av-05संपूर्ण घराचे व्यवस्थापन उत्तम रीतीने पाहणारी ‘गृहमंत्री’ तेच नपुण्य गुंतवणूक व्यवस्थापनातही दाखवून एक उत्तम ‘अर्थमंत्री’ म्हणून भूमिका पार पाडू शकते याच विश्वासाने..
घराचं एकूणच व्यवस्थापन करण्याची, महिन्याच्या बजेटमधे घर चालवण्याची कला आणि दृष्टी प्रत्येक महिलेमध्ये उपजतच असते. पण ज्यावेळेला मुद्दा पशाच्या गुंतवणुकीबद्दल अथवा प्राप्तिकर कायद्यातील विविध तरतुदींविषयी उपस्थित होतो त्यावेळेला वेगळं चित्र समोर येतं..
: प्रसंग १ :
‘ए शामल जरा बाहेर ये आणि या फॉर्मवर मी फुली केलेल्या जागी सही कर गं’ निखीलने आपल्या ‘सौ’ना सूचना केली.
‘अय्या, कोणत्या गुंतवणूक योजनेत पसे गुंतवतोय आपण?’ शामलवहिनींनी उत्चुकतेने विचारले.
‘तुला काय करायचय त्याच्याशी? तू फक्त मी सांगतोय तिथे सही कर आणि माझ्या चहाचं बघ जरा..’ शामल वाहिनी बिचाऱ्या फॉर्मवर सही करून काहीही न बोलता चहा करायला स्वयंपाकघरात निघून गेल्या.
: प्रसंग २:
संगीतावाहिनी घाईघाईतच गुंतवणूक सल्लागाराच्या ऑफिसमधे शिरल्या. गुंतवणूक सल्लागाराने त्यांचे स्वागत केले- ‘या बसा. मला तुमच्या मिस्टरांचा फोन आला होता. त्यांनी सही करून फॉर्म पाठवला असेल ना तुमच्याबरोबर. मी तुम्हाला गुंतवणूक योजना काय आहे ती समजावून सांगतो. आणि मग तुमची फॉर्मवर सही घेतो. बघा, ही एक नियमित व्याज..’
गुंतवणूक सल्लागाराचे बोलणे मधेच थांबवत संगीतावाहिनी त्यांना म्हणाल्या ‘योजना काय आहे, कशी आहे वगरे मला काही सांगू नका. ते सर्व आमचे ‘हे’च बघतात. आज मी जरा घाईत आहे. साडय़ांचा सेल चालू आहे. आज नेमका शेवटचा दिवस आहे. सही कुठे करायची आहे तेवढंच सांगा. म्हणजे मी जायला मोकळी.. हा चेक घ्या तुमच्या ताब्यात.’
‘योजना समजवायला जास्त वेळ नाही लागणार. फार फार तर १५ मिनिटं..,’ गुंतवणूक सल्लागाराने विनंती केली.
‘यांना माहिती आहे ना? मग झालं तर.! चला सांगा सही कुठे करायची आहे..’ संगीतावाहिनी उत्तरल्या.
गुंतवणूक सल्लागाराचा नाईलाज झाला आणि गुंतवणूक योजना समजून न घेताच संगीतावहिनी फॉर्मवर सही करून साडय़ांचे प्रदर्शन पाहण्यासाठी मार्गस्थ झाल्या.
: प्रसंग ३ :
रुपाली देशमाने, वय वष्रे ४८, अविवाहित. बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यावेळी मिळालेल्या एकूण रकमेपकी ९०% रक्कम बँकेच्या मुदत ठेवीमधेच गुंतवली. का? कारण इतर गुंतवणुकीचे मार्ग उदा. शेअर्स, म्युचुअल फंड म्हणजे केवळ जुगार अशी (गर) समजूत करून घेतलेली. ८-१० वर्ष गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की भविष्यकाळात केवळ व्याजावर आपलं भागणार नाही. पण तोपर्यंत पशाची वृद्धी होण्यासाठी जो मधला ८-१० वर्षांचा काळ होता तो हातून निघून गेला होता.
