13 August 2020

News Flash

सापळा तेजीचा

सध्याचा वाढीव निर्देशांक हा खरेच ‘बुल ट्रॅप’ आहे का? होय, हा बुल ट्रॅपच आहे, असे माझे स्पष्ट मत

संग्रहित छायाचित्र

जयंत विद्वांस

आज बाजार १०० वरून ८० टक्क्यांवर आला आहे आणि तो ५० टक्क्यांवर किंवा त्याहून खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोभ-आमिषाला न भूलता, आजच्या घडीला नुकसान मर्यादित ठेवण्याच्या (स्टॉपलॉस) विचार ज्याचा त्याने करायचा आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक करोना उद्रेकापूर्वी ४२,२०० पर्यंत वर गेला होता. टाळेबंदीची सुरुवात झाल्यानंतर तो २५,७०० पर्यंत खाली आला. नंतर मूडीजने भारताचे पतनामांकन कमी करूनही तो वर जातच राहिला आणि टाळेबंदी उठणार अशा बातम्या आल्यानंतर तो ३४,००० पार करून गेला. अशा वेळेस बाजारात पुन्हा तेजी आली आणि आपली संधी हुकली की काय, अशा भीतीने सर्वसामान्य गुंतवणूकदार नव्याने बाजारात गुंतवणूक करू लागतात आणि ते तेजीच्या सापळ्यात (बुल ट्रॅप) अलगद सापडतात. इथून मार्केट पुन्हा खाली जाऊ लागल्यास सर्वसामान्य गुंतवणूकदारांना बाहेर पडायची संधी मिळत नाही किंवा खूप नुकसानीत बाहेर पडावे लागते.

सध्याचा वाढीव निर्देशांक हा खरेच ‘बुल ट्रॅप’ आहे का? होय, हा बुल ट्रॅपच आहे, असे माझे स्पष्ट मत. वाणिज्य किंवा कला शाखेतील स्नातकांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला असतो. त्यात तेजी-मंदीचे चक्र आणि केन्सचे अर्थशास्त्र अभ्यासलेले असते. पुढील आयुष्यात देशाच्या प्रगतीचे चढ-उतार बघताना याचा संदर्भ लक्षात घेतला जातो. परंतु त्या इकॉनॉमीचाच एक भाग शेअर बाजार असतो व देशाच्या आर्थिक चढ-उतारांचा परिणाम शेअर बाजारावर होणार हे विचारात घेतले जात नाही.

मागे, ‘म्युचुअल फंड सही है, पर रिटर्न्‍स नहीं है!’ या शीर्षकाच्या (अर्थवृत्तान्त, १ एप्रिल २०१९) माझ्या लेखात स्पष्ट म्हटले होते की, जागतिक अर्थव्यवस्था मंद गतीने वाढते आहे अशात सत्तारूढ पक्षास पूर्ण बहुमत मिळाले तरी बाजार वर जाणार नाही. २००८ सालापासून मागील काही वर्षांत बाजारात मंदी आलेली नाही. काही तरी लहानसे निमित्त पुरेसे होईल ज्यामुळे लोकांच्या भावना बदलतील. कोविड-१९ हे लोकांच्या भावना बदलण्यासाठीचे निमित्त एका वर्षांनंतर मिळाले. २०१९ साली जागतिक बँकेने एक समिती स्थापन केली होती. नॉर्वेच्या माजी पंतप्रधान ग्रो हार्लेम ब्रुंडलॅण्ड या समितीच्या अध्यक्षा होत्या. त्यात अनेक देशांच्या प्रतिनिधींमध्ये भारताचासुद्धा सहभाग होता. त्यांनी एका वर्षांपूर्वी जाहीरपणे सांगितले होते की, २०२०च्या पहिल्या तिमाहीत श्वसन मार्गाचा एक भयंकर रोग जगभर पसरू शकतो. हा अहवाल कोणत्याच देशाने गांभीर्याने घेतला नाही. शेअर बाजार खाली जाण्यास करोना विषाणू निमित्त झाले तसेच जागतिक मंदीवरील लक्ष दुसरीकडे वळवण्यास सर्व देशांच्या पुढाऱ्यांना कारणही मिळाले.

टाळेबंदीमुळे जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्था साफ कोलमडून पडल्या आहेत. जागतिक व्यापार पूर्ण ठप्प आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर उणे पातळीला जाऊ शकतो. कंपन्या बंद आहेत किंवा फक्त २५ टक्के कारभार चालू आहे. या परिस्थितीत कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल अतिशय खराब येतील. जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात निकाल यायला सुरुवात झाल्यावर बाजार खाली जाण्यास नवीन कारण मिळेल. शेअर बाजार भीती आणि हव्यास या भावनांवर खाली-वर होत असतो. भीतीसाठी वर्षभर नवीन नवीन कारणे सापडत राहतील. मग ते नेपाळ असेल, चीन असेल, तालिबान असेल किंवा उत्तर कोरिया असेल. चक्रीवादळ किंवा टोळधाड असेल.

