शेअर बाजारात सध्या खूपच अनिश्चित आणि मंदीचे वातावरण असताना आताची वेळ खरेदीची आहे का, असा प्रश्न सामान्य गुंतवणूकदाराला पडू शकतो. शेअर बाजारात मंदी म्हणजे खरेदीची संधी असे जाणकार सांगत असले तरीही बाजार अजून किती गडगडणार हे माहिती नसल्याने खरेदीची योग्य वेळ तपासण्यात सामान्य गुंतवणूकदार वेळ घालवतो. कधी कधी हा निर्णय योग्य वाटत असला तरीही बाजाराचा नक्की तळ माहिती नसल्याने हा निर्णय चुकीचाही ठरू शकतो. म्हणूनच अशा वेळी उत्तम आणि शक्यतो लार्ज कॅप शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करावेत. अशा खरेदीमुळे नुकसान कमी होऊ शकते.

श्रॉफ समूहाची यूपीएल म्हणजेच पूर्वाश्रमीची युनायटेड फॉस्फरस लिमिटेड गुंतवणूकदारांना तशी नवीन नाही. पेस्टिसाइड्स, इन्सेक्टीसाइड आणि विविध रसायनांचे उत्पादन करणारी यूपीएल ही एक बियाणे आणि पीक संरक्षक उत्पादनांतील कंपनी आहे. जगभरात कारभार पसरलेल्या या कंपनीचे भारतात सहा कारखाने असून एक उत्पादन केंद्र ब्रिटनमध्येदेखील आहे. कंपनीने ३१ डिसेंबर २०१५ रोजी समाप्त तिमाहीसाठी जाहीर केलेले आíथक निष्कर्ष अपेक्षेप्रमाणेच आहेत. उत्तर अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेत कंपनीने उत्तम कामगिरी करून उलाढालीत ११% वाढ करून दाखवली तर नक्त नफ्यात १५% वाढ दाखवून तो २८६.७३ कोटींवर गेला आहे.

येत्या आíथक वर्षांत कंपनीला उलाढालीत १०% वाढ अपेक्षित असून मार्जनिमधील वाढीमुळे नक्त नफ्यात २२% वाढ अपेक्षित आहे.

जगातील ११ व्या क्रमांकाच्या या अ‍ॅग्रो केमिकल्स कंपनीचे अ‍ॅडव्हान्टा या मोठय़ा बी बियाणे बनवणाऱ्या कंपनीसह विलीनीकरणानंतर यूपीएल ही आता केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील एक मोठी आणि परिपूर्ण अ‍ॅग्रो केमिकल्स कंपनी झाली आहे. या विलीनीकरणातून यूपीएल जगातील ४६ देशांत पोहचेल आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांप्रमाणे तुल्यबळ होईल. या विलीनीकरणातून कंपनीच्या एकूण उत्पन्नापकी सुमारे ८९% उत्पन्न अ‍ॅग्रो केमिकल्सपासून, तर ११% उत्पन्न बियाणांपासून होईल.

सध्या ४०० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर तुम्हाला १२-१५ महिन्यांत २०-२५% परतावा देऊ शकेल.

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर

(interest coverage ratio)

डेट इक्विटी गुणोत्तरामुळे कंपनी किती कर्जात आहे ते कळते, परंतु या कर्जावरचे व्याज देता येईल एवढय़ा प्रमाणात कंपनी नफा कमावीत आहे का किंवा कंपनी देत असलेले व्याज नफ्याच्या किती टक्के आहे ते इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तरामुळे कळते. सध्याच्या परिस्थितीत हे गुणोत्तर अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • व्याज आणि करपूर्व नफा / व्याज खर्च (Ebidta / Interest expense)

हे गुणोत्तर जितके जास्त तितकी कंपनीची कर्जफेडीची किंवा व्याज द्यायची क्षमता जास्त. खरे तर कुठेलही कर्ज नसलेली कंपनी असेल तर ते उत्तम. परंतु अनेकदा कर्ज आणि भाग भांडवल यांचा योग्य मेळ साधून जास्त नफा कमावणे सोपे असते. म्हणून कर्ज काढणेदेखील फायद्याचे ठरू शकते, परंतु कंपनीला कर्जाच्या विळख्यात अडकायचे नसेल तर कंपनीची नफा कमवायची क्षमता चांगली हवी. म्हणून हे गुणोत्तर किमान ३ किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

यूपीएल लिमिटेड
farm1

tocksandwealth@gmail.com