: प्रसंग ४ :
राजीवचा स्वतचा व्यवसाय होता. त्याची पत्नी रेखा एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला होती. त्यांना दोन मुले. व्यवसायासाठी राजीवने दोन-तीन बँका/संस्था यांच्याकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करायला रेखाच्या पगारातून मिळणारे पसेही तो वापरत असे. पण आपण किती कर्ज घेतले आहे? त्याचा व्यवसायाला किती फायदा होतोय? याविषयी त्याने रेखाला कधीही माहिती दिली नाही. आणि आश्चर्याची बाब म्हणजे रेखानेही त्याला कधी त्याविषयी विचारले नाही. वयाच्या ४४ व्या वर्षी राजीवचा अपघाती मृत्यू झाला. आणि त्यानंतर काही दिवसांनी रेखाला बँका/ संस्था यांच्याकडून कर्जाची एकूण १४ लाख रुपये रक्कम देय असल्याचे समजले. आता ही मोठी रक्कम फेडायची कशी हा प्रश्न रेखासमोर उभा राहिला.
: प्रसंग ५ :
अमृताचा नवरा राहुल एका मोठय़ा कंपनीत मोठय़ा पदावर कार्यरत. पगार वर्षांला २८ लाख रुपये. प्राप्तिकर वाचवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक सोडून तो जी अतिरिक्त गुंतवणूक करायचा ती पत्नीच्या नावे. का? कारण तीच गुंतवणूक आपण आपल्या नावे केली तर अजून प्राप्तिकर जाणार. आणि हे सर्व राहुलने माहिती न घेता, तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला न घेता केलं. अमृताच्याही मनात आपण हे करतोय ते योग्य का अयोग्य हा विचार आला नाही. आणि एक दिवशी अमृताला प्राप्तिकर खात्यातून उत्पन्नाचा स्त्रोत विचारणा करणारी नोटीस आली. आणि दोघांची तारांबळ उडाली.

महिलांच्या आयुष्यात घडणारे आíथक व्यवहारांशी निगडीत हे वेगवेगळे प्रसंग.. पहिल्या प्रसंगात निखील आपल्या पत्नीला जी आवश्यक माहिती द्यायला पाहिजे ती देत नाही; तर दुसऱ्या प्रसंगात संगीतावाहिनीच माहिती घेण्यास तयार नाहीत. रुपालीच्या मनात पुरेशी माहिती न घेताच शेअर्स/म्युच्युअल फंडामधील गुंतवणकीबद्दल नकारात्मक पूर्वग्रह! नवऱ्याने घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीमध्ये हातभार लावणाऱ्या रेखाला आपल्या नवऱ्याने एकूण किती कर्ज घेतले आहे याची माहिती नाही. अमृता अनवधानाने का होईना नवऱ्याचा प्राप्तिकर वाचतो म्हणून त्याचे पसे स्वतच्या नावावर गुंतवत राहिली जे प्राप्तिकर कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर ठरले.
आज महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ही खरोखरंच आनंदाची बाब आहे. गुंतवणूक नियोजन, शेअर बाजार, म्युचुअल फंड, प्राप्तिकर नियोजन या आíथक विषयांमधे अनेक महिला माहिती घेतानाही दिसतात आणि त्यानुसार गुंतवणूक/ कर नियोजन करतानाही दिसतात. पण ही टक्केवारी खूप कमी आहे. अगदी नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा हे प्रमाण खूप कमी आहे. स्त्री, मग ती नोकरी करणारी असो, व्यवसाय करणारी असो किंवा अगदी गृहिणी असो तिने या विषयांमध्ये रुची घेऊन माहिती घ्यायलाच पाहिजे. चालू काळात महिला सक्षमीकरण या विषयावर खूप काही बोललं जातं, लिहिलं जातं. अगदी या विषयावर परिसंवाद सुद्धा आयोजित केले जातात. पण महिला सक्षमीकरणाशी संबंधित शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षितता या विषयांबरोबरच गुंतवणूक, म्युचुअल फंड, विमा, कर्ज, प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी या विषयांवर जास्तीत जास्त महिलांनी अर्थसाक्षर होणे ही काळाची गरज राहील असे वाटते. नवा स्मार्ट (मोबाईल) फोन घेतल्यावर तो कसा वापरायचा हे महिला लक्ष घालून लगेच शिकतात. टीव्हीवर खाद्यपदार्थ करण्याविषयी जे कार्यक्रम होतात ते अगदी आवडीने न चुकता पाहतात, त्या कार्यक्रमात पदार्थ कसे करायचे त्याची कृती, साहित्य वगरे ते लिहून घेतात आणि तो खाद्य पदार्थ करायला शिकतात. अगदी टू-व्हीलर, फोर-व्हीलर चालवायला शिकतात. हे सर्व योग्य आणि स्वागतार्हच आहे. पण गुंतवणूक व्यवस्थापनासारखा विषय जो अत्यंत महत्वाचा आहे त्याबद्दल तिच्या घरातून तिला माहिती द्यायला, त्याविषयी तिला साक्षर करायला किती महिलांना संधी दिली जाते? आणि त्याचबरोबर अशी संधी उपलब्ध असताना सुद्धा किती महिला त्यात आपणहून लक्ष घालतात?
