29 March 2020

News Flash

थेंबे थेंबे तळे साचे : गोष्ट चार गुंतवणूकदारांची!

वैयक्तिक आर्थिक स्थिती ही ज्ञानापेक्षा वागण्यावर जास्त अवलंबून असते.

(संग्रहित छायाचित्र)

तृप्ती राणे

एका शहरात चार गुंतवणूकदार होते. सगळे एका शाळेत जाऊन गुंतवणूक कशी करायची हे शिकून आले. मग त्यांनी ठरवलं की, आता आपल्याला योग्य ज्ञान मिळाले आहे तेव्हा चला गुंतवणूक करायला सुरुवात करू या.

पहिला म्हणाला, ‘‘मी सगळे पैसे शेअर बाजारात घालणार. आला दिवस मार्केट मस्त चाललंय. शिवाय सगळीकडून चांगल्या बातम्या येत आहेत. भारत कसा गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे हे मी रोज पेपरमध्ये वाचतोय. म्हणून जास्तीत जास्त फायदा शेअर बाजारातून मिळणार याबद्दल मला ठाम विश्वास वाटतोय.’’

त्यावर दुसरा म्हणाला, ‘‘मला तुझा म्हणणं अगदी पटतंय. मीसुद्धा हेच करणार. फक्त माझ्याकडे पैसे नाहीयत. तर मी कर्ज काढून गुंतवणूक करेन. कर्जाच्या दरापेक्षा नक्कीच मला परतावा चांगला मिळेल आणि तसाही माझा क्रेडिट स्कोअर चांगला आहे. तेव्हा मला कुणीही कर्ज देईल.’’

तिसरासुद्धा त्यांना जोड देत म्हणाला, ‘‘मी विचार करतोय तो डेरिव्हेटिव्हज्चा. काय गुंतवणूक आहे! किती कमी पशांमध्ये आपण बाजारात खेळू शकतो आणि शेअर्सबरोबर कमोडिटीज्, करन्सी हेही  आहेत. तेव्हा निरनिराळ्या पर्यायांची सांगड घालून आपण नक्कीच पैसे मिळवू शकतो आणि तेसुद्धा कमी पैसे लावून. तर मी यामध्ये गुंतवणूक करेन.’’ चौथा गुंतवणूकदार इथवर शांत होता. बाकीच्या तिघांनी त्याला मग विचारलं, ‘‘काय रे! तू तुझ्या ज्ञानाचा वापर करणार की वाया जाऊ देणार? की गुंतवणुकीला घाबरतोस अजूनही? आम्ही तिघं एवढे बोललो, पण तू त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाहीस!’’

त्यावर तो चौथा त्याच्या विचारातून बाहेर पडला आणि म्हणाला, ‘‘मी तुम्हा तिघांचं बोलणं ऐकलं; पण मला तुमचे निर्णय जरा धाडसी वाटतायत. सगळे पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नयेत, कर्ज काढून गुंतवणूक करणे धोक्याचे आणि क्लिष्ट गुंतवणूक पर्याय जे आपल्याला समजत नाही त्यांच्या भानगडीत पडू नये हे सगळं आपण शिकलो; पण कदाचित तुम्हा तिघांना त्यातील ज्ञान जास्त असेल म्हणून तुम्ही असे गुंतवणूक प्रकार निवडले असावेत. मी बाबा सामान्य गुंतवणूकदार आहे. मला फारसं तितकं समजत नाही, तेव्हा मी दोन गोष्टी करायचं ठरवलंय. पहिलं म्हणजे मी माझं आर्थिक नियोजन करून घेणार आणि दुसरी माझ्या गरजेनुसार गुंतवणूक कधी, किती आणि कुठे करायची हे ठरवणार. मला आला दिवस मार्केट वर आहे की खाली हे बघायला वेळ नाहीय. म्हणून मी तीन-चतुर्थाश पर्याय निवडून त्यात सातत्याने गुंतवणूक करेन. मला १५ टक्के परतावा हवा म्हणून मी गुंतवणूक न करता, माझ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी पैसे जमा होतील या भावनेतून गुंतवणूक करणार आहे.’’

त्याचं हे सांगून संपत नाही तोवर बाकीचे तिघे त्याच्यावर हसले. म्हणाले, ‘‘काय यार! अरे, इतका सगळा आटापिटा केला. ज्ञान मिळवलं ते काय असं स्लो ट्रेनमध्ये चढून कर्जतपर्यंत जायला? जेथे सुपरसॉनिक जेट आहे तेथे स्लो ट्रेनने कोण जाणार. दोन-तीन वर्षांत कमवायचं आणि मग मजा करायची. तुझे हे नियम सामान्य माणसासाठी ठीक आहेत, ज्याला जास्त माहीत नसतं. आपण तज्ज्ञ आहोत आणि म्हणून आपले पोर्टफोलिओ कसे ढासू असले पाहिजेत. तू पण कसला थकेला निघालास!’’

त्यांचं हे म्हणणं ऐकून तरीही विचलित न होता त्या चौथ्याने त्याचा निर्णय अजिबात नाही बदलला आणि प्लॅननुसार गुंतवणूक केली.

