18 July 2019

News Flash

सबप्राइम क्रायसिस वित्तीय अरिष्ट!

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर सब प्राइम म्हणजे ज्याची ‘पत ढळलेली आहे’ असा कर्जदार!

|| कौस्तुभ जोशी

एकविसाव्या शतकातील आर्थिक जग हादरवून टाकणारी घटना म्हणजे अमेरिकेत घडून आलेले (की घडवून आणलेले!) सब प्राइम क्रायसिस! नव्या शतकाला सुरुवात झाली तीच अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याने, त्यातून सावरत अमेरिकी अर्थव्यवस्थेने आगेकूच करायला सुरुवात केली. बाजारात उत्साह वाढू लागला, अर्थव्यवस्थेचा आलेख दिवसेंदिवस वर वर जात असताना अचानक २००८ साली जोरदार झटका बसला आणि सब प्राइम क्रायसिस या शब्दाला वजन प्राप्त झाले!

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर सब प्राइम म्हणजे ज्याची ‘पत ढळलेली आहे’ असा कर्जदार!

पत असणे म्हणजे, आपण जे कर्ज घेतले असेल त्याची परतफेड करण्याची आपली क्षमता असणे. मग कशी ठरवायची ही पत? सामान्यत: बँक कर्ज मागायला आलेला ग्राहक त्याची परतफेड करू शकेल काय याचा अंदाज घेण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या गुंतवणुका, त्याचे मागील तीन-चार वर्षांची कर विवरण पत्रे (रिटर्न्‍स), कर्ज घ्यायचे आहे त्याच्या बदल्यात काय तारण ठेवता येईल? अशी सविस्तरपणे माहिती घेतात. जर नोकरी खासगी असेल तर तिचे स्वरूप काय आहे, त्यात स्थिरता आहे का याचा अंदाज घेतला जातो.

जर कर्ज व्यापारी स्वरूपाचे असेल तर व्यवसायाचे स्वरूप, नफा किती आहे, मागील सलग काळात त्यात वाढ झालेली आहे का नाही, कोणत्या मालमत्ता आहेत? त्यांचे मूल्य काय आहे याचा अंदाज घेतात. ज्या प्रकल्पासाठी कर्ज घ्यायचे आहे तो प्रकल्प वास्तवात येण्याजोगा आहे का? उदाहरणार्थ, जर एखादा कारखाना उभारण्यासाठी कर्ज घेतले तर त्यातून ज्या वस्तू तयार होतील त्याची बाजारात काय मागणी आहे? त्यात भविष्यात कोणते धोके संभवतात याचा अंदाज घेतला जातो. उपलब्ध माहिती काटेकोरपणे पडताळून पाहिल्यानंतर कर्ज द्यायला तो अर्जदार लायक आहे अशी खात्री पटली की मग कर्ज दिले तर ते कर्ज बुडण्याचा धोका कमी असतो. अशा कर्जाला ‘प्राइम लेंडिंग’ म्हणतात अणि वर सांगितले गेलेले नियम, पत न पाहता बिनधास्तपणे कर्ज देणे या प्रवृत्तीला ‘सब प्राइम लेंडिंग’ म्हणतात! येथे मुद्दाम प्रवृत्ती हा शब्द वापरला आहे. कारण बँकिंग व्यवसायाच्या नियमांत आणि नैतिकतेत न बसणारे कर्ज देणे ही पद्धत नव्हे तर प्रवृत्तीच म्हणायला नको का!

नक्की काय घडले?

  • अमेरिकेत बँकांमध्ये कर्ज देण्याची जणू स्पर्धाच लागली होती! ज्यांची ऐपत आहे त्यांना आणि त्याबरोबर ज्यांची नाही त्यांनाही सर्रासपणे कर्जवाटप करण्यात आले!
  • मुख्य म्हणजे यातील बहुसंख्य कर्ज ही गृहकर्ज होती! जोपर्यंत कर्जफेड होत होती तोपर्यंत सगळा मामला झाकला राहिला! अणि मग हळूहळू संकटाची मलिका सुरू झाली!
  • कर्जफेड न करता आल्याने बुडव्यांचे प्रमाण वाढू लागले. बँकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली, १५ सप्टेंबर २००८ रोजी लेहमन ब्रदर्सने दिवाळखोरी जाहीर केली अणि महामंदीच्या अरिष्टाला सुरुवात झाली!

joshikd28@gmail.com

(लेखक वित्तीय नियोजनकार आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

First Published on February 25, 2019 12:59 am

Web Title: best investment options in india 5 2