क.. कमॉडिटीचा : विक्रमी अन्नधान्य उत्पादन ‘करोना’कहरात वरदान ठरेल?

करोना संकट जगाला कुठे नेऊन ठेवेल याची कुणालाच कल्पना नसल्यामुळे आज कुठल्याच बाजाराबद्दल अंदाज बांधणे शक्य नाही. देशातील कृषिक्षेत्राला महिन्यापूर्वी शाप वाटणारे विक्रमी अन्नधान्य उत्पादन आता वरदान ठरेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

मागील दोन्ही लेखांत आपण करोना विषाणूच्या संसर्गामुळे येऊ घातलेल्या परिस्थितीचा मागोवा घेतला असला तरी दोन आठवडय़ांत या परिस्थितीमध्ये लक्षणीय बदल होऊन आज सारे जग चिंतेने ग्रासलेले दिसत आहे. पंधरवडय़ापूर्वी सुमारे १०० देशांत शिरकाव करणाऱ्या या महाभयानक साथीच्या रोगाने आज १६५ हून अधिक देश बाधित केले असून हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत कदाचित एकूण मृतांची संख्या १३ हजारांवर गेलेली असेल आणि बाधित लोकांची संख्या तीन लाखांच्याही पुढे गेलेली असेल. इटलीमध्ये सरलेल्या शुक्रवारी एका दिवसात ६२७ माणसे दगावली म्हणजे तासाला २६ हून अधिक मृत्यू झाले. इराणमध्येदेखील तशीच स्थिती असून युरोपबरोबर आता अमेरिकेमध्येदेखील आणीबाणीची स्थिती आहे. फक्त कॅलिफोर्नियामध्ये चार कोटी लोकसंख्येपैकी ५६ टक्के लोकांना या संसर्गाचा धोका आहे असे तेथील गव्हर्नरनी म्हटले आहे. युद्ध पातळीवर उपाय न योजल्यास अमेरिकेतील दर पाच माणसांपैकी एक व्यक्ती करोनाग्रस्त होऊ शकेल, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.

या पाश्र्वभूमीवर महाकाय भारतात अजून संसर्गित रुग्णांची संख्या ३०० हून कमी असली तरी आपण सुपात तर नाही ना याची चिंता पंतप्रधानांपासून ते सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेडसावत आहे. त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायांना सुरुवात झाली असली तरी आता निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये लागणारी राष्ट्रीय शिस्त आणि गंभीरपणा अठरापगड जातीच्या आणि सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशात अभावानेच दिसत आहे. लोक अजूनही समाजमाध्यमांमध्ये राजकीय चर्चामधून बाहेर येऊन घरात १०० टक्के स्थानबद्ध करून घेण्याविषयी पुरेसे जागरूक नाहीत. नेमकी हीच चिंतेची बाब आहे.

करोनाविषयक दर मिनिटागणिक परिस्थिती आणि आकडेवारी बदलत असताना त्याचे सर्वच बाजारांवर भयानक परिणाम दिसत असून अन्नधान्य आणि सोने सोडता सर्वच प्रमुख कमॉडिटीजच्या किमती अनेक वर्षांच्या नीचांकावर आल्या आहेत. शेअर बाजार गडगडल्यामुळे गुंतवणूकदार, कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी यांची अवस्था बिकट झाली असून, हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतूक ८० ते ९५ टक्के बंद आणि दुकानेही बंद झाल्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. या परिस्थितीत किती दिवस ‘लॉकडाऊन’ करावा लागेल या अनिश्चिततेमुळे लोकांनी अगदी दोन-दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य घरात भरायला सुरुवात केली आहे. जीवनावश्यक वस्तूंची मागणी प्रचंड वाढली असून पुरवठा करणाऱ्या दुकानाची आणि ऑनलाइन पुरवठादारांची तारांबळ होत आहे. याचा फायदादेखील किरकोळ विक्रेते घेत असून कडधान्ये, मसाले, दुग्धजन्य पदार्थ आणि तांदूळ, पीठ यांच्या किमती वाढवल्या आहेत किंवा त्यांवर असलेली सूट काढून टाकत आहेत.