मंदी मग ती १९९२ची हर्षद मेहता घोटाळ्याची, २००० सालातील केतन पारेखची तसेच २००८ सालातील अमेरिकेतील सबप्राइम अरिष्टाची मंदी असो.. प्रत्येक मंदीच्या वेळेला शेअर बाजाराचा निर्देशांक ५० टक्क्यांपेक्षा जास्त खाली गेला आहे. १९९२च्या हर्षद मेहताच्या तेजीमध्ये मुंबई शेअर बाजाराचा उच्चांक ४६०० होता. तो पुढे २२०० पर्यंत खाली आला होता. २००० सालच्या केतन पारेखच्या तेजीमध्ये उच्चांक ६१५० होता. तो खाली २६०० पर्यंत आला. २००८च्या तेजीमध्ये उच्चांक २१,२०० होता आणि त्याच वर्षी नीचांक ७,७०० असा होता.

फिबोनाकी नियमानुसार शेअर बाजारात पहिला उतार ३३ टक्क्यांवर येतो, दुसरा उतार ५० टक्क्यांवर येतो, तर तिसरा उतार ६६ टक्क्यांपर्यंत खाली जाऊ शकतो. २० जानेवारी २०२०ला निर्देशांक ४२,२७३ हा सार्वकालिक उच्चांकी होता. तो कोसळून २३ मार्च २०२० रोजी २५,९८१ पर्यंत आला. हा उतार ३८.३९ टक्के (३३ टक्क्यांपेक्षाही जास्त) होता. या दोहोंतील फरक १६,२०० अंशांचा आहे. याच्या ५० टक्के निर्देशांक २५,९८१ पासून वर जाऊ  शकतो. (पुल बॅक रॅली). २६००० + ८००० म्हणजे ३४,०००ला आज

बाजार सर्वोच्च पातळीपेक्षा १९ टक्के खाली आहे. इथून बाजार पुन्हा खाली गेल्यास तो ५० टक्के म्हणजे २१,००० पर्यंत खाली जाऊ शकतो. येथून मंदी अजून वाढत गेल्यास पुढचा टप्पा उणे ६६ टक्के म्हणजे जवळपास १४,०००चा तळ दाखविणारी असू शकते. म्हणजे २००८च्या उच्चांकाच्या ३० टक्के खाली.

हे खाली जाणे एकतर्फी नसते. बाजार वर-खाली हिंदोळे खात टप्प्याटप्प्याने खाली जातो. म्हणून हे खाली जाणे पटकन लक्षात येत नाही. ही वाटचाल होण्यास किती कालावधी लागेल? कदाचित फेब्रुवारी/ मार्च २०२१. पूर्वीच्या सर्व तेजीच्या उच्चांकांपासून साधारण एका वर्षांत मंदीचा नीचांक आला आहे. शेअर बाजार खाली जाताना, खाली-वर, खाली-वर (झिगझॅग) होत खाली जातो. प्रत्येक वेळेस बाजार वर येताना मागच्या उच्चांकापेक्षा तो खाली बंद होतो आणि खाली जाताना पूर्वीच्या नीचांकाला तोडून अजून खाली जातो.

इथून पुन्हा उभारी ‘व्ही-शेप’ असेल की ‘डब्ल्यू-शेप’ असेल? का ‘यू-शेप’ अथवा ‘एल’? याबाबत मतमतांतरे आहेत. पण रिकव्हरी ‘व्ही-शेप’ नसेल यावर सर्वाचे एकमत आहे.

‘व्ही-शेप’ म्हणजे खाली गेल्यावर जोराने वर येणे. जागतिक महामंदीच्या काळात (दोन महायुद्धांच्या मधील काळात) ती ‘एल-शेप’ होती. म्हणजेच देशाची आर्थिक गाडी खाली येऊन प्रदीर्घ काळापर्यंत (७-८ वर्षे) खालीच राहिली. आज ही परिस्थिती नसेल आणि ‘यू- शेप रिकव्हरी’ असेल तर देशाची आर्थिक घडी सुधारण्यास इथून २-३ वर्षे सहज जातील. म्हणजेच ४२,०००चा उच्चांक गाठायला कदाचित डिसेंबर २०२२ उजाडेल.

भारताची अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग आहे. भारतीय कंपन्या या भारतीय अर्थव्यवस्थेचा भाग आहेत आणि त्यातील काही कंपन्या या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. यातील काही कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंड योजना गुंतवणूक करतात. जर सर्वच जगाची अर्थव्यवस्था तळागाळात गेली तर ‘म्युच्युअल फंड सही है, पर रिटर्न्‍स नहीं है’ हे म्हणायची वेळ तुमच्यावर पुन्हा येणार.

