18 July 2019

News Flash

आयुष्यातील महत्त्वाची वित्तीय वळणे

थेंबे थेंबे तळे साचे

|| तृप्ती राणे

जानेवारी महिन्यात एका वेगळ्याच प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी मिळाली. या कार्यक्रमाचे प्रशिक्षक वर्षांतून एकदाच भारतात येतात. त्यामुळे उत्कंठासुद्धा खूप होती की नक्की काय शिकवणार आहेत. विषय गुंतवणुकीशी निगडित असला तरी अजून एक वेगळा दृष्टिकोन शिकायला मिळेल या हेतूने गेला वर्षभर या कार्यशाळेची वाट पाहत होते. कार्यशाळेमध्ये माझ्यासारखे आणि माझ्यापेक्षा जास्त कार्यानुभव असलेली मंडळीसुद्धा होती. अनेक वर्षे आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक सल्ले देऊनही हे सगळे इथे का आले आहेत या गोष्टीचा खुलासा मला कार्यशाळा संपल्यावर झाला. आपण सगळेच जण, पैसे किंवा गुंतवणूक म्हटले की परतावे, जोखीम, ध्येय आणि काळ या चौकटीत सगळे काही बसवत असतो. परंतु खरे तर हा चौकोन नसून एक पंचकोन आहे हे मला त्या दिवशी कळले.

आपण नेहमीच असे म्हणतो, किंवा बऱ्याचदा दुसऱ्याकडून ऐकतो की पैशांचा व्यवहार हा भावनेवर विसंबून करू नये. त्या बाबतीत व्यावहारिक असणे हेच फायद्याचे ठरते. तेव्हा भावनांवर योग्य नियंत्रण ठेवून, नातेसंबंधांना जरा हातभर लांब ठेवून व आपल्या आर्थिक उद्दिष्टांना नेहमीच लक्षात ठेवून आपले पैशासंदर्भातील निर्णय घ्यावेत. परंतु, कितीही आदर्शवादी वाटला तरी हा व्यवहार प्रत्येक वेळी आपण पाळू शकतो का?

माणसाच्या आयुष्यात खूप वेगवेगळी वळणे येत असतात. या बदलांमुळे आयुष्यात मध्येच असा काळ येतो ज्या बाबतीत आपण पूर्णपणे अनभिज्ञ असतो. आपली बदल पचवायची क्षमता जशी असेल त्यानुसार हा काळ संपायला वेळ लागतो. अशा वेळी आपली मानसिक स्थिती खूपच दोलायमान असण्याची शक्यता जास्त असते. उदाहरण घ्यायचे तर नोकरीतील मोठा बदल, घटस्फोट, मृत्यू, गंभीर किंवा दीर्घकालीन आजार, लॉटरी, वारसा हक्काने मिळालेले धन, किंवा मोठे आर्थिक नुकसान वगैरेपैकी किमान एक तरी घटना प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकदा तरी येतेच येते. जेव्हा एक व्यक्ती अशा एखाद्या परिस्थितीतून जात असते तेव्हा तिची तार्किक आणि व्यावहारिक क्षमता कमी पडते. मग अशा वेळी एकतर गोंधळलेली अवस्था होऊ शकते किंवा ती व्यक्ती स्वत:ची निर्णय घ्यायची क्षमता पूर्णपणे हरवून बसते. ही अवस्था काही दिवस किंवा काही महिने राहू शकते, तर काही वेळा चार-पाच वर्ष सुद्धा अशीच निघून जातात.

साधारणपणे आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीचे निर्णय चुकले की, आपण त्याच्या बुद्धिमत्तेला किंवा भावनिक असण्याला किंवा परिस्थितीला दोष देतो. खरे तर अशा वेळी गरज असते ती त्या व्यक्तीशी त्याच्या भावनिक स्तरावर जाऊन एक संवाद साधायची. किंवा कधी कधी तर त्याला कोणत्याही निर्णयासाठी उद्युक्त न करण्याची. उदाहरण घ्यायचे झाले तर एखाद्या जीवघेण्या अपघातात वाचलेल्या परंतु महत्त्वाचा अवयव गमावलेल्या व्यक्तीकडे आपण काही काळ तरी संयम आणि तर्कशुद्धतेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्याचप्रकारे एखाद्या घटस्फोटित किंवा मृत्यूमुळे जोडीदार गमावलेल्या व्यक्तीला सुद्धा सामान्य व्हायला वेळ द्यावा लागतो. आज आपल्या देशात असे अनेक वरिष्ठ नागरिक आहेत ज्यांची मुले परदेशी स्थायिक आहेत. या व्यक्तीसुद्धा आला दिवस भावनिक लढा लढताहेत.

अशा प्रकारची परिस्थिती कुणाच्याही बाबतीत कधीही घडू शकते. तेव्हा कुटुंबातील इतर सदस्यांनी किंवा जवळच्या मित्रमैत्रिणीने ही गोष्ट जाणून घेऊन एका समुपदेशकाकडे नक्कीच त्या व्यक्तीला पाठवायला आहे. सुज्ञ सल्लागार अशा अवस्थांशी परिचित असतो. तो आर्थिक गरजेबरोबरच गुंतवणूकदाराच्या भावनांचासुद्धा आढावा घेतो. गुंतवणूकदार नेमक्या कोणत्या मानसिक अस्थिरतेतून प्रवास करत आहे हे तो जाणतो आणि अशा वेळी त्याला चुकीचे निर्णय घेण्यापासून सुरक्षित ठेवू शकतो.

सूचना :

  • जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्याची किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.
  • या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.
  • सर्व रेग्युलर ग्रोथ प्लानचे म्युच्युअल फंड
  • यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील; परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.
  • म्युच्युअल फंडांचे एक्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर – यांचा विचार या सदरामध्ये केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

First Published on March 4, 2019 12:05 am

Web Title: article on important financial turnover in life