बॅंक, विमा कंपन्या अशा आíथक व्यवहारांशी संबधित कार्यालयांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. पण त्यापकी किती महिला त्यांच्या स्वतच्या आयुष्यचक्रातील आíथक उद्दिष्टांबद्दल जागरूक आहेत? स्त्रीचा आíथक व्यवहारांबाबत सहभाग हा केवळ बँकेतून पसे काढणे, चेक भरणे, वीज/फोनचे बिल भरणे एवढय़ापुरताच मर्यादित असता कामा नये. विविध गुंतवणूक योजना, त्यांचे फायद-तोटे, आरोग्यविमा योजना, आयुर्वमिा योजना, पेन्शन योजना, प्राप्तिकर बचत योजना, कर्ज ई.विषयांबद्दल स्त्रियांनी माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
वर नमूद केलेल्या दुसऱ्या प्रसंगात संगीतावहिनी गुंतवणूक योजनेची माहिती न घेताच निघून गेल्या. त्यांना तशीच सवय लागली होती. कारण एकदा का गुंतवणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालो की आपल्यावर अतिरिक्त जबाबदारी येणार असे त्यांना वाटत होते. या (चुकीच्या) विचारसरणीतून दिसून येते ती एक प्रकारची उदासीनता! आणि ही उदासीनता त्यांच्याप्रमाणेच अनेक महिलांच्या बाबतीत दिसून येते. या उदासीनतेपोटी काही महिलांना गुंतवणूक/प्राप्तिकर नियोजन या रोजच्या व्यवहारात उपयोगी असणाऱ्या विषयांचे महत्त्व वाटत नाही. रेखावहिनींचे पती वयाच्या ४४ व्या वर्षी अकाली वारले त्यावेळी त्यांना वरील विषयाचे महत्त्व समजले. पण त्यावेळी आपण गुंतवणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आणि प्रत्यक्षात आíथक व्यवहार करण्यासाठी पुरेसे सक्षम नाही याची जाणीव होऊन त्या प्रचंड तणावाखाली राहिल्या. ही वेळ आपण का येऊ द्यावी?
रुपाली देशमाने यांनी बँकेच्या मुदत ठेवीमधे पसे गुंतवले ही त्यांची चूक झाली असे नाही. पण मिळणारे व्याज आणि त्यामधून महागाईचा दर आणि प्राप्तिकराची होणारी वजावट हे लक्षात घालून दीर्घकाळ आपलं भागेल ना? हा देखील विचार त्यांनी करण आवश्यक होतं. शेअर्स आणि म्युचुअल फंड म्हणजे जुगार असा पूर्वग्रह करून त्याबद्दल माहितीच घ्यायची नाही हे धोरण योग्य नाही. गुंतवणूक समतोल हवी. नियमित व्याज मिळण्यासाठी आणि पशाच्या वृद्धीसाठी सुद्धा!
