22 October 2019

News Flash

कालच्या चुका, आजचं शहाणपण आणि उद्याचं पाऊल!

सरलेले २०१८ साल हे सामान्य गुंतवणूकदारासाठी तसं निराशाजनक होतं.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| तृप्ती राणे

सर्वप्रथम नवीन वर्षांच्या अनेक हार्दिक शुभेच्छा! हे येणारं वर्ष तुम्हा सर्व वाचकांना आणि कुटुंबीयांना आनंदाचं, भरभराटीचं आणि समाधानाचं जावो. गेल्या वर्षी याच वेळी आपण निरनिराळे ‘पोर्टफोलिओ’ तयार केले. त्या प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये आपण दरमहा ५,००० रुपये गुंतवले आणि त्याची कामगिरी पाहिली आणि यापुढेही बघणार आहोत. हे पोर्टफोलिओ बनवताना कुठल्याही ध्येयाला आपण समोर ठेवलं नव्हतं. कारण मुळात उद्दिष्ट होतं ते वेगवेगळ्या जोखीम पर्यायांची सांगड घालून नियमित गुंतवणूक चालू ठेवणं.

सरलेले २०१८ साल हे सामान्य गुंतवणूकदारासाठी तसं निराशाजनक होतं. त्यातही मिड आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये भरपूर नुकसान झालं. इन्फ्रा, बँकिंग आणि कन्झम्प्शन फंडांमध्येसुद्धा नुकसान सोसावं लागलं. आयएल अ‍ॅण्ड एफएस गोंधळामुळे डेट फंडसुद्धा तोटय़ात गेले. तर या सर्व घटनांमुळे आपण काही शिकलो का? हे तर नक्कीच शिकलो की, जेवढी मानतो तेवढी जोखीम क्षमता आपली नसते. दुसरे म्हणजे, ध्येयानुसार गुंतवणूक, त्यानुसार गुंतवणूक पर्याय या अनुषंगाने केली नाही तर तोटा होऊ शकतो.

खूपदा असं लक्षात आलंय की आपण गरजेनुसार गुंतवणूक न करता ‘जशी जमेल तशी’ किंवा ‘कुणीतरी सांगितली म्हणून’ करतो. त्यामुळे आपल्याकडे असलेला पोर्टफोलिओ हा निव्वळ योगायोग असतो असं म्हणायला हरकत नाही. त्यात जर गुंतवणूकदाराला पुरेशी माहिती नसेल किंवा अल्पकालीन नुकसान सहन करायची क्षमता नसेल तर हवा तसा फायदा मिळणार नाही. धावणाऱ्या शेअर बाजारात सगळेच पैसे गुंतवतात, पण बाजार पडल्यानंतर गुंतवणूक सांभाळणारे फार कमी असतात आणि तेच दीर्घकालीन गुंतवणुकीचा आनंद घेतात.

एखादा वैयक्तिक पोर्टफोलिओ बनवताना आपल्याला आर्थिक ध्येय, जोखीम क्षमता, गुंतवणूक कालावधी आणि करपात्रता जाणून मग गुंतवणूक पर्याय निवडायचे असतात. तेव्हा यावर्षी गुंतवणूक करताना आर्थिक नियोजनाचे नियम लक्षात ठेवूनच पैसे गुंतवा. आपला सध्या असलेला पोर्टफोलिओ खालील पद्धतीने जरा तपासून घ्या: तुम्ही केलेली गुंतवणूक ही कुठल्या उद्दिष्टासाठी आहे हे जाणीवपूर्वक तपासा आणि त्यानुसार तुमचा गुंतवणूक कालावधी आहे का? हे बघा. असं तर नाही ना की उद्दिष्ट दीर्घकालीन आणि पर्याय अल्पकालीन किंवा मध्यकालीन? किंवा सगळेच पैसे सुरक्षित राहावे ही भावना आणि म्हणून रिटायरमेंट फंड सगळा एफडी किंवा पोस्टात? शिवाय हे सर्व करताना कर कार्यक्षमता नक्की तपासा. प्रत्येक वेळी म्युच्युअल फंड हा पर्याय सरस असेल असे नाही.

इथे एक अजून महत्त्वाची बाब तुम्हा सर्वाच्या लक्षात आणून द्यायची आहे. प्रत्येक गुंतवणुकीचं एक चक्र असतं. ती गुंतवणूक आधी शांत असते, मग ती हळूहळू वर येते, मग ती प्रचंड वेगाने वाढते, त्यानंतर खाली येते, आणि मग पुन्हा शांत होते. तेव्हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सगळेच पर्याय एकाच प्रकारचे असले तर तुम्हाला सदाबहार गुंतवणुकींचा आनंद नाही घेता येणार. उदाहरण घ्यायचं झालं तर मागील १० वर्षांचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा हे लक्षात येतं की, जेव्हा स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड धावत होते तेव्हा लार्जकॅप फंड संथ गतीने वाढत होते. आणि जेव्हा फार्मा फंडांनी चांगली कामगिरी दाखवली तेव्हा इतर इक्विटी फंड शांत होते. तसेच डेट फंडांचेसुद्धा कामगिरीचे दिवस असतात. हे चक्र ज्याला समजतं, तो मार्केटमधल्या तेजी-मंदीचा चांगला फायदा घेऊ  शकतो.

तर यावर्षी असं ठरवा की गुंतवणूक ही ध्येयाशी निगडित करणार आणि विसंगत गुंतवणूक सुधारणार!

सूचना:

१. जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मगच गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

२. या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस येथे केलेली नाही.

३. सर्व म्युच्युअल फंड हे ‘रेग्युलर ग्रोथ’ पर्यायातील आहेत.

४. यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.

५. म्युच्युअल फंडचे एग्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर – यांचा विचार या सदरामध्ये केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

First Published on January 7, 2019 12:08 am

Web Title: best investment options in india 6