तृप्ती राणे

लहानपणी साबणाच्या पाण्याचे बुडबुडे बनवून ते हवेत सोडताना खूप मज्जा वाटायची! दीर्घकाळ श्वास सोडून कोण किती मोठा बुडबुडा बनवून हवेत सोडू शकतो, यावर आमच्यात पैज लागायची. सूर्याच्या सोनेरी किरणांमुळे तयार होणाऱ्या बुडबुडय़ातील निरनिराळे रंग पाहण्यात किती वेळ निघून जायचा हे कळायचंच नाही. या बुडबुडय़ांतून खूप खूप आनंद मिळायचा; पण खरी गंमत हीच की, हा सगळा हवेचा खेळ! जितकी जास्त हवा तितका मोठा बुडबुडा आणि बुडबुडा जेवढा मोठा तेवढा तो क्षणिक!! त्यातून नुकसान मात्र काही नाही. चांगला वेळ जायचा आणि जायचे ते साबणाचं पाणी. अशी ही स्वस्तातली मज्जा म्हणून चालून जात होती. याउलट गुंतवणुकीतील बुडबुडय़ांचे. हे बुडबुडे मात्र धोकादायक असतात. एखादी गुंतवणूक करताना आपल्याला या बुडबुडय़ांवर नीट लक्ष ठेवावं लागतं. नाही तर परतावे सोडाच, पण मुद्दल परत मिळवतानाही नाकीनऊ  येऊ शकते. आजच्या लेखामधून आपण या बुडबुडय़ांबद्दल थोडं जाणून घेऊ या.

बुडबुडा कुठल्याही गुंतवणुकीमध्ये तयार होतो – शेअर, सोने, स्थावर मालमत्ता, रोखे. सर्वसाधारणपणे, जेव्हा फार कमी काळात किमती झपाटय़ाने वाढायला लागतात आणि तेही विनाकारण, तेव्हा आपण म्हणतो की, आता बुडबुडा तयार होतोय किंवा झालाय. या बुडबुडय़ांचं एक मोठं लक्षण म्हणजे अकारण एखाद्या गुंतवणुकीविषयी वाटणारा प्रचंड विश्वास. अशा वेळी सर्वानाच एखाद्या विशिष्ट वेळी एखादी गुंतवणूक हवीहवीशी वाटते आणि त्यासाठी कुठलीही किंमत मोजायला लोक तयार होतात. असं अचानक जेव्हा होतं, तेव्हा उगीच किमती वाढायला लागतात आणि मग एक दिवस हा बुडबुडा फुटतो! आणि या बुडबुडय़ात जर एखादा गुंतवणूकदार अडकला, तर त्याला भरपूर नुकसान होऊ शकतं. याशिवाय जेव्हा एखाद्या देशातील अर्थव्यवस्थेत अशा प्रकारचे बुडबुडे तयार होतात, तेव्हा सगळ्या देशाचं नुकसान होतं. व्यापार-व्यवसायांना तोटा होतो, लोकांची आर्थिक स्थिती खालावते आणि याचा परिणाम देशाच्या जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनावर होतो.

कुठल्याही गोष्टीची किंमत ही तिच्या मागणी आणि पुरवठा या दोन आधारांवर ठरते. मागणी आणि पुरवठा व्यवस्थित असल्यास किमती स्थिर राहतात; परंतु हे समीकरण जर कुठल्याही एका बाजूकडे जास्त झुकलं कीकिमतींवर परिणाम व्हायला लागतो. आता मागणी ही, आजची असू शकते किंवा येणाऱ्या काळाची. उदाहरण घ्यायचं तर छत्रीचे घेऊ. वर्षभर मागणी नाही, परंतु पावसाळा सुरू व्हायच्या वेळी भरपूर मागणी. मग अशा वेळी पुरवठा जर हंगामाला अनुसरून झाला तर ठीक, पण काही कारणाने जर उशीर झाला तर आहे त्या मालाची किंमत वाढते आणि हंगाम संपता जो माल राहातो त्याची किंमत कमी होते; परंतु हेच चित्र जेव्हा आपण गुंतवणुकीच्या बाबतीत पाहायला जातो तेव्हा असं लक्षात येतं की, काही लोक एखाद्या गुंतवणुकीमध्ये भराभर पैसे लावतात आणि ते लावत आहेत, म्हणून इतर लोकसुद्धा आपले पैसे घालतात. मग काही दिवस ही घोडदौड चालू राहते आणि एक दिवस या इमारतीचे सगळे मजले धडाधड कोसळू लागतात. म्हणूनच एका सुज्ञ गुंतवणूकदाराने हे समीकरण समजून त्याच्या गुंतवणुकीबद्दल खबरदारी घेतलीच पाहिजे.

मागील काही वर्षांमधील उदाहरणे लक्षात घेता, अशा प्रकारचे बुडबुडे कधी आणि कसे तयार होतात हे समजतं. साधारणपणे कमी व्याज दर, मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे होणारी महागाई, येणाऱ्या काळात एखादी गुंतवणूक जास्त फायदा देऊ शकेल अशी बातमी जेव्हा पसरते तेव्हा आपल्याला अशा बुडबुडय़ांचा वावर आजूबाजूला दिसायला लागतो. २००५ साली अमेरिकेमध्ये स्थावर मालमत्तेचा बुडबुडा तयार व्हायला सुरुवात झाली जो २००८ साली फुटला आणि जागतिक आर्थिक संकटात सगळ्यांना टाकून गेला. २००८ सालात जागतिक तेलाच्या किमती भयंकर वाढल्या. सौदी अरबमध्ये उत्पादन कमी झालं, परंतु चीनमध्ये तेलाची मागणी प्रचंड वाढली होती. तेव्हा वर्षांच्या मध्यावर तेलाच्या किमती प्रति पिंप १४० डॉलरपेक्षा जास्त वाढल्या होत्या; पण वर्षअखेरीस हेच तेल ४० डॉलर इतकं खाली आलं. २०११ साली आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत १९१७.९ प्रति औन्स इतकी वाढली होती. कारण गुंतवणूकदारांनी २००८ सालच्या संकटामुळे सोन्याकडे मोर्चा वळवला होता; परंतु पुढच्या वर्षी या किमती १६०० डॉलर प्रति औन्स म्हणजेच १६/१७ टक्के इतक्या खाली आल्या. २०१७ साली बिटकॉइनबाबतसुद्धा असंच घडलं. एका वर्षांतच बिटकॉइन १३०० टक्कय़ांनी वधारला आणि  ११,५०० डॉलर किमतीला पोहोचला; परंतु मग तो काही तासांतच ९,६०० डॉलर इतका खाली आला.