आपला नवरा व्यवसायासाठी जे कर्ज घेतोय त्याचा विनियोग कार्यक्षमतेने होतोय का? घेतलेल्या कर्जाच्या अटी काय आहेत? त्याचा कालावधी किती आहे? ते व्यवस्थित फेडले जात आहे का? या सर्व मुद्यांबाबत रेखाने माहिती घ्यायला हवी होती. पत्नीचा पतीवर व पतीचा पत्नीवर शंभर टक्के विश्वास हा असलाच पाहिजे, यात कोणतीही शंका नाही. पण जे आíथक निर्णय कुटुंबामध्ये घेतले गेले त्याची पूर्ण माहिती जोडीदाराला असायला हवी.
प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार एक व्यक्ती स्वतचे पसे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे गुंतवत असेल तर त्या गुंतवणुकीतून निर्माण होणारे उत्पन्न जी व्यक्ती असे पसे गुंतवते त्या व्यक्तीचेच धरले जाते. असे उत्पन्न दडवलेले उत्पन्न म्हणून गणले जाऊन त्यावर व्याज आणि पेनल्टी आकारण्याची तरतूद प्राप्तिकर कायद्यामध्ये आहे. ही माहिती अमृता आणि राहुलला नव्हती आणि म्हणूनच त्यांना कारवाईला तोंड द्यावे लागले.
महत्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे आíथक व्यवहारांबाबत, गुंतवणुकीबाबत तसेच प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींबाबत महिलांमध्ये (मग ती महिला नोकरी करणारी असो, व्यवसाय करणारी असो अथवा गृहिणी असो) उदासीनता आहे. हे फक्त घरातल्या पुरुषाचेच काम ही मानसिकता सोडून दिली पाहिजे. आणि आपले वय, कौटुंबिक पाश्र्वभूमी, आपल्या कामाचे स्वरूप, आपले उत्पन्न आणि जोखीम घेण्याची क्षमता हे लक्षात घेऊन गुंतवणूक आणि प्राप्तिकर नियोजन केले पाहिजे.
महिलांना प्राप्तिकर कायद्यातील काही तरतुदींचीही माहिती हवी. उदा. प्राप्तिकर कायद्यातील वजावटी वजा करून राहिलेले उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर प्राप्तिकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. उद्गमी कर कपात (टीडीएस) वजा करून वार्षकि प्राप्तिकर १० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर आगाऊ कर भरणे आवश्यक आहे. करपात्र उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर मुळात कर कपात होऊ नये म्हणून फॉर्म १५ जी देणं कायद्याला धरून नाही. सुदैवाने आजच्या काळात आयुष्य चक्रातील आíथक उद्दिष्टय़े साध्य करायला विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. आपल्या आíथक उद्दिष्टांची पूर्तता होण्यासाठी विविध गुंतवणूक योजनांची माहिती घेऊन प्रत्यक्षात गुंतवणूक झाली तर आíथक समस्या निर्माण होणार नाही.
आजच्या गृहकृतदक्ष म्हणून प्रतिमा असलेल्या स्त्रीचे रुपांतर उद्याच्या गृहअर्थकृतदक्ष या प्रतिमेमध्ये सुद्धा व्हावे यासाठी प्रत्येक स्त्रीने पाऊल टाकणे आवश्यक आहे. संपूर्ण घराचे व्यवस्थापन उत्तम रीतीने करते म्हणून स्त्रीला आदराने ‘गृहमंत्री -होम मिनिस्टर’  म्हणून संबोधले जाते. महिन्याला मिळणाऱ्या पशातून जर स्त्री घर चालवू शकते तर तेच नपुण्य ती गुंतवणूक व्यवस्थापनामध्ये सुद्धा दाखवून आपण एक उत्तम अर्थमंत्री म्हणून भूमिका पार पडू शकतो हे दाखवून देऊ शकते. त्यासाठी गरज आहे ती थोडय़ा अभ्यासाची आणि ‘हे सुद्धा मी करू शकते’ या आत्मविश्वासाची! आणि त्या दृष्टीने तिने पाऊल उचललं तर तिच्या आयुष्यात आíथक समस्या निर्माण न होता आíथक समृद्धीचा झोका कायम उंचच राहील हे निश्चित!
लेखक मुंबईस्थित प्राप्तिकर नियोजन सल्लागार
dattatrayakale9@yahoo.in