राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ पुन्हा एकदा जागा होऊन विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला.

‘‘राजा! बाजार सध्या कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे. डॉ. रेड्डी, भारत फोर्ज, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, वेदांत या शेअर्सनी मागील आठवडय़ात आपापले वर्षभरातील नीचांकी भाव नोंदवले. आयटीसी, िहदुस्थान युनीलिव्हर, कोलगेट, नेस्ले, खासगी बँका एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, आयसीआयसीआय, येस बँक हे आपापल्या वार्षकि तळाच्या जवळपास आहेत. म्हणजे फार्मा, एफएमसीजी सारखे सुरक्षित समजले जाणाऱ्या उद्योग क्षेत्रातील शेअर्ससुद्धा वार्षकि तळात आहेत. मग सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावे?’’ या माझ्या प्रश्नांची समाधानकारक अन् योग्य उत्तरे तुला माहिती असूनही तू जर दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील. असे म्हणून वेताळ स्तब्ध झाला.

‘‘तुझे म्हणणे खरे आहे व तुला ‘लोकसत्ता’चे वाचक असणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांबद्दल वाटणारी सहानुभूतीसुद्धा खरी आहे; परंतु अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांच्याकडे गुंतवणूकदार दुर्लक्ष करीत आहेत.’’ असे म्हणून राजा एक क्षण थांबला व पुन्हा बोलू लागला, ‘‘मूडीज या आंतरराष्ट्रीय पतनिर्धारण संस्थेने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. भारताची पत इं3 (उच्चार बी डबल ए थ्री) असून जगातील ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, फिलिपिन्स व तुर्कस्थान या देशांची पत देखील इं3 आहे. यासारखी आíथक पत असणाऱ्या देशांच्या तुलनेत सर्वात सुदृढ अर्थव्यवस्था भारताची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उदारीकरणासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करीत या देशांच्या तुलनेत अर्थव्यवस्था वाढीचा वेग, या देशातील नागरिकांचा उच्च बचत दर, मर्यादित असलेली चलनवाढ वाढत असलेला परकीय चलनाचा साठा या वाखाणण्याजोग्या गोष्टी असल्याचे हा अहवाल नमूद करतो. देशातील धोरणकर्त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनामुळे देश सुदृढ अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करीत असा आशावाद या अहवालात आहे.’’ राजाने सांगितले.

‘‘तेलआदी जिनसांच्या किंमती आपल्या कित्येक वर्षांच्या तळात असल्याने व रिझव्‍‌र्ह बँकेने सातत्याने प्रयत्न केल्याने महागाई नियंत्रणात आहे. या कारणांनी २०१६ हे वर्ष आíथक आवर्तनाच्या दिशा बदलाचे असून भविष्यातील आíथक वृद्धीचा पाया घालणारे असेल असा उल्लेख हा अहवाल करतो,’’ राजा म्हणाला.

‘‘हे सर्व घडून येण्यासाठी बँकांनी आपले ताळेबंद सुधारणे गरजेचे आहे. या देशातील खासगी उद्योगांनी जागतिक स्पर्धात्मक असणे गरजेचे आहे, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे’’ राजा म्हणाला. मागील वर्षांत कमी झालेले व्याज दर व जिनसांच्या कमी झालेल्या किमतींचा परिणाम कंपन्यांचा नफा वाढण्यात होईल व या वाढीव नफ्यावर सरकारला वाढीव कर मिळेल एकूण सरकारी महसुलात कंपन्या सरकारला देत असलेल्या कराचे प्रमाण १७ टक्के असून यामुळे सरकारच्या वित्तीय तूट कमी करण्याच्या प्रयत्नांना हातभार लागणार आहे,’’ राजा म्हणाला.

‘‘दलाल स्ट्रीटची काय खबरबात?’’ वेताळाने राजाला विचारले.

