News Flash

विमा..सहज, सुलभ : ‘क्रिटिकल इलनेस’ आणि इतर रायडर्स

आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ही मर्यादा २५ लाख रुपये ठेवली आहे.

नीलेश साठे

आपल्याला कदाचित माहीत असेल की, जीवन विमा (आयुर्विमा) विक्री करणाऱ्या संस्था साधारण विमा उदाहरणार्थ वाहन विमा, आगीचा विमा, घराचा विमा अशा प्रकारचे विमे विकू शकत नाहीत. तद्वतच साधारण विमा कंपन्या जीवन विमा विकू शकत नाहीत. मात्र आरोग्य विमा हा प्रकार याला अपवाद आहे. ज्याप्रमाणे काही विषय केंद्राच्या अखत्यारीत येतात आणि काही राज्यांच्या पण आरोग्य हा विषय समवर्ती (concurrent) यादीत येतो. म्हणजेच आरोग्य विमा हा जीवन विमा कंपन्या तसेच साधारण विमा कंपन्यासुद्धा विकू शकतात. मात्र ‘इर्डा’ने असेही स्पष्ट केले आहे की, ‘मेडिक्लेम’सारखे आरोग्य विमे हे केवळ साधारण विमा कंपन्याच विकू शकतील. त्यामुळे जीवन विमा विक्री करणाऱ्या कंपन्या ‘रायडर’च्या स्वरूपात मूळ विमा पॉलिसीसोबत ‘क्रिटिकल इलनेस’ कवच विकतात. या लेखात आपण क्रिटिकल इलनेस रायडर, टर्म इन्शुरन्स रायडर आणि प्रीमियम वेव्हर बेनीफिट रायडर या तीन लोकप्रिय रायडर्सची माहिती करून घेऊ  या.

क्रिटिकल इलनेस रायडर

कुठलाही रायडर standalone  म्हणजे स्वतंत्रपणे घेता येत नाही. आयुर्विमा पॉलिसीलाच जोडूनच तो घेता येतो. सामान्यत: विमा पॉलिसी जेवढय़ा रकमेची असेल, जास्तीत जास्त तेवढय़ाच रकमेचा हा रायडर घेता येतो. अर्थात विमा कंपन्या जास्तीत जास्त किती रकमेचा रायडर घेता येईल हे ठरवू शकतात. आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ही मर्यादा २५ लाख रुपये ठेवली आहे. म्हणजे १ कोटी रकमेची जरी विमा पॉलिसी असेल तरी क्रिटिकल इलनेस रायडर हा २५ लाख रकमेचाच घेता येतो.

मेडिक्लेम पॉलिसीमध्ये हॉस्पिटलमधील खर्च विमा रकमेहून जर कमी असेल तर कॅशलेस पद्धतीत तेवढी रक्कम विमा कंपनी/टीपीए परस्पर हॉस्पिटलला देते किंवा ते हॉस्पिटल जर विमा कंपनीचे नोंदणीकृत हॉस्पिटल नसेल तर विमेदाराला आधी खर्च करावा लागतो आणि नंतर विमा कंपनी दावा मंजूर करते. मात्र क्रिटिकल इलनेस रायडर घेतला असेल तर नमूद आजार झाल्याचा पुरावा विमा कंपनीला दिल्यावर रायडरनुसार देय रक्कम विमेदारास दिली जाते. त्याचा आजाराच्या उपचारासाठी तेवढा खर्च झाला नसला तरी तो ही रक्कम मिळवितो, ही बाब लक्षात घ्यावी. या रायडरमध्ये सर्व प्रमुख आजारांपैकी कुठलाही आजार झाल्यास विमा रक्कम मिळण्याची सोय असते. कर्करोग, हृदयरोग, मूत्राशयाचे रोग, मेंदूशी संबंधित व्याधी वगैरे अनेक व्याधींना या रायडरमध्ये सम्मीलित केलेले असते. साधारणत: हा रायडर घेतल्यापासून ९० दिवसांनंतर जर असा दुर्धर रोग झाला तर रायडरच्या अटींनुसार फायदे दिले जातात. तसेच या सर्व रोगांच्या व्याख्या आणि त्यातील अपवाद पॉलिसीत नमूद केलेले असतात त्यांचे अवलोकन करणे गरजेचे असते. उदाहरणार्थ अँजिओप्लास्टीचा खर्च काही विमा कंपन्या देत नाहीत.