पुढे या गुंतवणूकदारांचं काय झालं बरं? पहिल्याने सगळे पैसे शेअर बाजारात लावले होते, पण भयंकर पडझडीमुळे त्याची गुंतवणूक ३० टक्क्य़ांनी कमी झाली. त्यात नोकरी गेली आणि शिवाय कोणताही इमर्जन्सी फंड नसल्यामुळे तोटय़ात गुंतवणूक विकावी लागली. आपल्याला किती दिवस ही गुंतवणूक पुरणार याबद्दल तो साशंक आहे. दुसरा तर जाम हैराण झाला आहे. कर्जाचा हप्ता थकवायचा की तोटय़ात गुंतवणूक विकून ‘सिबिल स्कोअर’ राखायचा हे त्याला समजत नाहीय. रात्री झोप नाही लागत. सतत विचारांमध्ये गुंतलेला असतो. तिसरासुद्धा तोटय़ात होता. कमी कमी म्हणता म्हणता बरेच पैसे डेरिव्हेटिव्हज्मध्ये त्याने घातले होते. शिवाय मुलीच्या लग्नासाठी बाजूला ठेवलेले पैसे मोहापायी गुंतविले होते. त्यामुळे वैयक्तिक आर्थिक परिस्थिती तंग झाली होती. सॉलिड टेन्शनमध्ये होता.

पण चौथा सामान्य गुंतवणूकदार मात्र कमालीचा शांत! नोकरीवर व्यवस्थित लक्ष ठेवून नित्य दैनंदिनी चालू होती. बाजारातील पडझडीने आर्थिक नियोजनावरचा त्याचा विश्वास अजून वाढविला होता. सगळ्या गुंतवणुकी कमी फायद्यावर खाली आल्या होत्या; पण त्याला पशाची गरज नसल्याने त्याने दुर्लक्ष करायचं ठरविलं होतं.

गेल्या दहा दिवसांतील जागतिक बाजाराच्या परिस्थितीचा आढावा घेताना मला डेव्ह रॅम्सेने म्हटलेलं एक खूप सुंदर वाक्य आवर्जून आठवलं – Personal finance is 20% knowledge and 80% behaviour!

म्हणजे वैयक्तिक आर्थिक स्थिती ही ज्ञानापेक्षा वागण्यावर जास्त अवलंबून असते. तर परिस्थिती कोणतीही असो, बाजार कितीही पडो, व्याजदर कितीही बदलो, ज्या व्यक्तीने स्वत:चं नियोजन कालानुरूप आणि गरजेनुसार केलं आहे तो आर्थिकदृष्टय़ा जास्त खंबीर राहतो.

यापुढे काय?

१ बाजार पडझड जरी थांबल्यासारखी वाटली तरी भीती कायम आहे. बाजाराचा अस्थिरता निर्देशांक – व्होलॅटिलिटी इंडेक्स (श्क) ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त आहे, तेव्हा पडझड कदाचित परत सुरू होईल.

२ पोर्टफोलिओमधील अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन तपासा. इक्विटी (समभाग) आणि डेट (इक्विटी) दोन्हीमधील जोखीम बघा.

३ डेट फंडांचे वायटीएम (यील्ड टू मॅच्युरिटी) तपासा. ज्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त वायटीएम दिसतात तेथे नुकसान होण्याची शक्यता दाट आहे.

४ ही वेळ सगळे पैसे इक्विटीमध्ये घालायची नाही. थांबा आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा.

५ स्वस्त आणि रास्त यातला फरक समजून घ्या, कारण स्वस्त ‘मल्टिबॅगर’ न ठरता ‘मल्टिबेगर’ होऊ शकतात, तर रास्त हा दीर्घकालीन नफा देऊ शकतात.

६ पोर्टफोलिओमधून करमुक्त नफा काढून प्राप्तिकर कायद्याचा फायदा घेता येईल. बाजार स्थिरावल्यावर गुंतवणूक परत करता येईल.

७ तोटय़ाचा विचार करण्यापेक्षा योग्य पर्यायांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात जर देशांतर्गत परिस्थिती बिघडली तर अजून तोटा होईल.

८ मासिक नियमित मिळकत नसणाऱ्यांनी येणाऱ्या तीन वर्षांच्या खर्चाची तरतूद सुरक्षित गुंतवणूक पर्यायामध्ये करावी. येथे उगीच थोडय़ा जास्त व्याजदराच्या मोहापायी चुकीच्या पर्यायात गुंतवू नये.

सरतेशेवटी सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी येऊन थांबतात आणि ते म्हणजे जोखीम व्यवस्थापन. जेव्हा पैसे कमी असतात तेव्हा ते पुरवण्यासाठी आणि जेथे पोर्टफोलिओमध्ये चांगली वाढ झाली असेल तेथे फायदा सांभाळण्यासाठी जोखीम व्यवस्थापन हेच करावं. जास्त जोखीम आणि जास्त परतावे यापेक्षा रास्त जोखीम आणि रास्त परतावे हे सूत्र जास्त फायद्याचं ठरेल असं मला वाटतं.

गुंतवणूकदारांनो, येत्या काळात जरा जास्त लक्ष ठेवा आणि जेथे संधीचा फायदा घेता येऊ शकेल तेथे नक्कीच उडी मारा. शेवटी मोती त्यांनाच मिळतात जे समुद्राच्या तळाशी जायची हिंमत दाखवतात. पण पाण्यात उतरायच्या आधी ऑक्सिजन पुरवठा तपासतात! पुढच्या सदरात आपण पोर्टफोलिओचा आढावा घेणार आहोत.

* लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2020 4:08 am

Web Title: article on story about four investors abn 97
Next Stories
1 नावात काय : चलनवाढ आणि मागणी
2 बाजाराचा तंत्र कल : पडझड-चिंता आता तरी तेजी परतेल काय?
3 बंदा रुपया : जगण्याला भिडण्याचे साहस
Just Now!
X