तृप्ती राणे

गेल्याकाही दिवसांत हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित असलेली वेबमालिका पाहिली. ज्यावेळी ही घटना घडत होती तेव्हा हर्षद मेहता ‘बिग बुल’ म्हणून ओळखला जायचा. त्याने १९९२ साली केलेल्या घोटाळ्यात मार्केट कोसळलं; सुचेता दलाल यांनी या सगळ्या घोटाळ्याचा पाठपुरावा केला होता, एवढीच जुजबी माहिती मला याआधी होती. त्यानंतर केतन पारेख यांचा २००१ सालचा के-१० कंपन्यांच्या शेअर्समधील घोटाळासुद्धा अगदी वरकरणी माहीत होता. जरी कुतूहल वाटलं तरीसुद्धा त्या दोन्ही घटनांबद्दल फारशी माहिती नाही मिळविली. कारण त्यावेळी शेअर बाजाराशी माझा कुठलाही संबंध नव्हता. एखाद्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाची गुंतवणूक तेव्हा बँकेतील मुदत ठेव एवढय़ाच पर्यायापुरती मर्यादित होती. मग पुढे शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरीला लागले तसा शेअर बाजार आवडू लागला आणि या घटनांची उकल होत गेली.

अनेक वर्षांनी या घडामोडी जेव्हा नाटय़रूपात समोर आल्या तेव्हा मनात एक प्रश्न उभा राहिला – तेव्हापासून आजपर्यंत अनेक बदल झालेत ना! १९९२ मध्ये ‘सेबी’चे येणं, ‘एनएसई’ची स्थापना झाली, शेअर बाजाराचे डिजिटायझेशन झालं आणि नियमनाचा कायदाही सुधारला. परंतु आजसुद्धा अनेक गुंतवणूकदार अजूनही पोळले जात आहेत. नुकसान होत आहे आणि हाव वाढत आहे. भीती अजूनही आहे, परंतु उत्सुकतासुद्धा तितकीच आहे. जगभरात अनेक घोटाळे याआधीही झाले आहेत, अजूनही होत आहेत आणि यापुढेही होत राहतील. आणि या सर्वाच्या मागे जर कोणतं इंधन असेल तर ते आहे आपली न संपणारी हाव!

शेअर बाजार म्हणजे झटपट श्रीमंतीचा मार्ग असा विश्वास अनेकांना वाटतो. फटाफट पैसे वाढताना अनुभवायला एक वेगळीच मजा आहे. अनेक वर्षे घासून मेहनत करूनसुद्धा कधी कधी मनाजोगता पगार मिळत नाही, परंतु इथे मात्र नशीब उघडलं तर काही दिवसांतच करोडपती होता येते, अशी भोळी समजूत त्या काळात अनेकांची झाली (आणि अजूनही आहे बरं का!). १९९२ मध्ये सेन्सेक्स २००० वरून ४००० इतका वाढायला फक्त दोन महिने लागले होते. मेहता यांच्या कंपन्यांचे भाव तर दिवसागणिक चक्रवाढीच्या रथावर स्वार झाले – एसीसी तीन महिन्यांत २०० रुपयांवरून ९००० रुपये! अनेक किरकोळ गुंतवणूकदारांनी हे पाहिलं आणि हव्यासापोटी स्वत:चे आणि उसने घेतलेले पैसे फक्त ‘टिप्स’च्या भरवशावर बाजारात लावले. काही कंपन्यांचं तर काहीच नसताना त्यांचे भाव वाढले होते. ज्या वेळी हे सगळं कसं होतंय याबाबत चौकशी सुरू झाली आणि पुढे मेहता यांना अटक झाली तेव्हा मार्केट तुटलं आणि फक्त किरकोळ गुंतवणूकदारांचं नाही तर अनेक बँका आणि वित्तीय संस्थांचंसुद्धा नुकसान झालं (हा आकडा ५,००० कोटी रुपयांचा सांगण्यात येतो!). वर्षभरात सेन्सेक्स ४५०० हजारांवरून २००० वर परत खाली आला.

