कौस्तुभ जोशी

एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित सगळ्यात महत्त्वाची आकडेवारी म्हणून जिचा उल्लेख केला जातो ते म्हणजेच देशाने एका आर्थिक वर्षांत कमावलेले उत्पन्न (जीडीपी) होय. एका आर्थिक वर्षांच्या काळात जेवढय़ा वस्तू आणि सेवा देशात निर्माण केल्या जातात त्याचं पशातील मूल्य म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) होय. आता ही संकल्पना थोडी सविस्तरपणे पाहूया. एखाद्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न त्या कुटुंबातील सर्व कमावत्या व्यक्तींवर अवलंबून असते, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेत कमावणाऱ्या आणि गमावणाऱ्या अशा दोन्ही घटकांचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्न ठरविले जाते. ढोबळमानाने विचार करता लोकांनी केलेला खर्च म्हणजे त्यांची क्रयशक्ती, वर्षभरात झालेली गुंतवणूक, सरकारने केलेला खर्च, सरकारने दिलेले अनुदान, परदेशातील भारतीयांनी व परदेशात नफा कमावणाऱ्या कंपन्यांनी देशात पाठवलेला पसा, आयात व निर्यात यांचा एकत्रित झालेला फायदा किंवा तोटा यांचा एकंदरीत विचार जीडीपी ठरविताना केला जातो.

* जीडीपीची आकडेवारी कशी समजून घ्यायची?

जीडीपीमध्ये अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांमध्ये होत असलेली उलाढाल परावर्तित होते. अर्थव्यवस्थेत प्राथमिक (शेती, मासेमारी आणि शेतीसंबंधित उद्योग), द्वितीय (उद्योग, उत्पादन क्षेत्र) आणि तृतीय (सेवा क्षेत्र) अशा तीन क्षेत्रांचा समावेश होतो. या सर्वामध्ये किती वाढ झाली किंवा घट झाली याचे उत्तर जीडीपीच्या आकडेवारीवरून मिळते.

* मागणीची बाजू आणि पुरवठय़ाची बाजू

केंद्रीय सांख्यिकी संस्थेद्वारे जी आकडेवारी प्रसिद्ध होते त्यात मागणी आणि पुरवठा अशा दोन्ही बाजूंचा विचार केला जातो. म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांनी कमावलेले एकूण उत्पन्न किती याच्या आकडेवारीवरून लोकांची खरेदी करण्याची क्षमता किती व देशात किती बचत होऊ शकते व पुढे गुंतवणूक किती होऊ शकते याचा अंदाज आपल्याला येतो. खासगी क्षेत्राकडून, सर्वसामान्य जनतेकडून केला जाणारा खर्च, सरकारी खर्च, उद्योग क्षेत्राकडून केली जाणारी नव्या उद्योगातील गुंतवणूक यांची आकडेवारी वाढत्या दिशेने असेल तर उत्पन्न आपोआपच वाढले आहे याचा अंदाज सहज येतो. अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी हे चक्र सतत फिरते राहायला हवे. जीडीपीची आकडेवारी ठरविताना प्रमुख आठ क्षेत्रांत झालेल्या वृद्धीचा अंदाज वर्तवला जातो. कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, पोलाद, वीज निर्मिती, सिमेंट, खते, तेल शुद्धीकरण प्रकल्प अशी ही आठ प्रमुख क्षेत्रे आहेत. यातून निघणाऱ्या उत्पादनावरून अगदी स्पष्ट चित्र पुढे येते. या आठ घटकांमध्ये जर सतत नकारात्मक आकडेवारी समोर येत असेल तर याचा अर्थ मूलभूत काहीतरी चुकतंय. सिमेंट, पोलाद यांच्या उत्पादनात वाढ होते आहे म्हणजेच बांधकाम आणि संबंधित क्षेत्राला सुगीचे दिवस आले असे आपण म्हणू शकतो. जीडीपीच्या आकडेवारीमध्ये प्राथमिक क्षेत्रात घसरण, याचा अर्थ कृषी क्षेत्रामध्ये आलबेल नाही असा सहजपणे लावता येतो.

* जीडीपीची आकडेवारी महत्त्वाची का ठरते?

देश आर्थिक आघाडीवर दमदार वाटचाल करत आहे या विधानाला बळकटी देण्यासाठी ज्या आकडेवारीचा आधार घ्यावा लागतो ती आकडेवारी जीडीपीच्या तक्त्यातून सहजपणे उपलब्ध होते. देशाचा समग्र अर्थात ‘मॅक्रो’ चेहरामोहरा जीडीपीच्या आकडेवारीतून समोर येतो. देशात तेजीचे वातावरण आहे, का मंदीची चाहूल लागली आहे याचा अंदाज सलगपणे जीडीपीची आकडेवारी पाहिल्यांनतर येतो.

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

joshikd28@gmail.com