मेडिक्लेम घ्यावा की हा रायडर घ्यावा, असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर आहे की, दोन्हीची गरज आहे. कारण मेडिक्लेममध्ये फक्त उपचाराचा खर्च मिळतो. पण याव्यतिरिक्तसुद्धा बराच खर्च आजारपणात येत असतो. या खर्चाची तजवीज रायडर घेतला तर होऊ शकते म्हणून दोन्हीची गरज आहे.

टर्म रायडर

एंडोमेंट किंवा पॉलिसीची मुदत पूर्ण होण्यापूर्वी काही परतावा देणाऱ्या (मनी बॅक) विमा पॉलिसींना जोडून टर्म रायडर घेता येतो. यामुळे कमी खर्चात वाढीव विमा घेता येतो. मात्र मूळ विमा पॉलिसीची मुदत जेवढी असेल तेवढय़ाच मुदतीचा हा रायडरही घ्यावा लागतो. कोणत्या विमा पॉलिसीला हा रायडर जोडता येतो त्याची चौकशी विमा प्रतिनिधी किंवा विमा कंपनीकडे करता येईल.

प्रीमियम वेव्हर बेनिफिट

१८ वर्षांखालील पाल्यांचे विमे घ्यायला बरेच पालक उत्सुक असतात. अशा विमा प्रकारात पालक प्रस्तावक असतात, मात्र पाल्याच्या आयुष्याची जोखीम विमा कंपनी घेते म्हणजेच पाल्याचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम मिळण्याची यात सोय असते. मात्र जर पालकांचा मृत्यू झाला तर विमा रक्कम मिळण्याची सोय या प्रकारात नसते. शिवाय अशा वेळी पाल्याच्या आयुष्यावरील विमा पॉलिसीच हप्ते मुदत संपेपर्यंत कसे भरायचे, हा प्रश्न उभा राहतो. यावर उत्तर म्हणजे हा रायडर. अत्यंत कमी विमा हप्ता भरून हा रायडर घेता येतो आणि जर पालकांचा म्हणजेच विमा प्रस्तावकाचा मृत्यू झाला तर मुदत संपेपर्यंत हप्ते माफ होतात. शिवाय काही विमा कंपन्या दरवर्षी पाल्याला काही रक्कमसुद्धा उपलब्ध करून देतात. ज्या पालकांना आपल्या १८ वर्षांखालील मुला/मुलींचे विमे घ्यायचे आहेत, त्यांनी हा रायडर घेतल्याशिवाय पाल्यांच्या आयुष्यावरील विम्याचा विचार करू नये.

शेवटी एक सूचना करावीशी वाटते की, विमा असो वा रायडर असो, तो घेताना डोळसपणे विचार करून आणि योजना नीट समजावून घेऊन मगच घ्यावा. केवळ आपल्या भावाने/मित्राने घेतला म्हणून त्याचे अंधानुकरण करू नये. विमा हा दीर्घ मुदतीचा करार आहे. तो करण्यापूर्वी त्याची आवश्यकता आणि अटी समजावून घेऊन मगच निर्णय घ्यावा.

* लेखक विमा नियामक ‘इर्डा’चे माजी सदस्य आणि ‘एलआयसी’मध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते.

ई-मेल : nbsathe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 12:04 am

Web Title: article about health insurance importance of health insurance zws 70
Next Stories
1 फंडाचा  ‘फंडा’.. : अन्य देशिं चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
2 रपेट बाजाराची : ‘बूस्टर डोस’
3 बाजाराचा तंत्र-कल : ही घडी अशीच राहू दे!
Just Now!
X