काय बरं चुकलं इथे? जास्त जोखीम घेतली की जास्त फायदा झालाच पाहिजे असं गणित आपण मांडतो ना? ‘रिस्क है तो इश्क है’ असंच म्हटलंय ना त्या मालिकेमध्ये. परंतु जोखीम ही नक्की कोणती आहे आणि किती आहे हे कुणी पाहतंय का? एखाद्या शेअरचा भाव अचानकपणे भरधाव वेग घेतो तेव्हा मनात संशयाची पाल चुकचुकायला नको का? भाव हा पुढे काही तरी चांगलं होणार या अपेक्षेने वाढतो आणि जेव्हा खरी बातमी बाहेर पडते तेव्हा एक तर स्थिरावतो किंवा खाली येतो. मग ही अपेक्षा करणं चुकीचं आहे की शेअर बाजारातून नेहमीच भरपूर परतावे मिळतात. म्हणून हव्यासापोटी शेअर बाजाराकडे न पाहता जर आपण एक दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय म्हणून पाहायला हवं. आपल्या अपेक्षा वाजवी राखल्या की मग झटपट श्रीमंतीची स्वप्नं आपल्याला भुरळ पाडत नाहीत.

मुळात आपल्याला किती पैशांची गरज आहे हे जरी कळलं पाहिजे. त्यानुसार कोणते पर्याय वापरून आपण ती रक्कम साठवू शकतो हे जितक्या लवकर कळेल तितकं चांगलं. ‘ग्रीड’ म्हणजेच हव्यास आणि ‘नीड’  म्हणजेच गरज या दोन सीमा रेषांच्या दरम्यान संतुलन हवंच. गरजेपेक्षा थोडे जास्त आणि हव्यासापेक्षा कमी पैसे असले की आपण समाधानी आयुष्य जगू शकतो, परंतु गरजा वाढल्या आणि मिळकत त्या प्रमाणात वाढवता आली नाही की मग धावाधाव सुरू होते. कुठून तरी, कसे तरी शॉर्टकटने पैसे मिळाले की आपण सुखी होऊ असं आपल्याला वाटतं. परंतु या हव्यासाला अंत नाही. अजून मिळाले पाहिजे आणि म्हणून अजून जोखीम घेतली पाहिजे अशी अपेक्षा मग आपल्याला पछाडते आणि इथेच आपला समतोल ढासळतो. त्यात अशातच शॉर्टकट दाखवणारी माणसं भेटली की मग झालंच. इथे मला वरील मालिकेतील हर्षद मेहताचं वाक्य सांगावंसं वाटतं. मृत्यूच्या दाढेत असताना तो म्हणाला – ‘मला कदाचित काही कोटी पुरले असते मनाजोगतं जगायला. माझ्या मुलाने माझ्यासारखं आयुष्य जगू नये!’

आता हव्यासानंतर गरजेकडे वळूया. अनेकदा असं लक्षात येतं की आर्थिक दुर्बळता ही अनेक कुटुंबांच्या बाबतीत मानसिक अस्थैर्याचं कारण असते. घरात गरज पुरवण्याइतका पैसा येत नाही आणि त्यामुळे सतत भांडण-तंटे होत राहतात. व्यसनं लागण्यामागेसुद्धा अनेकदा आर्थिक कटकटी जबाबदार असतात असं म्हटलं जातं. म्हणजे ‘प्रॉब्लेम’ सोडवता येत नाही म्हणून तो काही काळ विसरायचा आणि जेव्हा जाणीव होईल तेव्हा मानसिक दडपणाखाली जगायचं – असा कानमंत्र बहुधा काही लोक पाळत असावी, परंतु एक साधं गणित मला इथे घालायला नक्कीच आवडेल की, व्यसनांवर केलेला खर्च जर गुंतवणुकीत बदलला तर त्यातून थोडा तरी ‘प्रॉब्लेम’ सोडवता येईल नाही का?

