|| सुधीर जोशी

करोना संकटाचा शेवटचा टप्पा दृष्टीक्षेपात येत असल्याचे प्रतिबिंब डिसेंबर अखेरच्या तिमाहीतील कंपन्यांच्या निकालातून दिसत आहे. अर्थसंकल्पाने अवलंबिलेली आर्थिक धोरणे ही भांडवलशाहीला पूरक आणि बाजाराच्या वृद्धीसाठी पोषक आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा भारतीय बाजारातील ओघ अजूनही टिकून आहे. येथून पुढे बाजारातील उमेद टिकणे हे आर्थिक धोरणांच्या अंमलबजावणीचे यश, खासगी उद्योगांची नवीन गुंतवणूक आणि भाववाढीवरील नियंत्रणावर अवलंबून असेल.

अर्थसंकल्पावर आठवडाभर जोरदार सकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या बाजाराने नंतरच्या सप्ताहात जरा उसंत घेत हळूवार गतीने वाटचाल केली. तरी विविध क्षेत्रीय निर्देशांकात कमी अधिक चढ-उतार नोंदवत सेन्सेक्स व निफ्टी हे बाजाराचे प्रमुख निर्देशांक साप्ताहिक तुलनेत दीड टक्कय़ांनी वर गेले. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या निर्देशांकाने तीन टक्कय़ांची वाढ दाखवून आपला दबदबा कायम राखला.

डिसेंबरअखेर संपलेले तीन महिने नाल्को, हिंडाल्को व टाटा स्टील या प्रमुख धातू कंपन्यांना फायदेशीर ठरले. टाळेबंदीनंतर वाहन, बांधकाम व्यवसायात वाढलेल्या उलाढालीचे परिणाम त्यात दिसले. हिंडाल्कोचा नफा गेल्या वर्षांच्या तुलनेत ७६ टक्कय़ांनी वाढला तर टाटा स्टीलचा नफा शंभर टक्कय़ांनी वाढला. स्टीलच्या वाढलेल्या किंमती व कोळशाच्या किंमतीतील घट यामुळे नफ्यात वाढ झाली. कंपनीच्या कर्जाचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नला देखील यश येत आहे. गेल्या नऊ  महिन्यात कर्जाचे प्रमाण १८ हजार कोटींनी कमी झाले आहे. भूषण स्टीलच्या अधिग्रहणाचा कंपनीला कर नियोजनामधे फायदा होईल. दीर्घ मुदतीसाठी कंपनीच्या समभागातील गुंतवणूक फायद्याची आहे.

एनबीसीसी या सरकारी मालकीच्या नवर कंपनीच्या नफ्यात ७५ टक्के वाढ झाली. कंपनीच्या उत्पन्नाचा मोठा वाटा सरकारी प्रकल्पांच्या सल्लागार व्यवसायातून येतो. एनबीसीसीच्या उपकंपनीला नुकतेच १,८०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. सरकारने पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मोठय़ा योजनांचा कंपनीला फायदा मिळेल. दीर्घ मुदतीसाठी कंपनीच्या समभागातील गुंतवणूक फायद्याची आहे.

टायटन या घडय़ाळांची नाममुद्रा म्हणून सुरू झालेल्या कंपनीचे नव्वद टक्कय़ांहून जास्त उत्पन्न सध्या दागिन्यांच्या व्यवसायांतून येते. या व्यवसायात गेल्या तिमाहीत १६ टक्के तर जानेवारीमधे २८ टक्के वाढ झाली. बाजारातील घसरणीच्या काळात या कंपनीमध्ये टप्याटप्याने केलेली गुंतवणूक फायद्याची राहील.

सिगारेटच्या व्यवसायातील नफा घटल्यामुळे आयटीसीचा तिमाही नफा यंदा ११ टक्कय़ांनी कमी झाला. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सिगारेटवर कर दिलासा मिळाला आहे. करोनापश्चात या तसेच हॉटेल व्यवसायातून कंपनीचे उत्पन्न वाढेल. ग्राहकोपभोग्य वस्तूंच्या विक्रीवरील कंपनीचे वाढते लक्ष, नवीन उत्पादने व ग्राहकांची वाढती क्रयशक्ती आयटीसीला फायद्याचीच ठरेल. कंपनीमधील गुंतवणूक कमी मुदतीत लाभांशरूपाने आणि दीर्घ मुदतीत भांडवली लाभ मिळवून देईल.

अशोक लेलॅँडने तिमाहीमध्ये तोटा जाहीर केल्यामुळे कंपनीच्या समभागात त्याची थोडी विषम प्रतिक्रिया आली. कंपनीच्या जानेवारी महिन्यातील विक्रीत ११ टक्के वाढ झाली आहे. टाळेबंदीचा परिणाम कमी होत जाईल तसतशी कंपनीच्या बसेस व व्यापारी वाहनांना मागणी वाढत जाईल. कंपनीच्या समभागातील दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक फायदा देईल.

रेल्वे व इतर सरकारी कंपन्यांना दूरसंचाराशी निगडित असणाऱ्या सेवा पुरविणाऱ्या रेलटेल या सरकारी मालकीच्या मिनीर उपक्रमामधील समभागांची विक्री उद्यापासून सुरू होत आहे. कंपनीचे फायबर ऑप्टिक नेटवर्क मुख्यत्वे रेल्वे वापरते. कंपनीच्या माहिती-तंत्रज्ञानविषयक इतर सेवा सरकारच्या डिजिटल उपक्रमांना पुरविण्याची कंपनीला संधी आहे. अल्प मुदतीत फायद्यासाठी या प्राथमिक समभाग विक्रीत सहभागी होता येईल.

बाजार आता नव्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेत आहे. बऱ्याच कंपन्यांचे पहिल्या नऊ  महिन्यांचे निकाल आता हाती आले आहेत. करोना संकटाचा शेवटचा टप्पा दृष्टीक्षेपात येत असल्याचे प्रतिबिंब डिसेंबरअखेरच्या या तिमाहीत दिसत आहे.

अर्थसंकल्पामधे या वर्षांतील आर्थिक धोरणांबाबत स्पष्टता आली आहे. ही धोरणे भांडवलशाहीला पूरक असून बाजाराच्या वृद्धीसाठी पोषक आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा भारतीय बाजारातील ओघ अजूनही टिकून आहे. आतापर्यंत मागे राहिलेल्या पायाभूत सुविधा व मुलभूत निर्माण क्षेत्रातील कंपन्या बाजारातील तेजीत भाग घेत आहेत. बाजारातील उमेद टिकणे हे आर्थिक धोरणांच्या अंमलबजावणीचे यश, खासगी उद्योगांची नवी गुंतवणूक आणि भाववाढीवरील नियंत्रणावर अवलंबून असेल. नजीकच्या काळात जागतिक बाजारातील घडामोडींकडे बाजाराचे लक्ष राहील.

sudhirjoshi23@gmail.com