अजय वाळिंबे

पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड ही नावाप्रमाणे एक भारतीय पायाभूत सुविधा विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीच्या महत्त्वाच्या प्रकल्पांत महामार्ग, पूल, उड्डाणपूल, वीज पारेषण वाहिनी, विमानतळ, औद्योगिक क्षेत्राचा विकास आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश त्यात होतो.

कंपनी राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू इ. भारतातील विविध राज्यांमध्ये प्रकल्प राबवत आहे. कंपनीने ईपीसी आधारावर दोन मोठे पायाभूत प्रकल्प राबवले आहेत. बहुतेक प्रकल्प स्वतंत्रपणे राबवताना कंपनी प्रकल्पांशी संबंधित विशिष्ट पात्रतेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी इतर मूलभूत सुविधा आणि बांधकाम कंपन्यांसमवेत संयुक्त उपक्रम किंवा कन्सोर्शियम करते. कंपनीने ३८ पायाभूत प्रकल्प स्वतंत्रपणे ईपीसी आधारावर राबवले आहेत. रस्ते, महामार्ग आणि विमानतळ धावपट्टी क्षेत्रातील मोठे बांधकाम प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यामध्ये कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने नरेला, नवी दिल्ली येथे औद्योगिक क्षेत्राचा पुनर्विकासही पूर्ण केला आहे आणि सध्या डेडिकेटेड ईस्टर्न फ्रेट कॉरिडॉरचा भाग म्हणून डबल ट्रॅक विद्युतीकृत रेल्वे मार्गाचे बांधकाम चालू आहे. हे प्रकल्प ईपीसी कंत्राटदार म्हणून तसेच खासगी बीओटी आधारावर सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलद्वारे राबवले जात आहेत.

आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत करोनाकाळातही कंपनीची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. कंपनीने या काळात १,०९३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ९२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीला मोठी कंत्राटे मिळाली असून पीएनसीचे पुढील तीन वर्षांचे ऑर्डर बुक १५,५२५ कोटी रुपयांवर गेले आहे. यामध्ये दोन मोठय़ा हायब्रिड अ‍ॅन्युइटी प्रकल्पांचा समावेश आहे. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये एनएचएआय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, दिल्ली राज्य औद्योगिक व पायाभूत सुविधा विकास महामंडळ, उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन, आरआयटीईएस, सैन्य अभियांत्रिकी सेवा, उत्तर प्रदेश राज्य महामार्ग प्राधिकरण, उत्तर प्रदेश एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरण, हरियाणा राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा समावेश आहे. करोना काळाचा कंपनीच्या कामकाजावर थोडाफार विपरीत परिणाम अपेक्षित असला तरीही कंपनीची आर्थिक स्थिती समाधानकारक असून येत्या वर्षांत कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये ७,००० कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारला पायाभूत सुविधांवर भर द्यावाच लागेल तसेच त्याची रक्कमदेखील वेळेवर अदा करावी लागेल. म्हणूनच पीएनसी इन्फ्राटेकसारखी कंपनी आकर्षक खरेदी ठरू शकते.

*आजच्या परिस्थितीत या सदरात सुचविलेले शेअर्स खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड

(बीएसई कोड – ५३९१५०)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १५७.४०

स्मॉल कॅप

प्रमुख व्यवसाय :                       पायाभूत सुविधा/ रस्ते आणि बांधकाम

बाजार भांडवल :                                रु.  ४,०३८ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :             रु. २१५ / ८०

भागभांडवल भरणा :                          रु. ५१.३१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                             ५६.०७

परदेशी गुंतवणूकदार          ६.४२

बँक/ म्यु. फंड/ सरकार      २४.२४

इतर/ जनता                    १३.२७

 

पुस्तकी मूल्य:                    रु. ९९.५

दर्शनी मूल्य:                       रु. २/-

लाभांश:                                 ५५%

प्रति समभाग उत्पन्न :  रु.   १८.०६

पी/ई गुणोत्तर :                    ८.७

समग्र पी/ई गुणोत्तर :         १५.२५

डेट इक्विटी गुणोत्तर :        १.२८

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : २.३०

रिटर्न ऑन कॅपिटल :          २१.७०

बीटा :                                 ०.९२