06 April 2020

News Flash

नावात काय? : देश मंदीत आहे, ओळखायचं कसं?

अर्थव्यवस्थेत येणारे चढ-उतार ही जगात प्रत्येक देशात अनुभवास येणारी घटना आहे

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ जोशी

सध्या आर्थिक मंदी हा परवलीचा शब्द झाला आहे. एवढा की आर्थिक मंदी नेमकी कधी येते/ येईल, याचे भाकीत वर्तवण्यास सुरुवात झाली आहे. वास्तविक पाहता आर्थिक मंदी ही कधी येणार याचे भाकीत वर्तवणे अशक्य आहे. या उलट आपण आर्थिक मंदीच्या फेऱ्यात अडकलेलो आहोत याची जाणीव झाल्यानंतर आपल्याला असा दावा करता येऊ शकेल की होय आपला देश मंदीत आहे!

मग आर्थिक मंदी आहे हे कसं ओळखायचं?

अर्थव्यवस्थेत येणारे चढ-उतार ही जगात प्रत्येक देशात अनुभवास येणारी घटना आहे. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था एका नियमित दराने वाढू शकत नाही. अर्थव्यवस्थेतील वाढ ही सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच जीडीपी या दराने ओळखली जाते. जीडीपीच्या दरातील वाढ किंवा घसरण होणे यावरून अर्थव्यवस्थेची प्रगती कशी सुरू आहे याचा अंदाज लावला जातो. जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीचे आकडे सलग तीन तिमाहीसाठी नकारात्मक असतात तेव्हा अर्थचक्र रुळावरून घसरत असल्याची खात्री देता येते.

मंदीचे सावट ओळखायला काही मॅक्रो (संपूर्ण देशपातळीवरील) घटकांचा अंदाज घ्यावा लागतो.

* वाढती बेरोजगारी –

हे सगळ्यात लवकर अनुभवास येणारे वास्तव आहे. जेव्हा बेरोजगारीचा दर वाढीस लागतो तेव्हा त्याच्या कारणांमधूनसुद्धा आर्थिक अरिष्टाची चाहूल लागत असते. जेव्हा कारखानदारांना आपल्या उत्पादनाच्या विक्रीची शाश्वती नसते तेव्हा नवीन उत्पादन घेण्यास त्यांची हिंमत होत नाही व उत्पादनात आखडता हात घेतल्यामुळे कच्च्या मालाचे पुरवठा करणारे अन्य छोटे उद्योगसुद्धा संकटात येतात. उदाहरण घ्यायचं झालं तर भारतात सध्या वाहन उद्योगांमध्ये नकारात्मक वातावरण स्पष्ट दिसते आहे. मोठाल्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे न विकली गेलेली वाहने पडून असल्यामुळे त्यांनी कारखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे त्यांना वाहनांचे सुटे भाग पुरविणाऱ्या लघू व मध्यम उद्योगधंद्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

* कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत घट –

आर्थिक अरिष्ट आणि त्यानंतर येणाऱ्या मंदीचे अजून एक लक्षण म्हणजे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक वापरासाठीचे कर्ज याच्या मागणीत घट होते. लोक असलेले पैसे पुरवून वापरण्याकडे जास्त लक्ष देतात व कर्ज घेण्याच्या या दरात घट होते.

* खासगी गुंतवणुकीतील घसरण –

ज्या वेळी अर्थव्यवस्थेत मंदीची चाहूल लागते त्या वेळी उद्योजक नव्या उद्योगात पैसे गुंतविण्यात स्वारस्य दाखवत नाहीत. असलेल्या उद्योगांचे विस्तारीकरण करण्याच्या योजना पुढे ढकलल्या जातात. आहे त्या परिस्थितीतच व्यवसाय कसा फायदेशीर ठेवता येईल याचे प्रयत्न केले जातात.

* शेअर बाजारातील निराशा –

शेअर बाजारांमध्ये देशांतर्गत त्याचप्रमाणे विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठय़ा प्रमाणावर पैसे गुंतविले जातात. जेव्हा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे भविष्यातील चित्र आशादायक नसते तेव्हा परकीय गुंतवणूकसुद्धा मंदावते. त्याचबरोबर सर्वसामान्य लहान गुंतवणूकदारदेखील शेअर बाजाराकडे पाठ फिरवतात आणि पारंपरिक गुंतवणूक पर्यायांचा अवलंब करताना दिसतात. मात्र हे सर्व ठिकाणी होईल असे नाही! भारतासारख्या देशात अजूनही शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण तसेही फारच कमी आहे.

* कंझ्युमर्स कॉन्फिडन्स इंडेक्समध्ये घसरण –

म्हणजेच ग्राहकांना अर्थव्यवस्थेविषयी मोठय़ा प्रमाणावर चिंता वाटल्यामुळे त्यांच्या खरेदीचे खरेदीचा उत्साह कमी होतो आणि आणि एकंदरीतच मागणी घटते. भारतात या इंडेक्सची सरकारी/अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.

मंदीची तात्कालिक कारणे

प्रत्येक आर्थिक अरिष्टाची बीजे आधीच्या एक-दोन दशकातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडीत असतात. उदाहरणार्थ, १९२९ साली आलेल्या जागतिक महामंदीसाठी पहिल्या महायुद्धानंतर आलेल्या वित्तीय अस्थिरता, युद्धखोरी, अनियंत्रित कर्जवाटप कारणीभूत होते. मागच्या दशकात २००८ मध्ये अमेरिकेत सुरू झालेल्या व जगातील सर्व देशांनी अनुभवलेल्या आर्थिक मंदीमागे अमेरिकेतील वित्त क्षेत्रातील घडामोडी कारणीभूत होत्या.

भारतात सध्या निश्चितच अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर नाही! सरकारी आकडेवारी अणि वास्तव यात तफावत दिसते आहे. यावेळेच्या जीडीपीचे आकडे अजिबातच समाधानकारक नाहीत. पुढील दोन महिने अभ्यासकांसाठी महत्त्वाचे!

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

joshikd28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:52 am

Web Title: financial recession rising unemployment borrowers abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : ‘विवेका’नुभव
2 थेंबे थेंबे तळे साचे : शेअर बाजारातील थेट गुंतवणूक..
3 बाजाराचा तंत्र कल : तरी.. ‘निफ्टी’ कोरडीच!
Just Now!
X