गेल्या काही वर्षांत मॉलमधून खरेदी ही आता सर्वच मध्यमवर्गीयांच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळेच ‘वेस्टसाइड’ हे नाव आपल्याला नवीन राहिलेले नसावे. १९९८ साली स्थापन झालेल्या टाटा समूहाच्या ट्रेन्ट लिमिटेड या कंपनीने गेल्या दशकभरात सुमारे ६९ नवीन ‘वेस्टसाइड’ स्टोअर्स देशातील लहान-मोठय़ा ३८ शहरांमधून उघडली आहेत. प्रत्येक स्टोअर साधारण १५००० ते ३०००० चौरस फूटाचे असून त्यातून डिपार्टमेंटल स्टोअरप्रमाणे विविध वस्तू विकल्या जातात. ‘वेस्टसाइड’ ही नाममुद्रा लोकप्रिय झाल्यानंतर, एकंदर सुपरमार्केटची ग्राहकप्रियता लक्षात घेऊन २००४ मध्ये कंपनीने ‘स्टार बझार’ हे वन स्टॉप शॉप/ हायपर मार्केट सुरू केले. गेल्या आर्थिक वर्षांपर्यंत १५ स्टार बझार स्टोअस स्थापन केली होती. स्टार बझारसाठी कंपनीने सुप्रसिद्ध ‘टेस्को पीएलसी’ या ब्रिटिश कंपनीशी करार केला आहे. टेस्को ही आघाडीची बहुराष्ट्रीय रिटेल कंपनी असून ती स्टार बझारसाठी आवश्यक ते म्हणजे विपणन, माहिती तंत्रज्ञान, मागणी पुरवठा व्यवस्थापन (लॉजिस्टिक्स) इ. बाबतीत सहाय्य करते. काही वर्षांपूर्वी कंपनीने पुस्तकांची विक्री करणारी सर्वात मोठी ‘लँडमार्क’ ही नाममुद्रा ताब्यात घेतली आहे. यापुढे ट्रेन्ट आता स्वयंपूर्ण मॉल उघडू शकेल. ठाण्यातील कोरम मॉल ही त्याचीच एक झलक म्हणता येईल.  सध्याची आणि येणारी तिसरी पिढी ही लाइफस्टाइल उत्पादनांकडे आकर्षित होणारी असल्याने येणारा काळ ट्रेन्टसारख्या कंपन्यांचा आहे.
सध्याचे या कंपनीचे प्राइस/ अर्निग (पी/ई) गुणोत्तर थोडे जास्त असल्याने समभाग महागडा वाटतो जरूर. तरीही उत्तम प्रवर्तक, केवळ ०.३ पट डेट/इक्विटी गुणोत्तर आणि उज्ज्वल भवितव्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ट्रेन्टचा शेअर थोडा महाग वाटला तरीही योग्य वाटतो. अशा शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’ करायलाही हरकत नाही.
ट्रेन्ट लिमिटेड
प्रवर्तक                टाटा समूह
सद्य बाजारभाव             रु. ११५०
प्रमुख व्यवसाय             किरकोळ विक्री (रिटेल)
भरणा झालेले भाग भांडवल          रु. ३३.२३ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा              ३२.६१ %
पुस्तकी मूल्य :  रु. ५२३              दर्शनी मूल्य : रु. १०
प्रति समभाग उत्पन्न    (ईपीएस)        रु. १४.४
प्राइस अर्निग गुणोत्तर    (पी/ई)        ८३
मार्केट कॅपिटलायझेशन        रु. ४,००० कोटी
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक    :     रु. १३४५ / रु. ७७१