आशीष ठाकूर

निफ्टी निर्देशांकावर भाकीत केलेले, १५,३३०चे वरचे लक्ष्य साधले गेल्यानंतर गुंतवणूकदारांच्या आनंदी भावनेला निफ्टी म्हणते-  ‘मी तेव्हा तशी’, तर या उच्चांकावरून पुन्हा अपेक्षित असलेली हजार अंशांच्या घसरणीत गुंतवणूकदारांच्या मनातील भीती, चिंतेला निफ्टी म्हणते ‘मी आता अशी’!

हे चक्र पूर्ण केल्यावर, पुन्हा निफ्टीने १४,४००चा आधार घेत १५,०००च्या स्तराला गवसणी घातली. तेजी-मंदीच्या हिंदोळ्यावर निफ्टीने केलेला मोहक पदन्यास हे सरलेल्या सप्ताहाचे वैशिष्टय़. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५०,४०५.३२

निफ्टी : १४,९३८.१०

तेजी अथवा मंदीच्या धारणेसाठी सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० हा ‘महत्त्वाचा बिंदू स्तर’ ही संकल्पना विकसित केली. या स्तरावर निर्देशांक सातत्याने टिकल्यास गणिती पद्धतीने विकसित केलेले वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ५२,५१६ आणि निफ्टीवर १५,३३१ दृष्टिपथात आले. जेव्हा निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,०००चा स्तर तोडल्यावर सेन्सेक्सवर ४८,८९० आणि निफ्टीवर १४,४६७चे खालचे लक्ष्यदेखील साधले गेल्याचे दिसले.

येणाऱ्या दिवसांत निर्देशांकावर सातत्याने, म्हणजे सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,०००च्या स्तरावर टिकणे नितांत गरजेचे आहे. तरच सेन्सेक्सवर ५२,५०० आणि निफ्टीवर १५,४००चे लक्ष्य साध्य होईल. अन्यथा सेन्सेक्स ५१,००० आणि निफ्टी १५,०००च्या खाली टिकल्यास मंदीचे आवर्तन सुरू होऊन, निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४८,८०० ते ४८,२५० आणि निफ्टीवर १४,४०० ते १४,२०० असे असेल.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल व त्यांचे विश्लेषण..

कंपन्यांचे जे वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर ‘महत्त्वाचा बिंदू स्तर’ ही संकल्पना काळाच्या कसोटीवर उतरली का? या संकल्पनेची चिकित्सा ही ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ या न्यायाने व्हायला हवी. यासाठी आपण या स्तंभातील ४ जानेवारीच्या लेखात नमूद इन्फोसिस या समभागाचा आधार घेऊया.

इन्फोसिसच्या तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही १३ जानेवारी होती. १ जानेवारीचा बंद भाव १,२६० रुपये होता. व निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर १,२२० रुपये होता. तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या बिंदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट, असे गृहीतक होते. लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर १,२२० रुपयांचा स्तर राखले जाऊन, १,३५० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरच विश्लेषण होते, व त्यात या क्षेत्रासाठी ‘दुग्धशर्करा’ योगासारख्या घटनांची भर पडत होती.

करोनाकाळातील प्रत्यक्ष लाभार्थी क्षेत्र हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र. कर्मचारी कार्यालयात न जाता घरातूनच काम करत असल्याने कंपनीच्या मूलभूत खर्चात (कार्यालयीन भाडे, वीज, पाणी, देखभाल वगैरे) भरीव कपात झाल्याने नफ्यात वाढ, तसेच वाढणाऱ्या ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे पुन्हा प्रत्यक्ष व थेट लाभार्थी असलेले असे हे क्षेत्र.

आपल्या पारदर्शक कार्यपद्धतीने गुणवत्तेचे मापदंड निर्माण करणारी, विविध मानाचे तुरे इन्फोसिसच्या शिरपेचात होतेच. सोबत त्या वेळेला बाजारातील नितांत सुखद असे तेजीचे वारे इन्फोसिसच्या शिडात असल्याने १,३५० रुपयांचा पैलतीर हा हाकेच्या अंतरावर आहे, असाच सर्वाचा कयास होता (इतरत्र इन्फोसिसचे वरचे लक्ष्य हे १,५०० रुपये ते १,७०० रुपयांपर्यंत वर्तविले जात असताना, या सुखद घटना घडत असताना, आपण १,३५० रुपयांचे माफक लक्ष्य कसे सुचवीत आहोत? हीच तर आपल्या ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेची खरीच कसोटी होती!).

प्रत्यक्ष निकाल जाहीर झाला, त्या १३ जानेवारीला दिवसांतर्गत १,३९३चा उच्चांक मारत, समभागाने १,३५० रुपयांचे वरचे लक्ष्य साध्य केले. निकालापश्चात इन्फोसिसने आजतागायत १,४०० रुपयांचा स्तर पार केलेला नाही. ज्या वाचकांकडे इन्फोसिस दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेंतर्गत आहे त्यांनी ते राखून ठेवले व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत सात टक्क्यांचा परतावा मिळविला. आजही इन्फोसिस १,२२० रुपयांचा महत्त्वाचा बिंदू स्तर राखून आहे आणि ५ मार्चचा त्याचा बंद भाव हा १,३१६ रुपये आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.