत्पादन क्षमता वार्षिक १२ लाख टनापर्यंत वाढवली. २०१४ मध्ये अंजनी पोर्टलँडची गुणवत्ता ओळखून चेट्टिनाड सिमेंटने कंपनीचे बहुतांशी शेअर्स अधिग्रहित करून कंपनीचा ताबा मिळविला.

सिमेंट उत्पादनात कच्च्या मालाचे महत्त्व खूप जास्त असते. सिमेंटची गुणवत्ता प्रामुख्याने वापरलेल्या चुनखडीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. अंजनीच्या चुनखडीच्या खाणी नलगोंडा जिल्ह्य़ातील सर्वोत्कृष्ट खाणी म्हणून प्रशंसित आहेत. उत्पादन आणि सेवांमध्ये अनुकरणीय वाढीसह अंजनी सिमेंटने आंध्र प्रदेशातील बाजारपेठ ताब्यात घेतली आहे. तसेच कंपनीने आता तमिळनाडू, ओरिसा आणि कर्नाटकपर्यंत आपला विस्तार केला आहे आणि महाराष्ट्र, केरळ आणि गोव्याच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिणेत कंपनीचे डीलर नेटवर्क उत्तम असून आता बाहेरील राज्यांतही कंपनी आपल्या उत्पादनांचे यशस्वी विपणन करत आहे.

मार्च २०२१ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर झाले असून इतर सिमेंट कंपन्याप्रमाणेच अंजनीनेदेखील उत्तम कामगिरी बजावली आहे. कंपनीच्या उलाढालीत वाढ झाली नसली तरीही कंपनीचा नक्त नफा मात्र दुपटीहून अधिक म्हणजे ४०.३५ कोटींवरून ८४.९८ कोटी रुपयांवर गेला आहे. तर मार्च २०२१ साठी संपलेल्या तिमाहीत कंपनीने विक्रीत २८ टक्के वाढ साध्य करून १३०.४५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २४.१८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल २०० टक्क्यांहून अधिक आहे. सध्या सुदैवाने सिमेंट क्षेत्राला चांगले दिवस आहेत. गेल्या वर्षभरात सिमेंटच्या किमती स्थिर असून त्यात घट होण्याची शक्यता कमी आहे. कुठलेही कर्ज नसलेली ही उत्तम गुणवत्तेची स्मॉल मायक्रो कॅप कंपनी तुमच्या पोर्टफोलियोला अल्पावधीत चांगला नफा करून देऊ शकेल.

अंजनी पोर्टलँड सिमेंट लिमिटेड 

(बीएसई कोड – ५१८०९१)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३१६/-

उच्चांक/ नीचांक : रु. ३३०/११६

बाजार भांडवल : रु. ७९९ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. २५.२९  कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ७५.००

परदेशी गुंतवणूकदार      ०.०२

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ०.१३

इतर/ जनता     २४.८५

संक्षिप्त विवरण

* शेअर गट: मायक्रो कॅप

* प्रवर्तक       : चेट्टिनाड सिमेंट

* व्यवसाय क्षेत्र  :  सिमेंट उत्पादन

* पुस्तकी मूल्य : रु. १३७

* दर्शनी मूल्य : रु. १०/-

* गतवर्षीचा लाभांश     : ५०%

शेअर शिफारशीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :        रु. ३३.६१

*  पी/ई गुणोत्तर :      ९.४

*  समग्र पी/ई गुणोत्तर : १७.८

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.०१

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    १५७

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :       ३२.७

*  बीटा :      ०.८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 1:06 am

Web Title: anjani cements ltd profile anjani portland cement ltd zws 70
Next Stories
1 विमा.. सहज, सुलभ : नामांकन नाही केले तर?
2 रपेट बाजाराची :  शिखरावरमुक्काम!
3 बाजाराचा तंत्र-कल : दिसते मजला सुखचित्र नवे!
Just Now!
X