20 February 2019

News Flash

निर्देशांकाची उद्दिष्टपूर्ती आणि नंतरचे जोखीम-नफा गुणोत्तर

या अनुषंगाने हा आठवडा कसा असेल त्याचा आढावा घेऊ या…

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे निर्देशांकांनी आपले पहिले वरचे उद्दिष्ट सेन्सेक्सवर ३४,३५०/ निफ्टीवर १०,६५० गेल्या आठवडय़ात साध्य केले. या अनुषंगाने हा आठवडा कसा असेल त्याचा आढावा घेऊ या…

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३४,५९२.३९
  • निफ्टी : १०,६८१.३०

भांडवली बाजारातील गुंतवणूक ही ‘अधिक जोखीम, अधिक परतावा’ (हाय रिस्क, हाय रिटर्न) या सदरात मोडते. आंतरराष्ट्रीय मापदंडाप्रमाणे जोखीम-परताव्याचे/ नफ्याचे गुणोत्तर (रिस्क टू रिवॉर्ड रेशो) हा १:३ असला पाहिजे. याचा अर्थ जेव्हा गुंतवणूकदार रु. १००ची जोखीम पत्करतो तेव्हा त्याला रु. ३०० चा परतावा / नफा अपेक्षित असतो. आता हेच परिमाण निर्देशांकाला लावले तर आजच्या घडीला सेन्सेक्स/निफ्टी निर्देशांकाची वाढ अनुक्रमे ३४,७०० /१०,८०० आणि नंतर ३५,१०० /११,१०० असू शकेल. म्हणजे अजूनही निफ्टीवर १०० ते ४०० गुणांची वाढ होऊ शकते. त्यानंतर सेन्सेक्सवर १,५०० ते २,००० गुणांची आणि निफ्टीवर ५०० ते ८०० गुणांची घसरण संभवते. म्हणजे जोखीम – परताव्याचे गुणोत्तर काढता निफ्टीवर ३०० गुणांची वाढ पण ५०० ते ८०० गुणांची घसरण असे तेजीवाल्यांना प्रतिकूल व्यस्त गुणोत्तर येत आहे आणि एकदा का निर्देशांकावर ३३,९०० / १०,५०० ही महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ (ट्रेड डिसायडर लेव्हल) तुटली की घातक उतार संभवतात. ही पातळी खालील निराशाजनक कारणांमुळे तुटू शकते.

  • या अर्थसंकल्पात दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर भांडवली कर आकारावा अथवा दीर्घ मुदतीच्या कालावधीची व्याख्या एक वर्षांहून तीन वर्षे करावी अशी चर्चा चालू आहे.
  • कच्चे तेल पिंपामागे ७० डॉलरवर झेपावले आहे.
  • कर्जरोख्यांचे (बॉण्ड) वाढते व्याज दर.
  • वर्षांरंभाच्या लेखातील चतुरस्र कवयित्री शांताताई शेळके यांचे वाक्य ‘डोक्यात असतं ते काव्य आणि कागदावर उतरते ती कलाकुसर’ त्याप्रमाणे माझ्या डोक्यातील निफ्टीवरील उच्चांकाचे १०,६५०, १०,६५०, १०,८०० आणि ११,००० चे टप्पे हळूहळू प्रत्यक्षात आले आहेत. तर कागदावरील कलाकुसर म्हणजे गुंतवणूकदारांचा कागदोपत्री नफा (पेपर ऑन प्रॉफिट) तो प्रत्यक्षात येण्यासाठी सध्या चालू असलेल्या तेजीत गुंतवणूकदारांनी आपले नफ्यातील समभाग विकून फायदा पदरात पाडून घ्यावा.

सोन्याचा किंमत-वेध

  • गेल्या आठवडय़ात सोन्याच्या भावाने रु. २९,००० चा स्तर राखत आपले प्रथम वरचे उद्दिष्ट रु. २९,३०० तर गाठलेच, पण रु. २९,६०० ते २९,८००च्या टप्प्याकडे घोडदौड सुरू केली आहे. जोपर्यंत सोने रु. २९,००० चा स्तर राखून आहे तोपर्यंत तेजीची पालवी कायम आहे हे गृहीत धरावे. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).
  • लायका लॅब लिमिटेड (बीएसई कोड – ५००२५९) शुक्रवारचा बंद भाव : रु. ७१.९५
  • लायका लॅब या समभागाचा रु. ७१.९५ बाजारभाव हा २०० (५५), १०० (५७), ५० (६४), २० (६५) या सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर (मूव्हिंग अ‍ॅव्हरेजेस) बेतलेला आहे. तेजीच्या दृष्टीने ‘कल निर्धारण पातळी’ ही रु. ८१ असेल. तर ८१ रुपयांवर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट रु. ९० ते ९५ असेल व दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रु. १३०-१४५ असेल या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला रु. ५०चा स्टॉप लॉस ठेवावा.

आशीष अरविंद ठाकूर

ashishthakur1966@gmail.com

First Published on January 15, 2018 12:35 am

Web Title: bse nse nifty sensex 34