21 November 2019

News Flash

अनन्य व्यवसाय ढाचा..

कॅप्लिन पॉइंट लॅबोरेटरीज

|| अजय वाळिंबे

लघू आणि मध्यम उद्योगांतील कंपन्यादेखील उत्तम कामगिरी करून मुख्य प्रवाहात येऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कॅप्लिन पॉइंट लॅबोरेटरीज. १९९० मध्ये कॅप्लिन पॉइंटची स्थापना ऑइंटमेंट, क्रीम आणि इतर बाह्य़ अनुप्रयोगांची निर्मिती करण्यासाठी करण्यात आली. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे १९९४ मध्ये ‘आयपीओ’नंतर कंपनीने पाँडिचेरी येथे आपला उत्पादन प्रकल्प उभारला. त्यानंतर कंपनीने त्याची उत्पादन श्रेणी वाढविली आणि उत्पादनक्षमता वाढविली. गेल्या काही वर्षांत कंपनीने लॅटिन अमेरिका, कॅरिबियन, फ्रान्सोफोन आणि दक्षिणी आफ्रिका या उदयोन्मुख बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले आणि आज कॅप्लिन पॉइंट लॅबोरेटरीज जगभरातील २८०० पेक्षा अधिक उत्पादन परवान्यांसह या क्षेत्रांमध्ये या औषधांमध्ये अग्रगण्य पुरवठादारांपैकी एक आहे.

कॅप्लिन पॉइंटचे मुख्यालय चेन्नईच्या दक्षिणेकडील शहरात आहे. कंपनीचे उत्पादन प्रकल्प हिमाचल प्रदेशात बड्डी तसेच पाँडिचेरी आणि चेन्नई येथे आहेत. कंपनीने चीन आणि हाँगकाँगमध्ये शाखा आणि उपकंपनी स्थापित केली आहे आणि तिच्या विस्तार धोरणाचा भाग म्हणून कोलंबिया आणि इतर ठिकाणी अधिक साहाय्यक संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कॅप्लिन पॉइंटचे यशाचे श्रेय प्रामुख्याने तिच्या अद्वितीय व्यावसायिक मॉडेलला दिले जाते. कंपनीने निर्यातीची पारंपरिक शैली सोडून त्या ऐवजी लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेत आपल्या उत्पादनांच्या वितरणासाठी खास वितरक नेमून अंतिम माइल लॉजिस्टिक सोल्यूशन्स तयार करण्याचे एक अनन्य पाऊल उचलले. कुठलेही कर्ज नसलेल्या या कंपनीचे मार्च २०१९ साठीचे आर्थिक निकाल जाहीर झाले असून कंपनीने अपेक्षेप्रमाणे उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ५७२.३१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १४८.१७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ४६ टक्क्यांनी अधिक आहे. आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी कंपनीने सुमारे ३८० कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला असून त्याचा सकारात्मक परिणाम येत्या दोन वर्षांत दिसू लागेल. कंपनी आपल्या नफ्यातील २५ टक्के रक्कम संशोधांनासाठी वापरते हे विशेष. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कॅप्लिन पॉइंटचा जरूर विचार करावा.

गेल्याच आठवडय़ात मेट्रोपोलिस लॅबोरेटरीज कंपनीचा शेअर गुंतवणुकीसाठी सुचविल्यानंतर या आठवडय़ात पुन्हा एक आरोग्यनिगा क्षेत्रातील गुंतवणूक सुचवत असल्याने वाचकांना कदाचित आश्चर्य वाटेल. परंतु या स्तंभातून सुचविलेले शेअर्स हे केवळ गुणवत्तेवर सुचविले जातात तसेच त्यांत त्याच क्रमाने गुंतवणूक केली पाहिजे असे नाही.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on June 23, 2019 11:35 pm

Web Title: caplin point laboratories ltd
Just Now!
X