आपल्या देशातील उदाहरणं घ्यायची झाली तर जेव्हा जेव्हा परदेशी गुंतवणूक भरभरून आपल्या देशात आली आहे, तेव्हा तेव्हा अशा प्रकारचे बुडबुडे तयार झाले आहेत. २००७-०८ सालांमध्ये स्थावर मालमत्तेमध्ये भरपूर परदेशी गुंतवणूक झाली आणि मग घर, दुकाने, ऑफिसेस, मॉल सगळीकडे किमती झपाटय़ाने वाढायला लागल्या. बरीच गुंतवणूक झाल्यानंतर मात्र गरजेपेक्षा पुरवठा जास्त झाल्यामुळे आणि पुढे नोटाबंदी, जीएसटी, रेरा या कारणांमुळे या गुंतवणूक क्षेत्राला एकापाठोपाठ एक असे अनेक हादरे बसले. या गोष्टीचे पडसाद अजूनही आपल्या स्थावर मालमत्ता बाजारावर होताना दिसत आहेत. असेच पैसे जेव्हा शेअर बाजारात येतात तेव्हा कारण नसताना उगीच काही कंपन्यांचे शेअर वर जाताना दिसतात. कधी कधी तर गुंतवणूकदारांना असं वाटतं की, यापुढे किमती अशाच वर जाणार; पण खरी परिस्थिती जर बघितली तर लक्षात येतं की, बँकामध्ये बुडीत कर्जे वाढली आहेत. उद्योगांनी नवीन गुंतवणूक थांबवली आहे. छोटय़ा उद्योगांना पैशाची टंचाई भासत आहे. पायाभूत उद्योग क्षेत्रांमध्ये विकास होत नाहीय. तरीही बाजार मात्र आला दिवस वर जातोय. बाजाराचा किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर ज्या प्रमाणात वाढतेय त्या प्रमाणात कंपन्यांचा नफा मात्र वाढत नाहीय.

मग अशा वेळी एका सुज्ञ गुंतवणूकदाराने काय बरं करायला हवं? परिस्थितीवर दक्षतेने लक्ष ठेवावे. तुमच्या पोर्टफोलिओचा नीट आणि वेळोवेळी आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की, एखादी गुंतवणूक अचानक जास्त परतावे दाखवायला लागली आणि तेही कारणाशिवाय, तर कदाचित इथे बुडबुडा तयार होत असेल हे समजून घ्या. तुम्ही तुमचं ‘अ‍ॅसेट अलोकेशन’ म्हणजेच पोर्टफोलिओमधील वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांचे समीकरण तपासलं की, नफा काढून गुंतवणुकीतून बाहेर पडायचं तुमच्या वेळीच लक्षात येईल. तेव्हा प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या पोर्टफोलिओमध्ये रोखे, शेअर्स, सोने, स्थावर मालमत्ता याचं समीकरण ठरवून आणि त्यामध्ये प्रत्येक वर्षी झालेल्या वाढीचा अंदाज घेतला तर त्याचा फायदा नक्कीच होईल. कुठल्याही मालमत्तेचा प्रकार हा साल दर साल वेगाने वाढू शकत नाही. असे बुडबुडे गुंतवणुकीची चांगली संधीसुद्धा देतात; पण प्रवाहाच्या उलट दिशेने. जेव्हा सगळे गुंतवणूकदार एकाच ठिकाणी पैसे ओतत असतात अशा वेळी इतर कुठली रास्त भावात मिळणारी आणि कमी जोखीम असणारी एखादी गुंतवणूक जर मिळाली तर अशा बुडबुडय़ांमधून फायदा करून घेता येतो. याला ‘उलटपक्षी गुंतवणूक’ (कॉन्ट्रॅरियन इन्व्हेस्टिंग) म्हणतात. परंतु यासाठी गृहपाठ करावा लागतो आणि भरपूर संयम बाळगावा लागतो आणि जोवर योग्य गुंतवणूक संधी सापडत नाही तोवर पैसे सुरक्षित गुंतवणूक पर्यायात ठेवायची तयारीसुद्धा असावी लागते.

आपल्याकडे आज जी परिस्थिती आहे त्यामध्ये मला या पद्धतीचा अवलंब वाचकांना सुचवायचा आहे. प्रत्येक वेळी गुंतवणूक धावायला लागली की, तिच्यात पैसे गुंतवण्यापेक्षा असे पर्याय शोधा ज्यांच्याकडे कोणाचे लक्ष नसते, पण जे चांगलेच आहेत. एकदा का ही सवय लागली, मग तुम्हाला कधीच हा प्रश्न पडणार नाही की, कुठला म्युच्युअल फंड घेऊ आणि गुंतवणुकीतून कधी बाहेर पडू. तेव्हाच तुम्ही व्हाल तुमच्या आर्थिक जीवनाचे शिल्पकार!

* लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com