खनिज तेल प्रति पिंप ७४ डॉलरवर झेपावलेले, अमेरिकेत कर्जरोख्याचे (बॉण्ड) वाढते व्याज दर, रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण बठकीतील इतिवृत्तांमध्ये (मिनिट्स) कर्जावरील व्याजदर वाढण्याबद्दल पतधोरण समितीतील सदस्यांमध्ये वाढती सहमती, कमजोर रुपया अशा सर्व निराशेच्या वातावरणात निर्देशांकाची मात्र आशादायी वाटचाल चालू होती. एक हलकीशी घसरण गेल्या सोमवारी अमेरिकेने सीरियावरील हल्ल्याचे निमित्त साधत निर्देशांकांनी दिवसांतर्गत हलकीशी घसरण होऊन पुन्हा ३४,५००/१०,६००च्या लक्ष्याकडे घोडदौड करत ते लक्ष्य १८ एप्रिलला साध्यदेखील केलं. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३४,४१५.५८
  • निफ्टी :      १०,५६४.०५

निर्देशांकांनी २३ मार्चला नीचांक मारून गेल्या अठरा दिवसांत (व्यवहाराचे दिवस) निर्देशांकांनी आपली सातत्यपूर्ण वरची चाल कायम राखली त्यामुळे एखाद्या हलक्याशा घसरणीत निर्देशांक ३३,८५०/ १०,३७० ते १०,४०० पर्यंत खाली येऊन आपले नजीकचे उद्दिष्ट ३५,०००/ १०,७०० ते १०,८०० दृष्टिपथात येईल. आता आपण निर्देशांकांचे मिशन २०२० च्या दुसऱ्या भागाकडे वळू या –

आज आपण तेजीच्या दालनातील नवनवीन उच्चांक काय असेल त्याचा आढावा घेऊ या.

निर्देशांकांच्या शिस्तबद्ध, विश्वासपूर्ण चालीचे प्रथम वरचे उद्दिष्ट हे ३५,०००/ १०,७०० ते १०,८०० असेल आणि हा अवघड टप्पा ओलांडल्यास निर्देशांक ३६,४५०/ ११,१७१च्या अगोदरच्या उच्चांकाला गवसणी घालेल आणि या संभाव्य उच्चांकाची तारीख काय असेल? ती तारीख आपण गॅन कालमापन पद्धतीने (गॅन टाइम सायकल) पुढील लेखात मिशन २०२० भाग ३ मध्ये आढावा घेऊ या.

सोन्याचा किंमत-वेध

गेल्या आठवडय़ात नमूद केलेलं रु. ३१,५००चे वरचे उद्दिष्ट अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गाठून दुग्धशर्करा योग घडवला. आताच्या घडीला सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ३१,१०० ते ३१,६०० असेल. एखाद्या संक्षिप्त विश्रांतीनंतर सोन्याचं वरचं इच्छित उद्दिष्ट हे रु. ३१,८०० ते ३२,००० असेल. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).

  • आरसीएफ लि. (बीएसई कोड – ५२४२३०)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. ८२.६०

भारतीय वेधशाळेने पावसाचे चांगले भाकीत वर्तवल्यामुळे शेती समाधानकारक असेल व त्या परिणामाने खतांना चांगली मागणी असणार आहे. त्या अनुषंगाने आजचा लक्षणीय समभाग म्हणून राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स अर्थात आरसीएफ ची निवड. आरसीएफ चा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु.७० ते रु. ८३ आहे.  ८३ रुपयांच्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट हे ९० ते १०० रु. असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे ११० ते १३० रुपये असेल.  गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या तुकडय़ात विभागून प्रत्येक घसरणीत खरेदीचा विचार करावा या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला ६० रुपयांचा  ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

– आशीष अरविंद ठाकूर

ashishthakur1966@gmail.com