‘‘हे बघ! दलाल स्ट्रीटवर चर्चा रंगत असलेल्या शेअरच्या बातम्या अशा आहेत,’’ राजाने वेताळाची उत्सुकता वाढवली.

‘‘पहिली कंपनी आहे अरिवद लिमिटेड. लालभाई समूह हा भारतातील वस्त्रोद्योगात सर्वात मोठा उद्योग समूह असून अरिवद ही या समूहातील सर्वात मोठी कंपनी आहे. अरविदकडे अ‍ॅरो, फ्लाइंग मशीन, यूएस पोलो, टॉमी हायफ्लायर, वंडर ब्रा यासारख्या जागतिक नाममुद्रांच्या भारतातील वितरणाचे हक्क आहेत. कापूस हे कंपनीचा कच्चा माल असून सातत्याने कापसाच्या किमती घसरत आहेत. ही कंपनी तयार कापडाची मोठी निर्यातदार असल्याने रुपयाच्या घसरणीचाही तिला फायदा होत आहे. तीन ते सहा महिने कालावधीत हा शेअर ५-७% परतावा देऊ शकेल,’’ राजा म्हणाला.

‘‘दुसरी चर्चा आहे ती अ‍ॅक्सिस बँकेची. एका दलाली पेढीने काही आपल्या संस्थात्मक ग्राहकांना निवडक कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. अनौपचारिक वातावरणात झालेल्या या कार्यशाळेत अ‍ॅक्सिस बँकेने केलेले सादरीकरण या निधी व्यवस्थापकाला फारच भावले. अ‍ॅक्सिस बँकेने केलेल्या या सादरीकरणानुसार बँक मार्च २०१६ मध्ये रु. ३७ ईपीएस नोंदवेल तर मार्च २०१७ चा ईपीएस रु. ४२ असेल. लवकरच अ‍ॅक्सिस बँक ५०० व एका वर्षांत ७००चा टप्पा गाठेल, अशी आशा या फंड मॅनेजरला वाटते.

‘‘मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो,’’ राजा म्हणाला. ‘‘स्टेट बँकेचे भांडवली मूल्य आहे १५४९०६.२२ कोटी व कोटक बँकेचे भांडवली मूल्य आहे १२५७३८.२१. कोटी या दोन बँकांतील भांडवली मूल्यांतील फरक आहे १८ लाख कोटींचा. ‘प्राप्ते तू षोडशे वष्रे गर्दभी अप्सरा भवेत’ या संस्कृत वाचनाची आठवण ठेव व गाढविणीला (गर्दभी) अप्सरा समजू नकोस. मी स्टेट बँकेबाबत खूपच आशावादी असून पाच गुंतवणुका करायच्या झाल्या तर मी स्टेट बँकेचा समावेश नवीन पाच गुंतवणुकांत करेन,’’ राजा म्हणाला.

‘‘आणखी एक शेअर आहे. इंटरग्लोब (इंडिगो) एव्हिएशन. याबाबत मी तुला आधी सांगितले होते. भारतातील शेअर बाजारात नोंदलेल्या नागरी विमान वाहतुकीच्या क्षेत्रातील नफ्यात असलेली ही एकमेव कंपनी आहे. सध्या १२ वर्षांच्या तळाला असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती अजून वर्ष – दीड वर्ष तरी अशाच तळाला राहातील असा अंदाज असल्याने याचा फायदा ‘इंटरग्लोब’ला होणार आहे. वर्षांच्या पहिल्या दिवशी १३९५.५० चे शिखर गाठलेला हा शेअर येत्या वर्षभरात १५५० ते १६०० चा भाव नोंदवेल,’’ राजाने सांगितले.

‘‘ठीक आहे राजा,’’ असे म्हणून विक्रमादित्याचे मौन भंग होताच वेताळ विक्रमादित्यापासून प्रेतासहित दूर झाला व स्मशानातील झाडाला पुन्हा लटकू लागला.

gajrachipungi@gmail.com