|| आशीष अरविंद ठाकूर

गेल्या लेखातील एक वाक्य होते – ‘या आठवडय़ात बाजारात तेजीचा फेर धरून सर्व गुंतवणूकदारांना तेजीच्या मनस्थितीत आणणारे वळण घेईल आणि येथेच सावध होण्याची गरज आहे. येणाऱ्या दिवसात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक अनुक्रमे ३६,०००/ १०,९०० च्या स्तरावर टिकण्यात अपयशी ठरले तर एक संक्षिप्त घसरण अपेक्षित आहे.’ गुंतवणूकदारांना चकवा मिळण्याच्या शक्यतेचे सूचित गेल्या आठवडय़ात केले गेले. हे विधान काळाच्या कसोटीवर तपासता, गेल्या आठवडय़ात बरोबर बुधवारी (१३ जूनला) निर्देशांकावर – सेन्सेक्सवर ३५,८७७ आणि निफ्टीवर १०,८९३ उच्चांक नोंदवून घसरण सुरू झाली. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३५,६२२.१४
  • निफ्टी : १०,८१७.७०

या आठवडय़ात गुंतवणूकदारांना समभाग खरेदी करण्याची जी एक संधी हवी आहे ती आता मिळत आहे. निर्देशांकावर ३४,९०० ते ३४,५०० / १०,७०० ते १०,६०० हा पहिला आणि नंतर ३४,००० / १०,४५० हा नंतरचा भरभक्कम आधार आहे. या स्तराचा आधार घेऊन निर्देशांकांचा ३७,००० / ११,३५०चा नवीन उच्चांक दृष्टिपथात येईल.

सोन्याचा किंमत-वेध

  • पूर्वी अर्थव्यवस्थेतील चलनाला सोन्याचा आधार असे. पण आता सोन्याच्या आधाराविना निराधार कमकुवत विकसनशील देशांची चलने बनली आहेत. त्यात अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडने येणाऱ्या अठरा महिन्यांत कर्जावरील व्याज दर सव्वा टक्क्यांनी वाढविण्याचा सूत्रबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. याचा थेट परिणाम सशक्त डॉलर आणि तुलनेने कमकुवत विकसनशील देशांची चलने असा होणार आहे. जसे अशक्त शरीराला सुदृढ करण्यासाठी शक्तिवर्धक (टॉनिक) दिली जातात. तसेच इतर देशांची कमकुवत चलन आणि भरीला आंतरराष्ट्रीय अनिश्चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध या सर्व अनिश्चितेवर/ अशक्तपणावर सोन्याची मात्रा उगाळून दिली जाईल. याचा प्रथम संकेत जेव्हा सोने ३१,५०० रुपयांवर सातत्यपूर्ण टिकायला लागल्यावर येईल. सोन्याचे प्रथम वरचे लक्ष्य ३१,८०० ते ३२,१०० असेल. प्रथमच सेन्सेक्स आणि सोन्याचा आलेख ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ असा तेजीप्रवण असेल. सद्य:स्थितीत सोने हे ३१,००० ते ३१,५०० रुपयांच्या पट्टय़ात (बॅण्ड) असेल. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)
  • एनआयआयटी लि. (बीएसई कोड – ५००३०४)
  • शुक्रवारचा बंद : भाव – रु. १००.९०

समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ९२ ते ११० आहे. एनआयआयटीचा भाव सातत्याने रु. ११०च्या वर टिकल्यास शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट रु. १२५ असेल व दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट रु. १५० ते १७५ असे असेल. गुंतवणूकयोग्य रकमेचे २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ात विभाजन करून प्रत्येक घसरणीत हा समभाग खरेदी करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. ८०चा स्टॉप लॉस ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.