04 December 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : जोखीम-संतुलित गुंतवणूक संधी

गेल्या काही वर्षांत जागतिक बाजारपेठेप्रमाणे भारतातही पतमापन संस्थांचे महत्त्व चांगलेच वाढले आहे.

अजय वाळिंबे

वर्ष १९९३ मध्ये स्थापन झालेली केअर रेटिंग्ज आज २७ वर्षांनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची पतमापन संस्था म्हणून ओळखली जाते. कंपनीने मार्च २०२० पर्यंत, सुमारे १४१.१ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे पतमापन केले आहे. आज भारतीय भांडवलाच्या बाजारपेठेत केअर रेटिंग्स एक आघाडीची पतमापन संस्था असून कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, बँकांसह वित्तीय क्षेत्र, इतर-आर्थिक सेवांसह अनेक रेटिंग विभाग आहेत.

केअर रेटिंग्ज पतमापनाचे संपूर्ण स्पेक्ट्रम प्रदान करतात जे कंपन्यांना त्यांच्या विविध आवश्यकतेसाठी भांडवल उभारण्यास मदत करतात आणि अर्थात गुंतवणूकदारांना पत जोखीम आणि त्यांच्या स्वत:च्या जोखीम-परताव्याच्या अपेक्षांवर आधारित गुंतवणुकीचा निर्णय घेण्यास मदत करतात. कंपनीची अहमदाबाद, बेंगलूरु, चंडीगड, चेन्नई, कोइम्बतूर, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, नवी दिल्ली आणि पुणे येथे क्षेत्रीय कार्यालये आहेत. व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी कंपनी जागतिक बाजारपेठेत देखील स्वत:चे स्थान निर्माण करीत आहे.  केअर रेटिंग्जने ब्राझील, पोर्तुगाल, मलेशिया आणि दक्षिण आफ्रिका येथील चार भागीदारांसह नवीन आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सी ‘एआरसी रेटिंग्ज’ सुरू केली आहे. या खेरीज कंपनीने जपान, मॉरिशस, आफ्रिका तसेच रशिया येथे देखील संयुक्त कंपन्या स्थापन केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत जागतिक बाजारपेठेप्रमाणे भारतातही पतमापन संस्थांचे महत्त्व चांगलेच वाढले आहे. सध्या भारतात क्रिसिल, इक्रा, ब्रिकवर्क्‍स आणि केअर अशा चार मोठय़ा पतमापन कंपन्या असून त्यातील ब्रिकवर्क्‍स वगळता तिन्ही शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. क्रिसिल आणि इक्रा यांच्या तुलनेत केअरची कामगिरी तशी सुमारच आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल तितकेसे चांगले नव्हते. कंपनीने ३० जून २०२० साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी ३७.३८ कोटी (गेल्या वर्षी ४९.९२) रुपयांच्या उलाढालीवर ९.३५ कोटी (१३.१८ कोटी) रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तांत्रिकदृष्टय़ा देखील हा शेअर अजून थोडा काळ मंदीत राहण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हा शेअर आकर्षक भावात उपलब्ध असल्याने १०-१५ टक्के फायदा अल्पावधीत होऊ शकतो.

लवकरच म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी कंपनीचे सहामाहीचे निकाल जाहीर होतील. ते निकाल तपासून अल्प/मध्यम कालावधीसाठी खरेदीचा निर्णय घ्यावा.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

केअर रेटिंग्स लिमिटेड 

(बीएसई कोड – ५३४८०४)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  २९८.६०

स्मॉल कॅप

प्रवर्तक :                                                       —-

व्यवसाय : पतमापन

बाजार भांडवल :                                              रु. ८८४ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु.  ७२७/२३५

भागभांडवली भरणा :                                       रु. २९.४६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                                —

परदेशी गुंतवणूकदार           २७.६५

बँक/ म्यु. फंड/ सरकार       २७.६१

इतर/ जनता                       ४४.७४

 

पुस्तकी मूल्य :                     रु. १७३

दर्शनी मूल्य :                         रु. १०/-

लाभांश :                                १६५%

प्रति समभाग उत्पन्न :       रु. २६.६६

पी/ई गुणोत्तर :                       ११.१

समग्र पी/ई गुणोत्तर :              २७.४

डेट इक्विटी गुणोत्तर :               ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :        १११

रिटर्न ऑन कॅपिटल :                 २०.२

बीटा :                                        १.५

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 12:01 am

Web Title: care ratings limited company profile zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : आता वाजले की बारा!
2 कर बोध : शिक्षण आणि प्राप्तिकर कायदा
3 अर्थ वल्लभ : परिघाबाहेरचा फंड
Just Now!
X