एकीकडे ग्राहकांची मागणी प्रचंड वाढली असल्यामुळे अन्नधान्याच्या घाऊक किमतींमध्येदेखील बऱ्यापैकी वाढ झाली असली तरी बंद होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे आणि इतर पायाभूत सोयींच्या अभावाने शेतकऱ्यांना याचा फायदा होताना दिसत नाही. तसेच कुक्कुटपालनामध्ये नुकसानीत गेलेल्या शेतकऱ्याला आता फळे आणि भाजीपाला यांसारखा नाशवंत मालाला योग्य किंमत कशी मिळेल याची चिंता लागून राहिलेली दिसत आहे.

अहोरात्र करोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या आणि कौतुकास पात्र असलेल्या राज्य सरकारला त्या दृष्टीने काही पावले टाकण्याची गरज असून शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी सोसायटय़ा यांच्या मार्फत दूध, भाजीपाला आणि फळे यांसारख्या जीवनावश्यक पण नाशवंत मालाची शहरात थेट वितरण प्रणाली विकसित केल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव आणि थोडा दिलासादेखील मिळेल, आणि ग्राहकांचीदेखील सोय होईल.

एक नक्की, करोना संकटामुळे जागतिक उष्णतामान वाढीचे जाणवू लागलेले दुष्परिणाम सध्या कुठेच चच्रेत नाहीत. अलीकडील काही वर्षांत नित्यनेमाने येणारा ‘अवेळी’ पाऊस आज अनेक राज्यांत गेले महिनाभर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडताना दिसत आहे. अजूनही हरभरा, गहू, मोहरीसारखी मुख्य पिके शेतात उभी असताना येणारा पाऊस आणि गारपीट यामुळे नुकसान वाढत असताना त्याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही.

करोना संकट जगाला कुठे नेऊन ठेवेल याची कुणालाच कल्पना नसल्यामुळे आज कुठल्याच बाजाराबद्दल अंदाज बांधणे शक्य नाही. देशातील कृषिक्षेत्राला महिन्यापूर्वी शाप वाटणारे विक्रमी अन्नधान्य उत्पादन आता वरदान ठरेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे टिकाऊ अन्नधान्याला पुढील काळात चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी या जर तरच्या गोष्टीच आहेत. वाढत्या जागतिक र्निबधांमुळे आयात-निर्यातदेखील थंडावली असताना या परिस्थितीत कृषिमालाच्या मूल्यवर्धन साखळीत नजीकच्या काळात मोठे बदल होण्याची शक्यता असून कदाचित त्याचा फायदा उत्पादकांना होऊ शकतो. आयात केलेल्या खाद्यतेलाचे साठे झपाटय़ाने खाली आले असून आयात अजून रखडल्यामुळे कदाचित सोयाबीन आणि मोहरीच्या देशांतर्गत साठय़ांना चांगली मागणी येईल अशी शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.

शेवटी एक कमॉडिटी टीप. हरभऱ्याचे भाव सध्या हमीभावाच्या २० टक्के खाली गेले असले तरी मिळालेल्या माहितीनुसार देशातील उत्पादन अनुमानाच्या १५-२० टक्के तरी कमी होणार आहे. अनेक राज्यांत व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील चांगल्या दर्जाच्या हरभऱ्याची बऱ्यापैकी खरेदी केली असून चार-सहा महिन्यांत मोठय़ा भाववाढीचे संकेत दिले आहेत. यातील व्यापारी गणित पाहता ३,७०० रुपये क्विंटलने घेतलेला हरभरा शीतगृहामध्ये ३० रुपये महिना या भाडय़ावर सहा महिन्यांसाठी ठेवला तरी एकंदर खरेदी किंमत ४,००० रुपयांपेक्षा कमी पडते. काही व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हरभरा हंगामाअखेर ४,५०० रुपयांवर गेला तरी वाहतूक, व्याज आणि इतर खर्च जमेस धरूनदेखील चांगला फायदा होईल.

* लेखक वस्तू बाजार विश्लेषक आहेत.

ksrikant10@gmail.com