25 April 2019

News Flash

जातातची हे नेत्र दिपुनी..

कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज लार्ज अँड मिड कॅप फंड

|| वसंत माधव कुळकर्णी

कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज लार्ज अँड मिड कॅप फंड

परतावा कामगिरी अगदी डोळे दिपविणारी त्यातही सातत्य.. असे विरळाच आढळून येते. मात्र ताज्या सुसूत्रीकरणातून घडलेल्या फेरबदलातही हेच सातत्य पाहायला मिळेल काय?

जाआपल्या गुंतवणुकीचा किती हिस्सा मिडकॅप फंडांसाठी असावा याला अनेक उत्तरे असू शकतील. ही उत्तरे गुंतवणूक एकरकमी की नियोजनबद्ध पद्धतीने, गुंतवणूकदाराचा जोखीमांक किती आहे वगैरेवर ठरेल. या प्रश्नांची उत्तरे काहीही असली तरी डोळे दीपवून टाकणारा परतावा देणाऱ्या आजच्या या फंडाचा समावेश गुंतवणुकीत असावा याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज या फंडात ‘एनएफओ’च्या वेळी ‘रेग्युलर ग्रोथ प्लान’मधील एका लाखाच्या गुंतवणुकीचे २४ ऑगस्टच्या ‘एनएव्ही’नुसार ९.८४ लाख रुपये झाले असून, वार्षिक परताव्याचा दर १८.५१ टक्के आहे.

म्युच्युअल फंडांच्या सुसूत्रीकरणानंतर कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज या फंडाचा समावेश फंड घराण्याने लार्ज अँड मिड कॅप फंड गटात करण्याचा निर्णय घेतला आहे. लार्ज अ‍ॅण्ड मिड कॅप गटातील फंडांना ३० ते ३५ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप आणि किमान ३५ टक्के मिड कॅप गुंतवणूक राखणे अनिवार्य आहे. म्युच्युअल फंडाच्या सुसूत्रीकरणाआधी या फंडाची गणना मिड कॅप गटात केली जात होती. फंडाच्या सुसूत्रीकरणानंतर ‘सेबी’ने नव्याने तयार केलेल्या लार्ज अँड मिड कॅप फंड गटात या फंडाचा समावेश करण्याचे फंड घराण्याने निश्चित केले आहे. लार्ज अँड मिड कॅप फंड गटात लार्ज कॅप  गुंतवणूक किमान ३० टक्के राखणे सक्तीचे असल्याने भविष्यात या फंडाकडून डोळे दिपविणाऱ्या कामगिरीची अपेक्षा ठेवणे रास्त नसले तरी तो फंड गटातील सरासरीपेक्षा अधिक परतावा देईल याबद्दल शंका नाही. म्युच्युअल फंड सुसूत्रीकरणानंतर विविध फंड गटातून सर्वाधिक फंडांचे स्थानांतर या फंड गटात झाले आहे. सुसूत्रीकरणापूर्वीचे अव्वल मिरॅ अ‍ॅसेट इमर्जिंग ब्ल्यूचीप, प्रिन्सिपल इमर्जिंग ब्ल्यूचीप, एलआयसी मिड कॅप, सुंदरम इक्विटी मल्टिप्लायर या सारख्या मिड कॅप धाटणीचे फंड लार्ज अँड मिड कॅप फंड गटात स्थानांतरीत झाले आहेत. लार्ज अँड मिड कॅप फंड गुंतवणूकदारांच्या बचतीला स्थैर्य आणि वृद्धी देतात.

कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज फंडाची गुंतवणूक ‘बॉटम्स अप अप्रोच’ धोरणानुसार होत असून भक्कम पाया असलेल्या मिड कॅप समभागांची निवड फंड व्यवस्थापक करीत असतात. फंडाच्या गुंतवणुकीत ६५ ते ७० कंपन्यांचा समावेश असून बजाज फिनसव्‍‌र्ह, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, अतुल लिमिटेड, पिरामल एंटरप्राइझेस, महिंद्र अँड महिंद्र फायनान्स, व्हर्लपूल इंडस्ट्रीज आणि एमआरएफ या आघाडीच्या दहा गुंतवणुका असलेल्या कंपन्या आहेत. आघाडीच्या दहा गुंतवणुकाचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या २८ टक्के दरम्यान आहे. निधी व्यवस्थापकांचे धोरण समभागकेंद्रित जोखीम स्वीकारून नफा मिळविण्यापेक्षा भक्कम पाया असलेल्या कंपन्यांत जोखीम विभागण्यावर राहिला आहे. फंडाच्या गुंतवणुकीसाठी सक्रिय व्यवस्थापन हे फंडाचे वैशिष्टय़ आहे. जुलै महिन्यांत फंड व्यवस्थापनाने कोटक महिंद्र बँक, एनसीसी, इंडसिंध बँक, बायोकॉन, शंकरा बिल्डींग, महानगर गॅस यांना वगळून, टायटन इंडस्ट्रीज, एलआयसी हौसिंग फायनान्स, डीव्हीज लॅब, इंद्रप्रस्थ गॅस, येस बँक आणि एल अ‍ॅण्ड टी फायनान्शियल होल्डिंग्ज यांचा समावेश केला आहे. मागील पाच वर्षांत फंडाच्या निधी व्यवस्थापनांत अनेक बदल झाले आहेत. मे २०१६ मध्ये कृष्णा संघवी यांनी फंड घराण्याला अलविदा म्हटल्यानंतर या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे कार्तिक मेहता यांच्याकडे आली. मे २०१८ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापन फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राहिलेल्या रवि गोपालकृष्णन आणि षियुष गांधी यांच्याकडे होती. रवि यांनी फंड घराण्याच्या सेवेचा राजीनामा दिल्यानंतर कृष्णा संघवी यांची मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून घरवापसी झाली आहे. शास्त्रीय संगीतात एखादा मिया मल्हार सारखा राग सादर करताना भीमसेन जोशींची आलापी आणि प्रभा अत्रें कडून होणारा सरगमचा वापर भिन्न शैलीतील असले तरी प्रत्येकाचा मिया मल्हार श्रोत्यांना आनंद देतो. प्रत्येक निधी व्यवस्थापकाची शैली वेगवेगळी असली तरी प्रत्येकाने या फंडाला आपापल्या परीने अधिक समृद्ध केले, आणि परतावा टिकवून धरला. फंड व्यवस्थापकांत बदल होऊनदेखील मागील १७ तिमाहीत या फंडाचा समावेश क्रिसिलच्या ‘सीपीआर-१’ मध्ये राहिला असल्याची नोंद घेणे गरजेचे आहे.

हे डोळे दिपविणाऱ्या कामगिरीत सातत्य राखत असल्याने ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडा’च्या पहिल्या यादीपासून या फंडाने आपले भावंड असलेल्या कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडासोबत आपले स्थान आजतागायत अबाधित राखले आहे. मिड कॅप गुंतवणुकांमध्ये भक्कम पाया, आदर्श व्यवस्थापन आणि व्यवसाय वृद्धीच्या संधी हे महत्वाचे घटक असतात. मागील चार ते पाच महिन्यांत मिड कॅप फंडातील घसरणीमुळे मिड कॅप फंड पुढील चार ते पाच वर्षांसाठी आकर्षक पर्याय वाटतात. या फंडाची जुलै महिनाअखेर मालमत्ता ३,७९२ कोटी रुपये होती. फंड सुसूत्रीकरणापूर्वी हा फंड गुंतवणुकीचा मोठा हिस्सा भांडवली मूल्यांनुसार १५१ ते ५०० दरम्यान क्रमवारी असलेल्या कंपन्यांत गुंतवीत असे. सुसूत्रीकरणापश्चत किमान ३५ टक्के गुंतवणूक भांडवली मूल्यांनुसार १ ते १०० कंपन्यांतून गुंतविली गेली आहे फंडाच्या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा मिड कॅप भांडवली मूल्यांनुसार १०१ ते २५० दरम्यानच्या समभागांत गुंतविला गेला आहे. ‘एस अँड पी बीएसई २०० टीआर’ हा निर्देशांक या फंडाचा मानदंड आहे. एकरकमी गुंतवणुकीपेक्षा मिड कॅप फंडातील नियोजनबद्ध गुंतवणुका नेहमीच चांगला परतावा देतात.

‘म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते’ या वैधानिक इशाऱ्याचा अनुभव बाजारातील हात पोळून घेतलेले मिड कॅप गुंतवणूकदार प्रत्येक तेजीत घेत असतात. या  पोळलेल्या जखमांवर फुंकर मारणाऱ्या   या फंडाचा समावेश पोर्टफोलिओत हवाच!

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

First Published on August 27, 2018 12:02 am

Web Title: canara robeco emerging equities fund 2