जर पी/ई रेशियो १६पेक्षा कमी असेल तर शेअर बिनधास्तपणे खरेदी करा (हिरवा सिग्नल). १६ ते १९च्या दरम्यान पी/ई रेशियो असेल तर जरा सांभाळून (पिवळा सिग्नल) आणि १९च्या वर असेल तर तुम्ही खूप मोठी जोखीम घेत आहात, असा संकेत मानला जातो. आज हा पी/ई रेशियो बाजार खाली जाऊनसुद्धा २३च्या वर आहे. याचा अर्थ मागील ३ वर्षे बाजार ‘डेंजर झोन’मध्येच आहे आणि ताजी पुल बॅक रॅलीसुद्धा डेंजर झोनमध्येच आहे.

काही जण असे म्हणतात की तुम्ही मागचा पी/ई म्हणजेच चालू बाजारभाव आणि मागच्या वर्षीचे प्रत्येक शेअरमागे उत्पन्न तुलनात्मक बघत आहात. त्याऐवजी पुढचा (फॉरवर्ड) पी/ई विचारात घ्यायला हवा म्हणजे आजचा बाजारभाव व पुढील आर्थिक वर्षांचे प्रत्येक शेअरमागे उत्पन्न. आजची तीन महिन्यांची टाळेबंदी विचारात घेतल्यानंतर अपेक्षित ३१ मार्च २०२१चा निव्वळ नफा किती असू शकेल आणि त्यानुसार फॉरवर्ड पी/ई काय असू शकेल? कदाचित हा पी/ई ४०-४५ असू शकतो. म्हणजे आज उतरलेला बाजारसुद्धा प्रचंड महाग आहे.

आज कुठल्याही इक्विटी म्युच्युअल फंडाच्या फंड मॅनेजरला पुढील एक वर्षांची बाजाराची स्थिती विचारल्यास तो अशा पद्धतीत बाजाराचे गणित सांगणार नाही. तो सांगताना अजून पाच वर्षांनी बाजार किती वर असेल सांगेल. २००८ सालातील मंदीपूर्वी भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग ९ टक्के होता. त्या वेळेस अमेरिकेत बँकिंग घोटाळ्यामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात शेअर्सची विक्री केली. त्या वेळी भारतीय कंपन्यांची कामगिरी आणि उत्पादनावर परिणाम झाला नव्हता. कामगारांच्या नोकऱ्या शाबूत होत्या. आज करोना टाळेबंदीत कंपन्या बंद, कामगारांचे पगार बंद त्यामुळे मागणी आणि पुरवठा दोन्हीला ओहोटी लागली आहे. मग शेअर बाजाराला तेजी कुठून येणार!

आज बाजार १०० वरून ८० टक्क्यांवर आला आहे आणि तो ५० टक्क्यांवर किंवा त्याहून खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या घडीला नुकसान मर्यादित ठेवण्याच्या (स्टॉपलॉस) विचार ज्याचा त्याने करायचा आहे. २००८च्या तेजीमध्ये टीसीएसचा भाव १,२०० वरून ३०० पर्यंत खाली आला होता. टेक महिंद्र २,००० वरून पब्लिक इश्यू किमतीच्याही खाली गेला होता. मंदीमध्ये सोन्यासारखे शेअर मातीमोल किमतीला मिळतात, पण त्या वेळेस गुंतवणूक करायला रोकड सुलभता नसते. आपलेच पैसे योग्य वेळेस शेअर्स न विकल्याने अडकून पडलेले असतात. खालच्या किमतीला आपले झालेले नुकसान डोळ्यासमोर दिसत असल्याने नवीन गुंतवणुकीस इच्छा नसते. १९८६ सालापासून मुंबई शेअर बाजाराच्या रिंगणात जाऊन गुजराती भाषेत बोटांनी व्यवहार केले आहेत. ३५ वर्षे शेअर बाजाराशी संलग्न आहे. प्रत्येक वेळेस मंदी दिसत असून माणसे नफ्याच्या ‘आशेवर’ आत घुसत असतात.

(लेखक ‘पीएफआरडीए’द्वारे नोंदणीकृत रिटायरमेंट अ‍ॅडव्हायजर, ‘सेबी’कडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक . त्यांचा ई-मेल : sebiregisteredadvisor@gmail.com))

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:15 am

Web Title: article on trap investing in the market abn 97
Next Stories
1 बंदा रुपया : ताणा-बाणा धाग्यांची गुंफण
2 माझा पोर्टफोलियो : विषाणू बाधारहित नवपिढीचा व्यवसाय
3 कर बोध : विवरणपत्र कोणी-कोणता फॉर्म भरावा?
Just Now!
X