20 November 2017

News Flash

पोर्टफोलिओची रंगीत झळाळी!

बर्जर पेंट्स लिमिटेड

लोकसत्ता टीम | Updated: September 11, 2017 3:32 AM

बर्जर पेंट्स लिमिटेड

रंग आणि रसायन हा भारतातील एक प्रमुख उद्योग आहे. या उद्योगाची वार्षिक वाढ १८ ते २० टक्के दराने होत आहे. २००७ मध्ये रंग उद्योगाची वाढ १६.२१ टक्के झाली असून सरलेले वर्ष मागील ५ वर्षांत सर्वात कमी वार्षिक वाढ झालेले वर्ष ठरेल. भारतात दरडोई रंगाचा वार्षिक वापर ०.६ किलो असून चीनमध्ये हेच प्रमाण १.६ किलो आहे. विकसित जगात दरडोई रंगाचा वार्षिक वापर २२ किलो आहे. रंग उद्योग हा गृह सजावटीसाठीचे रंग आणि औद्योगिक वापरासाठीचे रंग अशा दोन गटांत विभागाला असून भारतात रंगाच्या एकूण उत्पादनापैकी  ६५ टक्के रंग उत्पादन संघटित क्षेत्रात तर ३५ टक्के उत्पादन असंघटित क्षेत्रात स्थानिक उत्पादकांकडून होते. औपचारिक क्षेत्रापैकी ३० टक्के हिस्सा एशियन पेंट्स, २० टक्के हिस्सा कन्साई नेरोलॅक, १९ टक्के हिस्सा बर्जर पेंट्स आणि १२ टक्के हिस्सा असलेले आयसीआय हे प्रमुख उत्पादक आहेत.

एकूण उत्पादनाच्या ७५ टक्के उत्पादन हे गृह सजावटीसाठी वापरले जाते. पाऊस सरल्यानंतर सणासुदींच्या दिवसांना सुरुवात होत असल्याने वर्षभरापैकी सप्टेबर-डिसेंबर हा कालावधी गृहसजावटीसाठी सुगीचा हंगाम समजला जातो. गृह सजावटीसाठीचे रंग हे किंमत संवेदनशील असून उत्पादकांसाठी नफ्याचे अधिक प्रमाण असलेली उत्पादने या प्रकारात मोडतात. औद्योगिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांच्या गटात सर्वाधिक हिस्सा कन्साई नेरोलॅककडे आहे. या गटात गंज आणि वातावरणापासून संरक्षण हा प्रमुख उद्देश असतो. याव्यतिरिक्त मोटारी रंगविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर रंगाचा वापर होतो.

रंगासाठी मुख्य कच्चा माल हा तेल शुद्धीकरण करताना जी उप-उत्पादने तयार होतात त्यापैकी काही उत्पादने रंग उद्योगासाठी कच्चा माल म्हणून वापरली जातात. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने रंग उत्पादकांच्या नफ्यात मागील तीन वर्षांपासून वाढ दिसून येत आहे. औद्योगिक वापराच्या रंगांना असंघटित क्षेत्रातील उत्पादकांकडून तीव्र स्पर्धा होती. वस्तू व सेवा करप्रणालीमुळे करांच्या दरात बदल झाल्यामुळे असंघटित क्षेत्रातील उत्पादकांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. यामुळे त्यांना संघटित क्षेत्रातील उत्पादकांसोबत स्पर्धा करणे कठीण जात आहे. मागील काही वर्षांपासून असंघटित उत्पादकांचा हिस्सा कमी होत असून संघटित उत्पादकांचा हिस्सा वाढत आहे. जीएसटीपश्चात हा हिस्सा अधिक वेगाने वाढून संघटित क्षेत्रातील उत्पादक अधिक प्रबळ होतील. परिचित नाममुद्रा, खोलवर रुजलेले वितरकांचे जाळे आणि वलयांकित चेहऱ्यांचा विपणनासाठी वापर (बर्जर पेंट कतरीनाच्या चेहऱ्याचा वापर करीत आहे तर शाहरूखखान कन्साई नेरोलॅकचा सदिच्छा दूत आहे) यामुळे संघटित उत्पादकांचा हिस्सा वाढताना दिसत आहे.

या हंगामातील मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असून पावसाळा संपत आला आहे. हवामान खात्याने भारताची विभागणी ३६ क्षेत्रांत केली आहे. ६ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार या वर्षी तीन क्षेत्रे वगळता ३३ क्षेत्रांत समाधानकारक पर्जन्यमान झाले आहे. सतत दुसऱ्या वर्षी भरघोस पीक येण्याची आशा असल्याने ग्रामीण भारताची क्रयशक्ती वाढण्याची आशा आहे. वाढत्या क्रयशक्तीचा रंग उद्योग एक लाभार्थी असल्याने रंग उद्योगासाठी नुकताच सुरू झालेला सुगीचा हंगाम विक्री सरासरीपेक्षा जास्त वाढ दर्शवेल अशी शक्यता वाटते. रंग उत्पादक कंपन्यांचे समभाग गुंतवणुकीत संरक्षक समजले जातात. हा मिडकॅप धाटणीचा समभाग आपल्या पोर्टफोलिओला नव्याने झळाळी चढवेल हे नक्की.

राजेश तांबे

arthmanas@expressindia.com

(लेखक शेअर गुंतवणूकतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक आहेत.)

First Published on September 11, 2017 3:32 am

Web Title: berger paints india ltd