तुकोबा महाराजांची रचना – ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान आणि अनेकवेळा घरातल्या मोठय़ांकडून कानी पडलेली ही म्हण – ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ ही दोन बोधवाक्य आपल्या आर्थिक घडणीला खरा अर्थ देतात. याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण आर्थिक प्रगतीची स्वप्नं अजिबात बघू नयेत. स्वप्नं नक्की बघावी आणि त्यांना सत्यात उतरवण्यासाठी जी काही मेहनत लागते ती पुरेपूर करावी. केलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत. पगार/व्यावसायिक मिळकत आणि गुंतवणूक यांचं समीकरण बांधलं की त्यातून स्वप्नं पूर्ण करता येऊ शकतात. तेव्हा काहीही मेहनत न करता फक्त प्रत्येक वेळी लॉटरी लागेल मग ती शेअर बाजारातून असो की इमूच्या अंडय़ातून, अशी आस घातकीच. रातोरात श्रीमंती फळायला नशीब चांगलंच बलवत्तर पाहिजे किंवा पूर्वजांच्या पुण्याईचा असीमित ठेवा आपल्याकडे असायला हवा, परंतु आपल्यातील अनेकांकडे यातील कदाचित काहीही नाही असं समजून जर ‘प्रॅक्टिकल’ राहिलं तर ते जास्त योग्य होईल.

अजून एका गृहस्थांनी केलेल्या मार्गदर्शनाचा इथे उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी एक साधं समीकरण मांडलं – शेअर बाजाराकडून किती अपेक्षा करावी? सर्वसाधारणपणे सरासरी १०ते १२ टक्के. एखादं वर्ष २० टक्केही परतावा देईल, तर एखाद-दुसरं वर्ष नुकसानीचंही ठरेल, परंतु आपलं आर्थिक उद्दिष्ट आणि जोखीम क्षमता सांभाळून जर गुंतवणूक केली तर नुकसान कमी होऊन फायदा व्हायची शक्यता वाढते. हे फक्त शेअर बाजारासाठीच नाही तर प्रत्येक गुंतवणूक प्रकारासाठी लागू होतं. अल्पकाळात मजबूत फायदा हे धोक्याचं चिन्ह आहे. तेव्हा एकतर वेळीच बाहेर पडावं किंवा त्या भानगडीत पडूच नये. मुळात गुंतवणूक ही शर्यत नाही! आपल्याला किती परतावे मिळाले यापेक्षा हवे तेव्हा पैसे पुरले का हे जास्त महत्त्वाचं नाही का?

आज शेअर बाजार मार्चमधील मंदी विसरून पुढच्या उच्चांकाकडे वाटचाल करतोय. मुदत ठेवी आणि अल्पबचत योजनांचे कमी झालेले व्याजदर इतक्यात डोकं वर काढायच्या मूडमध्ये दिसत नाही. ज्यांनी पैसे गुंतवले आहेत ते – बाहेर पडू की अजून थांबू या द्विधेत असतील. अजूनही आपल्यातील अनेकांच्या गरजासुद्धा कदाचित पूर्ण होत नसतील, परंतु ‘रिस्क है तो इश्क है’ करत मार्केटमध्ये उडी मारणं त्यावरील उपाय नाही. तेव्हा फक्त मागील परतावे किंवा नुकसान न बघता सारासार विचार केलेला बरा. अभ्यास करून गुंतवणूक करा, पर्याय समजून पैसे गुंतवा, ‘रिस्क’ बरोबर ‘इश्क’ करू नका. आयुष्यभराचा जोडीदार निवडताना जी काळजी घेता ती येथेही घ्या आणि मोहाला बळी पडू नका. फायदा हा आपला आत्मविश्वास वाढवतो, तर नुकसान तो खाली आणतो. खिशात स्वत:चा पैसा असलेला माणूस ताठ कण्याने आणि मानेने उभा राहतो, तर नुकसान आणि कर्जात बुडालेला माणूस स्वत: दबलेला असतो आणि कुटुंबालासुद्धा चिरकाल आनंद देत नाही. आपलं आर्थिक आयुष्य जर समाधानीसुद्धा असावं असं ज्याला वाटतं त्याने नक्कीच हा विचार करावा आणि त्यानुसार योग्य कृती करावी. मदत मिळते, पण त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतील. आणि खऱ्या गरजेचं भान नेहमीच ठेवावं तरंच केलेल्या प्रयत्नाचा आनंद सहजपणे उपभोगता येईल. सरतेशेवटी एका मराठी चित्रपटातला (डबल-सीट) एक संवाद सांगावंसं वाटतो – ‘आयुष्यात असं काहीतरी करावं की ज्याने आयुष्यभर बाप (शब्दश: नाही तर मोठं) झाल्यासारखं वाटेल.’

* लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com