|| प्रवीण देशपांडे

प्रश्न : मी सप्टेंबर २०१६ मध्ये इक्विटी म्युचुअल फंडात दरमहा २,००० रुपये गुंतवणूक (एसआयपी) सुरू केली. आता ऑक्टोबर २०१८ मध्ये मला या इक्विटी फंडातील गुंतवणुकीची विक्री करावयाची आहे मला या विक्रीवर कर भरावा लागेल काय?   – स्वप्ना पाटील, ईमेलद्वारे

उत्तर : इक्विटी फंडातील गुंतवणूक दीर्घ मुदतीची होण्यासाठी ती किमान १२ महिने धारण करावी लागते. अशा दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवरील भांडवली नफा हा ‘कलम ११२ अ’नुसार करपात्र असतो. या कलमानुसार १ लाख रुपयांपर्यंतच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही आणि भांडवली नफा १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर कर १० टक्के इतका कर भरावा लागतो. आपल्या बाबतीत आपण ऑक्टोबर २०१८ मध्ये इक्विटी फंडातील गुंतवणुकीची विक्री केली असल्याने, सप्टेंबर २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या काळातील गुंतवणूक दीर्घ मुदतीची असेल आणि नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०१८ या काळात केलेली गुंतवणूक अल्प मुदतीची असेल. आणि त्यानुसार आपल्याला भांडवली नफा गणावा लागेल. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा वरीलप्रमाणे करपात्र असेल आणि अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर १५ टक्के इतका कर भरावा लागेल.

‘एसआयपी’मधील प्रत्येक गुंतवणूक ही भांडवली नफा गणण्यासाठी स्वतंत्र गुंतवणूक समजली जाते.

  • प्रश्न : माझ्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रांनी मला ७५,००० रुपयांचा दागिन्यांचा सेट भेट म्हणून दिला. मला तो करपात्र आहे का? – सुवर्णा जाधव, पुणे</strong>

उत्तर : ‘कलम ५६’नुसार ५०,००० रुपयांपेक्षा जास्त मिळालेली रोख रक्कम किंवा ठरावीक संपत्ती भेट स्वरूपात मिळाली असेल तर ती संपूर्ण रक्कम करपात्र असते. लग्नात मिळालेल्या भेटी करमुक्त असतात. परंतु आपल्याला मिळालेली भेट लग्नात मिळालेली नसून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मिळालेली आहे, दागिने ही या कलमानुसार ‘ठरावीक संपत्ती’ आहे आणि त्याचे वाजवी बाजारभाव मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे ७५,००० रुपये ही संपूर्ण रक्कम आपल्याला करपात्र आहे.

  • प्रश्न : मी खासगी कंपनीत नोकरी करतो. माझ्या पगारातून प्राप्तिकर उद्गम कराच्या (टीडीएस)च्या रूपात कापला जातो. माझ्याकडे तीन वातानुकूलन यंत्रे आहेत, ती मी भाडय़ाने दिली आहेत. या भाडय़ापोटी मला दरमहा ६,००० रुपये असे ७२,००० रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. या यंत्रांसाठी मी वार्षिक १२,००० रुपये इतकी रक्कम देखरेखीसाठी खर्च करतो. ही रक्कम माझ्या करपात्र उत्पन्नात किती आणि कशी गणली जाईल? – प्रशांत शिंदे, ईमेलद्वारे

उत्तर : वातानुकूलन यंत्रे भाडय़ाने देण्याचा आपला व्यवसाय नसल्यामुळे हे उत्पन्न आपल्याला ‘इतर उत्पन्न’ या सदराखाली दाखवावे लागेल. आपले उपन्न ७२,००० रुपये आणि त्यावर झालेला देखभालीचा खर्च १२,००० रुपये वजा जाता आपल्याला ६०,००० रुपये आपल्या करपात्र उत्पन्नात घ्यावे लागतील. ‘कलम ५७’नुसार उत्पन्न मिळविण्यासाठी पूर्णपणे आणि विशेषत: झालेल्या खर्चाची वजावट ‘इतर उत्पन्न’ या सदरात आपल्याला घेता येते.

  • प्रश्न : मी एक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आहे. मला मुदत ठेवींवरील व्याजाचे वार्षिक दोन लाख रुपये उत्पन्न मिळते. मला या वर्षी एका ‘गेम शो’मध्ये बक्षीस रूपात ३,५०,००० रुपये मिळाले. मी कर वाचविण्यासाठी दीड लाख रुपये ‘कलम ८० सी’ नुसार मुदत ठेवींमध्ये गुंतविले आहेत. मला माझ्या उत्पन्नावर किती कर भरावा लागेल? – अजय काळे, ईमेलद्वारे

उत्तर : आपले करपात्र उत्पन्न खालीलप्रमाणे :

 

गेम शोमधून मिळालेल्या उत्पनावर आपल्याला ३० टक्के इतक्या दराने कर भरावा लागतो, आपले उत्पन्न कोणत्याही स्लॅबमध्ये असले तरी. आपल्याला या उत्पन्नावर कमाल करमुक्त उत्पन्नाचा फायदादेखील मिळत नाही. आणि या उत्पन्नावर ‘कलम ८० सी’च्या वजावटी मिळत नाहीत. आपल्या बाबतीत ‘८०सी’ची १,५०,००० रुपयांची वजावट व्याजाच्या उत्पन्नातूनच घेता येईल. आपण ही गुंतवणूक केली नसती तरी आपले गेम शोव्यतिरिक्त करपात्र उत्पन्न ३,००,००० रुपयांच्या (आपण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे) पेक्षा कमी असल्यामुळे या उत्पन्नावर आपल्याला कर भरावा लागला नसता. या गेम शोच्या उत्पन्नावर कापला गेलेला उद्गम कर आपल्यावरील एकूण देय करातून वजा होईल.

  • प्रश्न : मी मे २०१६ मध्ये शेअर बाजारमार्फत एका कंपनीचे १,००० शेअर्स प्रत्येकी १,८०० रुपयांना खरेदी केले होते. हे शेअर्स मी सप्टेंबर २०१८ मध्ये प्रत्येकी ४,३०० रुपयांना शेअर बाजारमार्फत विकले. ३१ जानेवारी २०१८ रोजीचे या शेअर्सचे शेअर बाजारातील अधिकतम मूल्य ३,५०० रुपये होते. मला या भांडवली नफ्यावर किती कर भरावा लागेल? – सुशांत जोशी, ईमेलद्वारे

उत्तर : हे शेअर्स आपण मे २०१६ मध्ये खरेदी करून सप्टेंबर २०१८ मध्ये विकले म्हणजेच १२ महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर विकल्यामुळे ही संपत्ती दीर्घ मुदतीची असेल आणि होणारा भांडवली नफा दीर्घ मुदतीचा असेल. या शेअर्सची खरेदी आणि विक्री शेअर बाजारामार्फत झाल्यामुळे याच्या खरेदी आणि विक्रीवर ‘एसटीटी’ भरला गेला आहे. त्यामुळे यावर ‘कलम ११२ अ’नुसार सवलतीच्या दरात कर भरता येईल. आपले करपात्र उत्पन्न खालील प्रमाणे गणले जाईल.

 

या एकूण भांडवली नफ्यापैकी एक लाख रुपयांवरील रकमेवर म्हणजेच ७ लाख रुपयांवर १० टक्के इतका कर भरावा लागेल. हा भांडवली नफा गणताना महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येत नाही.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.